शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बाजार समित्यांच्या निकालांनी घालून दिले धडे!

By किरण अग्रवाल | Updated: May 7, 2023 12:32 IST

APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले.

 - किरण अग्रवाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर जरी लढल्या गेल्या नसल्या तरी, त्यात बहुसंख्य ठिकाणी आजी-माजी आमदारांनी घेतलेला थेट सहभाग पाहता यातून त्यांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेल्याचे म्हणता यावे. 

लांब पल्ल्याचे राजकारण करायचे तर वेळोवेळी आपली उपयोगिता व प्रभाव सिद्ध करावा लागत असतो. यात उपयोगिता जशी दुसऱ्यासाठी कामी येणे अपेक्षित असते तसेच प्रभावही इतरांसाठी उपयोगी पडणे गरजेचे असते. तसे घडून आले तर जनमानसावर आपोआपच प्रभाव पडल्याखेरीज राहत नाही व नाही घडले तर सुधारणेची गरज तरी लक्षात येऊन जाते. बाजार समित्यांच्या निवडणुकांनी याचसाठीची संधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मांडवाखालून जाऊ इच्छिणाऱ्यांना दिली म्हणायचे, कारण मी मी म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती व त्यांच्या पक्षांनाही या निवडणूक निकालांनी बरेच धडे घालून दिले आहेत. 

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले. एकीकडे राज्यातील राजकीय धुमशान सुरू असताना दुसरीकडे या निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील वर्चस्ववादाचे राजकारण रंगलेले बघावयास मिळाले. राजकीय पक्ष यात थेट सहभागी नव्हते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी पक्षानुकुल आघाड्या करीत तर काही ठिकाणी पक्ष विरहित हातमिळवणी करीत निवडणुका लढविल्या. त्यांच्या पाठीशी आजी-माजी आमदारांनी आपापले बळ उभे केले होते, त्यामुळे जो काही निकाल आला तो संबंधितांनाही पथदर्शक ठरून गेला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक प्रचारात तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याच होत्या, परंतु आता जय पराजयावरूनही राजकारण पेटले आहे ज्याची चुणूक चिखलीत दिसून येते आहे. तेथील आमदार सौ. श्वेता महाले व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात यानिमित्ताने सुरू झालेल्या कलगीतुऱ्यातून आगामी निवडणुकांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट व्हावे. कार्यकर्त्यांच्या जय पराजयाचे सुख दुःख वाटून घेण्याऐवजी नेते जर आपलाच अहम कुरवाळत आपल्याच राजकीय लढायांवर फोकस करणार असतील तर कार्यकर्त्यांचे बळ त्यांच्या पाठी टिकून कसे राहणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणारा आहे. 

राज्यातील महाआघाडीच्या प्रयोगानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्येही काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) नेते कार्यकर्ते एकत्र आलेले बघावयास मिळाले व जेथे जेथे असे झाले तेथे अधिकतर ठिकाणी त्यांना यश लाभल्याचेही दिसून आले; ही बाब त्या सर्व संबंधितांचा उत्साह दुणावणारी तर भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांना अलर्ट करणारी आहे. अर्थात आतापर्यंत फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणाऱ्या बाजार समित्यांमध्ये यंदा आणखी काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही आपली जागा बनविली हेही नसे थोडके. अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही काही ठिकाणी नशीब आजमावून बाजार समित्यांमध्ये प्रवेश मिळवला. 

अकोला जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे तर, अकोल्यात राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या नेते कार्यकर्त्यांसमवेत भाजपाचे कार्यकर्ते  आलेत; तर बार्शीटाकळीतही तशीच साथ बघावयास मिळाली. बाळापुरात भाजपा व वंचितचे नेते सोबत होते तर तेल्हाऱ्यात वंचित व महाआघाडी सोबत होती, म्हणजे येथे पक्षविरहित पॅनलच्या माध्यमातून 'सबका साथ, सबका विकास' दिसून आला म्हणायचे. यात आ. रणधीर सावरकर व आ. नितीन देशमुख यांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसाठी ताकद पणाला लावलेली दिसून आली, मात्र दर्यापुरात सहभाग नोंदवणारे आ. प्रकाश भारसाकळे अकोटात तटस्थ राहिले, तर आ. हरीश पिंपळे यांचाही मूर्तिजापुरात थेट सहभाग दिसून आला नाही. सर्वांशीच सारखी जवळीक व तितकीच दुरताही, अशा भूमिकेतून आपली वाट निर्धोक राखण्याचा प्रयत्न यामागे असावा. 

वाशिम जिल्ह्यात 6 पैकी 4 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अमित झनक यांच्यासह त्यांच्या सहकारींचे वजन वाढणे स्वाभाविक आहे. मालेगाव, मंगरूळपीर, मानोऱ्यात आघाडीने एकहाती विजय मिळवला. रिसोडमध्ये ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांना सत्ता राखण्यासाठी बरेच झुंजावे लागले. अलीकडेच त्यांनी भाजपा प्रवेश केलेला असल्याने या पक्षासाठी ही बाजार समिती बोट धरायला हाती आली खरी, परंतु जिल्ह्यातील एकूण निकाल पाहता भाजपा आमदार राजेंद्र पाटणी व लखन मलिक यांना येथे करेक्शन करावे लागेल. 

बुलढाण्यातही 10 पैकी 7 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. आ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना हे निकाल सुखावणारे आहेत. आमदार राजेश एकडे यांनी मलकापूर गमावले असले तरी, होमपीच नांदुरा राखले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांनी बुलढाण्यात करिष्मा कायम राखला तर खा. प्रतापराव जाधव यांनी त्यांचे मेहकर, लोणार राखले, मात्र यंदा त्यांचाही कस लागला. चैनसुख संचेती यांनी मलकापूर एकहाती राखून आपण पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचा जणू संदेशच दिला आहे. जळगाव जामोद, शेगाव, खामगाव व चिखलीतील निकाल पाहता भाजपाचे आमदार त्रयी डॉ संजय कुटे, आकाश फुंडकर व श्वेता महाले यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. 

सारांशात, बाजार समितीच्या माध्यमातून संबंधितांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेली आहे. हेच वा असेच यापुढेही घडून येईल असे म्हणता येऊ नये, कारण प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात; परंतु या निकालाचे कल बघता संबंधितांना यातून धडा नक्कीच घेता यावा.