शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पक्षांमधल्या कौटुंबिक तमाशांचा उबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 06:31 IST

मुलेबाळे-भाचे-पुतण्यांच्या राजकीय घराणेशाहीला देशभर घरघर, भारताच्या राजकीय भविष्य पटलावर राष्ट्रीय पक्षांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता दिसते.

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार

कुटुंबातील दुफळ्या, भावाभावांच्या भांडणांनी ग्रस्त भारतीय प्रादेशिक राजकारणाच्या रिंगणात सत्ता हीच केवळ महत्त्वाची चीज आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीमधील नेताजींच्या मुलांमध्ये झालेला राडा एखाद्या रियॅलिटी शोला लाजवू शकतो. के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता हिने  पित्याच्या राजकीय वारशाला जणू सुरुंगच लावला. राव यांचे ‘दुष्ट प्रवृत्ती’चे सल्लागार भाजपमध्ये विलीन होण्याची कारस्थाने करत आहेत, असा आरोप तिने केला. तिचे बंधू के टी रामाराव हे मात्र पक्षाच्या बुडत्या जहाजावर कप्तानासारखे चिकटून राहिले.

 हे चित्र केवळ तेलंगणापुरते मर्यादित नाही. भारताच्या प्रादेशिक राजकीय घराण्यांना उतरती कळा लागल्याचे हे लक्षण असून मुलेबाळे, भाचे, पुतणे यांच्यात जातपात, प्रादेशिक अस्मिता यांचे राजकीय भांडवल कोणाचे यावरून मारामाऱ्या सुरू आहेत. भारत राष्ट्रीय समितीपासून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर प्रदेशातील यादवांचा बालेकिल्ला असलेला समाजवादी पक्ष, राजदचे इतर मागासवर्गीय साम्राज्य, बसपाची दलितांविषयीची स्वप्ने, तृणमूल काँग्रेसची बंगाली खुमारी आणि द्रमुकची द्राविडीयन पाळेमुळे तसेच वान्नियारांच्या पाठिंब्यावर उभ्या पीएमकेपर्यंत सगळे पक्ष सामाजिक आणि प्रादेशिक वैशिष्ट्यांवर फोफावले आणि तरीही त्यांच्यातील कौटुंबिक वादांनी पक्षांना फुटीच्या उंबरठ्यावर आणून उभे केले. वारसा, निष्ठा आणि मते  यासाठी हे सगळे चालले आहे. आपल्या अंतर्गत लाथाळ्यातून हे राजकीय गोतावळे टिकू शकतील? शहाणे झालेले सुखवस्तू मतदार त्यांना गाडून तर टाकणार नाहीत? त्याचे भारतीय राजकारणावर भविष्यात काय पडसाद उमटतील?

 लालू प्रसाद यादव यांचा अभिजनविरोधी पवित्रा आणि इतर मागासवर्गीय तसेच मुस्लिमांच्या मतांवर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाची मदार आहे. तेजप्रताप आणि तेजस्वी या त्यांच्या मुलांमध्ये भांडणे लागली आहेत. घराण्यातील तमाशांना कंटाळलेल्या  आणि नोकऱ्यांसाठी आसुसलेल्या बिहारच्या तरुणांना भाजपचे विकासाचे आवाहन ओढून घेईल.  उत्तर प्रदेशमधील समाजवादी  पक्ष २०१६ सालच्या कौटुंबिक भांडणाचे परिणाम भोगत आहे. अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांना काढून टाकले. २०१७ सालच्या निवडणुकीत याची किंमतही मोजली. अखिलेश आता जातीवर आधारित राजकारणात आपल्या पक्षाचे बळ एकवटत आहे; परंतु उत्तर प्रदेशमधील शहरी युवक आता जातीपातीना कंटाळला असून त्याला कामांचा परिणाम हवा आहे. 

महाराष्ट्रात ग्रामीण भागातील जाळे आणि मराठा अस्मितेवर पोसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती ही दोलायमानच आहे. २०२३ साली अजित पवार गट फुटून भाजपला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव  तसेच पक्षाचे चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहिले. मराठा समाजाची बरीच मतेही त्यांच्याकडे गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणे ही लांबची गोष्ट असली तरी तसे झाल्यास तो पुन्हा किंगमेकर होईल आणि राष्ट्रीय पक्षांना आघाडीची गणिते बदलावी लागतील.

दलितांच्या सक्षमीकरणावर अवलंबून असलेली बहुजन समाज पार्टी मायावतींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी बंधू आनंद कुमार आणि पुतण्या आकाश यांना कारभारात हस्तक्षेप करू दिल्याने भाईभतीजेगिरीचीच लक्षणे दिसली. जाट व दलितांचा पाया हे या पक्षाचे भांडवल हळूहळू भाजपाच्या विकास आश्वासनांना प्रतिसाद देऊ लागले आहे. घराणेशाहीच्या ओझ्याखाली बसपा दबला गेला तर तो मतदार भाजपकडे जाईल. शहरी दलित  काँग्रेसकडे जातील.  उपराष्ट्रवादावर स्वार झालेल्या पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा किल्लाही डळमळता आहे. ममता बॅनर्जींच्या राज्यात पुतण्या अभिषेकला मिळालेले महत्त्व अनेकांच्या नजरेत खुपते.  तमिळनाडूत द्राविडी अस्मितेवर द्रमुक पोसला गेला.  करुणानिधींचे पुत्र एम के स्टालिन यांना सध्या तरी आव्हान नाही. उदयनिधी यांना ते वारस म्हणून तयार करत आहेत. आतून किंवा बाहेरून या प्रक्रियेला काही धक्का बसण्याची शक्यता नाही. असे असले तरी तामिळनाडूत आयटीच्या मार्गाने आलेली समृद्धी, शिकलेली तरुण पिढी मात्र घराणेशाहीला नाक मुरडणारी  आहे.  भारत राष्ट्र समिती, राजद, सपा, एनसीपी, बीएसपी, टीएमसी, डीएमके आणि पीएमके या पक्षांनीही गोतावळ्यातच पक्ष उभे केले. आता त्यांच्या कुटुंबातच कलह माजला आहे. 

समृद्धी आणि शिक्षण भारताच्या राजकारणाची संहिता पुन्हा लिहीत आहे. शहरी मतदाराला घराणेशाहीऐवजी कार्यक्षमता हवी आहे. जातीय आणि प्रादेशिक निष्ठा हा प्रादेशिक पक्षांचा आधार होता. तो आता कमकुवत झाला आहे. भारतातील भविष्यकालीन राजकारण राष्ट्रीय पक्षांच्या वर्चस्वाचे असेल. कारण प्रादेशिक पक्ष दुभंगतील. श्रीमंत, शहाणा आणि कौटुंबिक तमाशाला कंटाळलेला मतदार त्यांना सोडून जाईल. परंतु कौटुंबिक महत्त्वाकांक्षांच्या लढाईमुळे उद्ध्वस्त झालेल्या घराणेशाहीच्या ढिगाऱ्यांवर पाय रोवून उभे राहायला राष्ट्रीय पक्षांनाही काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील.