हरिष गुप्ता ‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीला एक आठवडाही उरलेला नाही, त्या पार्श्वभूमीवर मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकन विद्वानांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. भारतातील विद्यमान नेतृत्वाविषयी दोन तऱ्हेचे मतप्रवाह आढळून येत आहेत. एक मतप्रवाह मोदींच्या विरोधात आहे. त्यापैकी १२० नागरिकांनी अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना एक निवेदन पाठविले आहे. हे निवेदन मोदींविषयीच्या द्वेषाने भरलेले आहे. मोदींच्या अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटीविषयी जो उत्साह दाखविण्यात येत आहे त्याची या पत्रकात निंदा करण्यात आली आहे. मोदींनी डिजिटल इंडियाविषयी जो प्रचार चालविला आहे त्याच्या मूळ हेतूविषयी शंका व्यक्त करण्यात आली आहे. भारताकडे माहिती सुरक्षित ठेवण्याचे तंत्रज्ञान नसल्यामुळे या तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जाऊ शकतो, असेही पत्रकात म्हटले आहे. डिजिटल पद्धतीचा वापर हेरगिरीसाठी केला जाऊ शकतो असे स्पष्ट करून भारतीय पंतप्रधानांच्या विरुद्ध काँग्रेस आणि डावे पक्ष जे आरोप करीत असतात, त्याचीच पुनरावृत्ती या पत्रकात करण्यात आली आहे. मोदींना २००५ ते २०१४ या काळात अमेरिकेने व्हिसा का नाकारला होता, तो इतिहासही या पत्रकात नमूद करून शिष्टाचाराच्या मर्यादांचे एक प्रकारे उल्लंघन करण्यात आले आहे.मोदी हे मानवी हक्कांचा अनादर करण्याविषयी प्रसिद्ध असल्याने सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजकांनी सावधगिरी बाळगावी, असा हास्यास्पद वाटणारा इशाराही देण्यात आला आहे. सिलिकॉन व्हॅलीने आपल्या कॉर्पोरेट जबाबदारीच्या नियमांचे पालन करावे असे सांगताना सिलिकॉन व्हॅलीच्या पूर्वेतिहासाची एकप्रकारे थट्टा करण्यात आली आहे. वास्तविक अमेरिकेच्या लष्कराच्या मदतीने सिलिकॉन व्हॅलीने आॅप्टीकल फायबर ब्रॉडबॅन्ड नेटवर्कची निर्मिती केली आहे. या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेचे प्रशासन कुणाच्याही इंटरनेटची माहिती क्षणात हस्तगत करू शकते. हे केवळ अमेरिकेतच नाही तर अन्य राष्ट्रातही करणे अमेरिकेला शक्य झाले आहे. मोदी विरोधी या पत्रकावर ज्यांच्या सह्या आहेत त्यांनी या पूर्वीच्या काँग्रेस सरकारकडून स्वत:साठी अनेक सन्मान प्राप्त केलेले आहेत. पण या पत्रकावर मोदींचे कट्टर विरोधक असलेले नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांची सही मात्र नाही! अमर्त्य सेन यांचे गांधी कुटुंबाशी असलेल संबंध फार जुने आहेत. राहुल गांधींना अमेरिकेच्या विद्यापीठाची एम.फिल. मिळवून देण्यात सेन यांचाच हात होता. पत्रकावर सही करणाऱ्यात अर्जुन अप्पादुराई आणि त्यांचे काही सहकारी आहेत. त्यांच्या चीन-भारत प्रकल्पासाठी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीच निधी मिळवून दिला होता. तेव्हा या मोदीविरोधी प्रचारामागे न दिसणारे काही राजकीय हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सही करणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्वानात कला व समाज विज्ञान शाखेच्या विद्वानांनाच प्रामुख्याने समावेश आहे.याउलट विज्ञान शाखेच्या १५० हून अधिक विद्धानांनी मोदींचे स्वागत करणारे पत्रक काढले आहे. त्यांच्या सिलिकॉन व्हॅलीतील आगमनाने लोकशाहीच्या सहभागाचे नवे डिजिटल युग अवतरत आहे असे त्यांनी म्हटले आहे. या पत्रकावर सही करणाऱ्यात अनेक प्रोफेसर, अनेक शैक्षणिक संस्थांचे डीन, तसेच इंजिनियरिंग, मेडिसीन, व्यवसाय क्षेत्रातील शिक्षणप्रेमी आहेत. मोदींचा सिलिकॉन व्हॅलीतील दौरा २६ सप्टेंबरला सेंट जोजे येथील ‘डिजिटल इव्हेन्ट’ने सुरू होणार आहे. या भेटीविषयी अमेरिकेत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. सिलिकॉन व्हॅली भारताकडे वेगळ्या दृष्टीने बघत आहे, कारण भारत हा नवनिर्मित करणारे राष्ट्र म्हणून उदयास येत आहे असे त्याला वाटते. मेक इन इंडियापासून भारताचा प्रवास मेड इन इंडियापर्यंत होऊ शकतो. जी राष्ट्रे नवे काही करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यात ९० गुण मिळवून भारत पाचव्या स्थानावर आहे. अन्य राष्ट्रात अमेरिका, द. कोरिया, चीन आणि ब्राझील यांचा समावेश आहे. भारतात स्वत:ची निर्मिती केंद्रे सुरू करून मायक्रोसॉफ्ट किंवा अॅपल हे नवीन पेटन्ट घेण्यास प्रोत्साहन देऊ शकतात.पंतप्रधान या नात्याने मोदींची कारकीर्द स्वच्छ आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. पण ते भारताला शेतीप्रधान अर्थव्यवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताला आधुनिक राष्ट्र बनविण्याच्या हेतूनेच मोदी हे सिलिकॉन व्हॅलीला भेट देत आहेत. मोदींच्या या दौऱ्याविषयी अमेरिकेत दिसून येणारा उत्साह हा साहजिकच भारतातील जुन्या युगाच्या प्रतिनिधींना चिंता निर्माण करणारा ठरला आहे.
मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे समर्थक व विरोधक
By admin | Updated: September 21, 2015 22:45 IST