- श्रीमंत माने । कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरसुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरची सगळी लढाई लढवण्यात आली ती सोशल मीडियावरच! भाजपसह ‘एनडीए’मधील काही घटकपक्षांनी हा ‘बिहारी’ अस्मितेचा मुद्दा बनवणे, मुंबईऐवजी पाटण्यात नोंदवलेला पहिला एफआयआर, मग सीबीआय चौकशीची मागणी, त्याआधीच ‘ईडी’ने स्वत:हून तपास सुरू करणे हे सारे आता सर्वांना पाठ आहे. रिया चक्रवर्ती, सुशांतची आर्थिक लूट, मादक द्रव्याचे सेवन व व्यापार, दिशा सॅलियनच्या मृत्यूप्रकरणातील संशय अशा सगळ्या कंड्या पिकविण्यात आल्या, त्या प्रामुख्याने सोशल मीडियावरच. रोज नवी स्टोरी, विविध वृत्तवाहिन्यांवर रोज आक्रस्ताळ्या चर्चा ! या सगळ्यांमागे एक सुनियोजित षडयंत्र असावे, असा संशय व्यक्त होत होताच. आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या डॉक्टरांचा ‘सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत’ हा अहवाल आणि सीबीआयने त्याला दिलेला दुजोरा, यामुळे हा मधला लटका जनाक्रोश केवळ कल्पनाविलास होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोज ही आक्रमणे होत असताना कमालीचा संयम दाखविणारे मुंबई पोलीस अन् झालेच तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. ठाकरे पिता-पुत्र अजून व्यक्त झालेले नाहीत. परंतु, मुंबई पोलिसांनी मात्र षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी पावले उचलली आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीची मोहीम चालविण्यासाठी, आयुक्त परमवीरसिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चिखलफेक करण्यासाठी सोशल मीडियावर जवळपास ८० हजार बनावट खाती तयार करण्यात आली. केवळ भारतातून नव्हे तर जगातल्या अन्य देशांमधूनही त्या खात्यांवरून बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आल्या. टिष्ट्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत काही महिने सुशांतसिंहला न्याय मागणारे हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले. मुंबई पोलिसांची पद्धतशीर बदनामी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आता गुन्हे दाखल करून या षडयंत्राचे सूत्रधार शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियावरील बनावट खाती हे खरेच डोकेदुखीचे प्रकरण आहे. ही बनावट खाती विशिष्ट हेतूंनी तयार केली जातात. हेतू पूर्ण झाला, की ही औटघटकेची खाती बंद होतात. यात दोन प्रकार आहेत. एक ‘ट्रोलिंग’! दुसºया प्रकारात ते खाते ‘इन्फ्लुएन्शियल’ असल्याचे दाखविण्यासाठी फॉलोअर्स, लाईक, एंगेजमेंट हे सारे कृत्रिम पद्धतीने पैसे मोजून फुगवले जाते आणि सोशल मीडियावरील जाहिरातींसाठी त्या नसलेल्या प्रभावाचा वापर केला जातो. ‘ट्रोल’ म्हणता येईल अशा पहिल्या प्रकाराचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी संबंध आहे. जस्टीस फॉर सुशांत सिंह, वुई आर वुईथ एसएसआर, सुशांत ट्रूथ एक्सपोज्ड असे हॅशटॅग ट्रेंड करण्यासाठी अशा हजारो बनावट खात्यांचा साधार संशय आहे. ही खाती ओळखणे तितकेसे अवघड नाही. उदा. ट्विटरवरील अशा खात्यांना फॉलोअर्स अजिबात नसतात, ते कुणाला फॉलो करीत नाहीत, तरी ट्विर्ट्सची संख्या मात्र हजारोंच्या घरात असते. अशी काही खाती व्हेरिफाइड म्हणजे ‘ब्लू टिक’ वाली असतात अन् तरीही सतत विद्वेष पसरविणाºया, जाती-धर्मात तेढ निर्माण करणाºया पोस्ट टाकत राहतात.
Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांनी सायबर माफियांना धडा शिकवावाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 06:15 IST