सर्वच मतदारसंघांत मतविभाजनाची चिंता

By किरण अग्रवाल | Published: April 7, 2024 11:33 AM2024-04-07T11:33:32+5:302024-04-07T11:48:48+5:30

Loksabha Election 2024 : अकोला व बुलढाण्यात स्वकीय, सहयोगी पक्षीयांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी रोखता येईल की नाही यावर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत़

The issue of vote division in Akola and Buldhana is a headache | सर्वच मतदारसंघांत मतविभाजनाची चिंता

सर्वच मतदारसंघांत मतविभाजनाची चिंता

- किरण अग्रवाल

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननीची प्रक्रिया आटोपली असून, आता निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेल्या स्वकीयांची मनधरणी कुठे कुठे आणि कितपत सफल होते याबाबतची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे, विशेषतः अकोला व बुलढाण्यात यामुळे होऊ शकणाऱ्या मतविभाजनाचा धोका दुर्लक्षिता येणारा नसून, सहयोगी पक्षांमधील नाराजीही उघड होणारी आहे.

अर्ज माघारीसाठी अवघा एकच दिवस हाती असून, स्वकीयांबरोबरच इतरही काही मातब्बरांनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकल्याने प्रस्थापित पक्ष व उमेदवारांचे धाबे दणाणलेले आहे. अकोल्यात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले भाजपचे नेते, दोनवेळा आमदार राहिलेले नारायणराव गव्हाणकर तसेच बुलढाणा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, भाजपचे नेते, तीनवेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांच्या माघारीचे काय, हे अजून गुलदस्त्यात आहे. गव्हाणकर यांना अकोल्यातून भाजपची उमेदवारी अपेक्षित होती ती मिळालेली नाही. बुलढाण्यात महाआघाडी अंतर्गत काँग्रेसला, तर महायुती अंतर्गत भाजपला जागा सुटणे अपेक्षित होते; परंतु तसे न झाल्याने पाटील व शिंदे यांनी अपक्ष उमेदवाऱ्या दाखल केल्या आहेत. या तिघांची समजूत काढली जाईलही कदाचित, पण तसे झाले अगर न झाले तरी संबंधितांची व त्या त्या पक्षांमध्ये दिसून येत असलेली नाराजी खरेच व पूर्णांशाने दूर होऊ शकेल का? हाच खरा प्रश्न आहे.

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात मुख्यत्वे तिरंगी लढत होऊ घातली आहे, पण गव्हाणकर रिंगणात कायम राहिले तर ती चौरंगीही बनेल. अर्थात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात येऊन आंबेडकर यांच्यासाठी अजूनही चर्चेचे दार उघडे असल्याचे सांगितले असले आणि तिकडे दिल्लीत पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक यांनीही त्यासाठीची तयारी दर्शविली आहे. मात्र खुद्द काँग्रेस व वंचितमध्येही याकडे गांभीर्याने बघितले जाताना दिसत नाही, त्यामुळे नेमके कोणाच्या मताचे विभाजन होणार हाच यंदा अकोल्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

बुलढाण्यात स्वकीयांची मनधरणी सफल झाली तरी शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव व उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांच्यात शेतकरी युवा नेते रविकांत तुपकर, सहकारातील नेते संदीप शेळके यांच्या अपक्ष उमेदवारीने रंग भरले गेले आहेत. वंचितचे वसंत मगर यांचीही उमेदवारी आहेच. उमेदवारांशी निगडित प्रादेशिक अस्मितेचे मुद्देही येथे परिणामकारक ठरत आले आहेत. त्यादृष्टीनेही आतापासूनच आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे विविध कारणातून होणारे मत विभाजन सर्वांसाठीच डोकेदुखीचे ठरणार आहे.

यवतमाळ सोबतच्या वाशिममध्ये तर महायुतीमधील शिंदेसेनेच्या राजश्री पाटील व महाआघाडीतील उद्धवसेनेचे संजय देशमुख हे दोघे यवतमाळकडील असल्याने वाशिमकरांचा उत्साह काठावर आलेला दिसत आहे. वंचितनेही यवतमाळकडीलच सुभाष पवार यांना अगोदर उमेदवारी जाहीर केली होती, परंतु ऐनवेळी वाशिम जिल्ह्यातील अभिजित राठोड यांचे नाव नक्की झाल्याने त्यांनी अर्ज दाखल केला होता. छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला, अन्यथा त्यांच्यामुळे वाशिम जिल्ह्यातील मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन घडू शकले असते. काही स्थानिक अपक्ष रिंगणात आहेत. माघारी नंतर त्यातील किती कायम राहतात व ते कितपत मत विभाजन घडवू शकतात हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी पक्षीय उमेदवारांसाठी स्थानिक नेतृत्व किती निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे मेहनत घेतात यावरही सारे अवलंबून राहणार आहे.

सारांशात, स्वकीयांची कायम राहू शकणारी बंडखोरी असो, की अपक्षांची उमेदवारी; यातून घडणारे मतविभाजन मातब्बरांच्या जय-पराजयाचे समीकरण बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकते. सर्व शक्ती पणास लावलेल्या उमेदवारांना व त्यांच्या पक्षांना त्यामुळेच धडकी भरणे स्वाभाविक ठरले आहे.

Web Title: The issue of vote division in Akola and Buldhana is a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.