शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्षाची प्रतिमा उत्कटतेने रंगवण्याच्या ‘ध्यास-पर्वा’ची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2023 07:58 IST

चरित्र लेखकांच्या मनात चरित्र नायक/नायिका किती खोल उतरत असतील? त्या व्यक्ती लेखकाला पार व्यापून टाकत असतील का? स्वप्नातही येत असतील का?

- गोपाळ औटी

काही चरित्रे आणि त्या चरित्रांच्या नायक-नायिका यांच्याशी त्या-त्या चरित्र लेखकांची जुळलेली नाळ अक्षरश: स्तिमित करून टाकणारी असते. ‘केसरी’चे बारावे संपादक अरविंद गोखले हे टिळकांचे वस्तुनिष्ठ चित्रकार. ‘मंडालेचा राजबंदी’ आणि ‘टिळक पर्व’ ही त्यांनी लिहिलेली दोन्ही टिळक चरित्रे वाचनीय आणि संग्राह्यही. गोखले एका ठिकाणी लिहितात, ‘आता म्हणजे असे झाले की, माझ्या स्वप्नात जयंतराव टिळक आणि लोकमान्य दोघे येऊ लागले. अजून लिखाणाला सुरुवात व्हायची होती. तोच स्वप्नात, ‘अरे तू न. र. फाटक यांनी लिहिलेले वाचले आहेस का?’ असे विचारले जायचे.  पुढे पुढे तर लेखनाचा क्रमही सांगितला जाऊ लागला.  चरित्र लेखनात आपणाकडून थोडी चूक झाली तर लोकमान्यांच्या हातातली काठी उचलली तर जाणार नाही ना, अशी भीती वाटायची!’

गोखले यांचे उद्गार त्यांच्या तादात्म्यतेचे निदर्शक आहेत. मराठी चरित्रकारांमधले महत्त्वाचे नाव  म्हणजे धनंजय कीर. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर ही सर्व  बृहत् चरित्रे वाचताना  कीर यांच्या काबाडकष्टांची जाणीव होते. कीरांचे कष्ट, भाषाप्रेम, व्यासंग, राष्ट्रप्रेम, कामाची शिस्त या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. संदर्भग्रंथ ठरलेली त्यांची सर्व चरित्रे पूर्ण करीत कीर यांनी अक्षरशः आपल्या डोळ्यांच्या खाचा करून घेतल्या. जाड भिंगाचा चष्मा आणि  संदर्भ साधनांच्या ढिगांमध्ये हरवलेले कीर हे साहित्यातल्या समर्पणाचे दुर्मीळ चित्र आहे. चरित्र लिहिण्याची बैठक आणि पद्धत याविषयी कीर यांनी पुष्कळच चिंतन केले. चरित्र वाङ्मयावरचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले. ते म्हणतात, निर्विकारपणे लिहिले तर ते चैतन्यहीन ठरेल. माझ्या चरित्रनायकाच्या ध्येयधोरणांशी मी समरस झालो; परंतु निकाल देताना चरित्रकाराने स्वतंत्र आणि तटस्थ राहावे हे उत्तम!’ 

आजच्या पिढीतल्या संशोधक, चरित्रकार मनीषा बाठे यांचे समर्थ रामदासांच्या जीवनकार्याशी असणारे तादात्म्य तितकेच आश्वासक आणि अव्वल दर्जाचे वाटते. अकरा भारतीय भाषा लिहिता-बोलता येणाऱ्या या व्यासंगी विदुषीने यंदाच्याच वर्षी लिहिलेले समर्थ रामदासांचं छोटेखानी चरित्र (मोनोग्राफ) त्यांच्या ध्यासाचा परिपाक आहे. ‘दिसेना जनी तेचि शोधून पाहे’ या समर्थ वचनाचा पडताळा घेत मनीषाताईंनी अनेक प्रदेशांत, अनेक राज्यांत पायपीट केली. पोथ्यांचा धांडोळा घेत संकटातून चिवट मार्गक्रमण केले आहे. या तादात्मतेतूनच त्यांच्या अंतःकरणात राघव आणि समर्थ या दोघांनीही वस्ती केली आहे, हे नि:संशय ! डॉक्टर आनंदीबाई जोशी (मे १९९७), गानयोगी पंडित डी .व्ही. पलुस्कर (डिसेंबर २०१०) आणि बहुरुपिणी दुर्गाबाई भागवत (जुलै २०१८) ही तीन चरित्रे म्हणजे डॉ. अंजली कीर्तने यांनी घडविलेल्या बौद्धिक मैफिली आहेत.  विशेष म्हणजे त्या तिघांवरही डॉक्टर कीर्तने यांनी सुंदर अनुबोधपट  काढले.  त्यावर सप्रयोग व्याख्याने दिली.  अंजलीताई २२-२३ वर्षांपेक्षा अधिक काळ या कामात बुडून गेलेल्या होत्या. कष्ट, पायपीट, पाठपुरावा, संशोधन आणि शेवटी  मांडणी यासाठी अंजलीबाईंना दाद द्यावी लागेल. 

आयुष्यभर अफाट संघर्षमय चळवळ उभी करणारा एखादा नेता मात्र पूर्णांशाने समाजाला कळत नाही. अशा वेळी एखादा तळमळीचा संपादक त्या विषयात हात घालतो. २०१६ मध्ये भानू काळे यांनी शरद जोशी यांचा विस्तृत जीवनपट मांडला. ‘अंगार वाटा’ या शीर्षकावरूनच शरद जोशी यांच्या धगधगत्या आयुष्याची कल्पना यावी. शरद जोशी यांच्या कामाचे मोल जगाला कळावे म्हणून त्यांच्या कामाचा झंझावात भानू काळे यांनी इंग्रजीतूनही एक चरित्र लिहून मांडला.  स्वित्झर्लंडमधील मानमरातबाची नोकरी सोडून शरद जोशी शेतकऱ्यांसाठी पुण्याजवळ आंबेठाणमध्ये येऊन राहिले. शेतकऱ्यांचा जागल्या होऊन भारतभर अखंड पायपीट करीत राहिले. - काही काळ तरी लेखक त्या चरित्र नायकाच्या विश्वात विलीन झालेला असतो, म्हणूनच त्यांची परस्पर स्पंदने वाचकांना जाणवल्याशिवाय राहत नाहीत.