शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
3
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
4
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
5
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!
6
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
7
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
8
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
9
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
10
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
11
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
12
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
13
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
14
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
15
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
16
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
17
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
18
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
19
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
20
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड

विशेष संपादकीय: शंभर वर्षांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 06:20 IST

आपल्या देशाचा विचार केला, तरी या शंभर वर्षात किती स्थित्यंतरे झाली! पारतंत्र्य सरले, स्वातंत्र्य मिळाले.

‘तुमच्या पत्रकारितेला सत्य आणि साहस दोन्हीची साथ असली पाहिजे.  ती इतकी पक्की हवी की मी ज्या खात्याचा मंत्री आहे, त्यातल्या गैरकारभाराबद्द्लही जाब विचारण्याची हिंमत जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमच्यात असली पाहिजे!’आपल्या वृत्तपत्रात काम करणाऱ्या  सहकारी पत्रकारांना हे इतक्या स्पष्टपणे सांगणारा कुणी एक निस्पृह नेता या महाराष्ट्रात होऊन गेला, यावर सहजी कुणाचा विश्वास बसू नये असा राजकीय कोलाहल आसपास असताना ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीचा आज समारोप होतो आहे. अखंड, अविरत कालचक्रात शंभर वर्षे हा तसा उलट्या घड्याळातून गळणारा वाळूचा एक कण! - पण व्यक्ती, संस्था आणि एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रांताचा विचार करता किमान चार पिढ्यांना कवेत घेणारा हा प्रदीर्घ कालावधी!

आपल्या देशाचा विचार केला, तरी या शंभर वर्षात किती स्थित्यंतरे झाली! पारतंत्र्य सरले, स्वातंत्र्य मिळाले. मग स्वराज्याचे सुराज्य करण्याचा नवा लढा उभारावा लागला. विस्कळीत, विसविशीत झालेला देश नव्याने उभा करण्याचे आव्हान डोंगराएवढे होते. स्वातंत्र्योत्तर  भारतातल्या राजकीय नेत्यांनी-सामाजिक कार्यकर्त्यांनी -विचारवंत आणि सामान्य नगरिकांनीही त्या डोंगराला हात घालण्याची हिंंमत दाखवली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी  सर्वस्व अर्पण करायची तयारी ठेऊन आरपारच्या लढ्यात उतरलेल्या पिढीतले कार्यकर्ते  स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्ताधारी नेते झाले, त्या सत्तेला त्यागाचा स्पर्श होता, मूल्यांचे कोंदण आणि कर्तव्याची बैठक होती.

राजकारण करायचे ते कशासाठी आणि सत्ता राबवायची ती कोणासाठी या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होती. प्रश्न अगणित होते, पर्याय मर्यादित होते अणि साधनसंपत्ती तर कधीच पुरेशी नव्हती, तरीही या पिढीने काळाचे आव्हान स्वीकारले. भारतासारख्या विशालकाय आणि परस्पर विरोधी वास्तवाच्या धाग्यांनी गुंफलेल्या देशाच्या व्यवस्थेमध्ये कालानुरुप बदल करणे हे कठीण खरेच, पण व्यवस्था निर्माण करणे तर त्याहुनही दुष्कर!  हे व्यवस्था-निर्माणाचे काम ज्यांनी जीव तोडून केले, त्या पिढीचे प्रतिनिधी होते जवाहरलाल दर्डा! बाबुजींच्या एकूण जीवनप्रवासाकडे आज पाहिले, की त्यातल्या सतत स्थित्यंतरांचे प्रवाह केवळ थक्क करतात!

सव्वादोनशे वर्षांपूर्वी  दूरवरच्या मारवाडातून पोटापाठी भ्रमंती करत येऊन त्याकाळच्या वऱ्हाडात स्थिरावलेल्या कुटुंबातला, लहानपणीच वडिलांच्या आधाराचे छत्र हरपलेला मुलगा... महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी  झपाटून जातो, महात्माजींच्या  हाकेला  ‘ओ’ देऊन देशाच्या  स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतो,  स्वत:च्या संसाराला कसला आधार नसताना देशाचा संसार करण्याचा ध्यास धरतो आणि ज्यासाठी अवघे तारुण्य उधळले; ते  स्वातंत्र्य  मिळाल्यावर अचानक निर्माण झालेल्या पोकळीत अर्थ भरण्यासाठी आपली वाट आपण शोधतो, सत्तेत सहभागाची संधी मिळाल्यावर देशबांधणीसाठी पुन्हा स्वत:ला झोकून देतो..

महाराष्ट्र राज्याच्या उभारणीत पायाचे दगड घालताना अविरत कष्ट करतो, सत्तापदी असताना दूरदृष्टीने केलेल्या धोरणनिश्चितीमुळे राज्याच्या औद्योगिक, शैक्षणिक प्रगतीचा शिल्पकार ठरतो... आणि त्याचवेळी समांतर रेषा असावी असा आपल्या व्यवसायाचा पायाही घालतो...मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता सत्तापदे आणि पत्रकारिता यांच्यामधला नाजूक तोल किती कसोशीने सांभाळत येतो याचे नवे मानदंड निर्माण करतो, चोख सचोटीने आपला व्यवसाय  उभारता-वाढवता यावा यासाठी अपरिमित कष्ट घेतो आणि ग्रामीण भागातून आलेल्या तरुण-तरुणींच्या हाती लेखणी देऊन त्यांच्या आधाराने खेडोपाडीचे प्रश्न सत्तेच्या दरबारात पोचवण्याची व्यवस्था उभी करतो... हे सारे किती विलक्षण आहे! हे सारे करत असताना बाबुजींच्या वाट्याला आलेला काळ गुंतागुंतीचा होता. मूल्ये आणि व्यवहारवाद यांची रस्सीखेच त्यांनी अनेकदा अनुभवली. त्यांच्या बाजूने दान पडले तसे अनेकदा अनेक गोष्टी त्यांच्या विरोधातही गेल्या. प्रसंगी अपमान, व्यावसायिक कुरघोडीतून आलेला मत्सर, द्वेष हे सारे त्यांना सोसावे लागले.

राजकारणात स्वपक्षाशी निष्ठा राखताना कसोटी पाहणारे प्रसंग आले. या साऱ्याचा आज तटस्थतेने विचार केला, तर थक्क व्हायला होते... कधीकधी अचंबा वाटतो. वाटते, ही सगळी वाटचाल त्यांनी कशी केली असेल? त्यासाठीचे आत्मबळ कुठून आणले असेल? कायम महानगरी तोंडवळा असलेल्या पत्रकारितेला ग्रामीण भागाच्या शेतीभातीतल्या मुळांशी जोडण्याचे श्रेय तर नि:संशय बाबुजींचेच! देशभरातील प्रादेशिक पत्रकारितेचा रूढ साचा मोडून काढत  ‘लोकमत’ने प्रथम  ‘खालून वर’ जाण्याचा प्रयोग केला. तोवरच्या माध्यमांनी त्यांच्या लब्धप्रतिष्ठीत वर्तुळाबाहेर ठेवलेले पहिल्या पिढीचे वाचक आणि सतत शहरी विचारवंतांच्या म्हणण्याकडे आस लावून बसणेच प्रारब्धात लिहिलेल्या ग्रामीण लेखक-पत्रकारांसाठी  ‘लोकमत’ हा किती मोठा आधार होता आणि आहे, हे ज्यांनी अनुभवले; त्यांनाच उमगेल!

राजकारणाच्या धकाधकीत प्रासंगिक मोह बाजुला सारून सदैव पक्षनिष्ठा जपण्याचे व्रत बाबुजींनी पूर्णत्वाला नेले ते त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्वातल्या सुसंस्कृत रसिकतेच्या बळावर! ते सदैव शांतपणे आपले काम करीत राहीले.बाबूजींना ज्यांनी टोकाचा विरोध केला, त्यांच्या कौटुंबिक अडचणीत बाबूजीच त्यांच्यामागे उभे राहिले, त्यांच्या डोक्यावर आधाराचा हात ठेवून म्हणाले, काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर आहे आणि कायम राहीन ! हे एका प्रकारचे क्षमेचे अध्यात्मच ! सत्तापदे गेली, अधिकाराच्या खुर्च्या सोडल्या, तेव्हाही निगुतीने वाढवलेल्या झाडापेडांच्या आजुबाजूने शीळ घालीत फेरफटका मारण्याचे त्यांचे अध्यात्म कधी डळमळले नाही.आज बाबुजींच्या जन्मशताब्दीची सांगता होत असताना त्यांच्या आठवणी आमच्या सोबत आहेत; तसेच त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर अविरत चालत राहाण्याचे समाधानही! त्यांच्या स्मृतींचा स्नेहल प्रकाश आमच्या पायाखालची वाट नेहमी उजळलेली ठेवेल, हे नक्की!

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाLokmatलोकमत