- अनन्या भारद्वाज(मुक्त पत्रकार)‘आय डू माय वर्क टू सपोर्ट माय सर्फिंग ॲण्ड ओशन स्पोर्ट हॉबीज !’ असं तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहाल का? पण पॅडी उपटनला भेटा. ते म्हणतात, माझ्या रेझ्युमेची शेवटची ओळच ही आहे. मी कामच त्यासाठी करतो ! - कोण हे पॅडी उपटन?
२०११ साली भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे ते मेंटल हेल्थ कोच होते. आता अलीकडेच हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं तेव्हाही भारतीय संघाचे मानसिक आरोग्य प्रशिक्षक उपटनच होते. आणि आता डी. गुकेश विश्वविजेता झाला तेव्हाही शेवटचे काही महिने पॅडींनी त्याच्यासोबत काम केलं.
पॅडी म्हणतात, ‘शारीरिक कौशल्य, क्रीडा कौशल्य, फिटनेस, नियोजन, स्ट्रॅटेजी सगळं महत्त्वाचंच असतं; पण मोक्याच्या क्षणी अनेक खेळाडूंची कामगिरी कोसळते, ते क्षुल्लक चुका करून हरतात. असं होतं कारण मन ऐनवेळी दगा देतं. मनाचं हे दगा देणं खेळाडूंच्याच बाबतीत घडतं असं नाही तर ते सर्वसामान्य कुणाही माणसाच्या संदर्भात घडतं. त्यासाठी मनाच्या आरोग्यावर काम करायला हवं!’ पण मुद्दा हाच की हल्ली फॅशन आहे, मनात सतत पॉझिटिव्ह विचार करा, सतत आनंदी राहा म्हणण्याची; पण ते खरंच शक्य असतं का?
पॅडी म्हणतात, आधी हे मान्य करायला हवं की मानसिक असुरक्षितता आपल्या सगळ्यांना आहे. आपल्याला भीती वाटते, कामगिरीचा ताण येतो, असूया वाटते, नकारात्मक विचारच मनात जास्त येतात. असं असू नये हा आदर्शवाद झाला; पण ‘असं’ आहे ते मान्य करू! त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण सगळेच ‘व्हल्नरेबल’ आहोत हे मान्य करू. सगळेच मोडून पडू शकतो कधीही-कितीही वेळा! एकदा हे स्वीकारलं की त्यावर मार्ग काढता येतो!’ पॅडी म्हणतात, ‘एक सोपी गोष्ट कायम लक्षात ठेवायची- फक्त ३ शब्द- कीप इट रिअल ! चांगली झोप, योग्य आहार, व्यायाम, जवळची माणसं-मित्र त्यांच्याशी गप्पा, थोडं निसर्गाजवळ जाणं.. जिंकण्याचा प्रवास इथूनच सुरू होतो.’