शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

By विजय दर्डा | Updated: April 29, 2024 03:37 IST

भाषेचे पावित्र्य जणू इतिहासजमाच झालेले आहे! नेत्यांच्या जिभा बेलगाम सुटल्या आहेत आणि शत्रुत्वाचे वादळ उठले आहे.

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

देशात सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे, हे आपण सर्व जाणतो. निवडणूक प्रचाराच्या वेळी धार्मिक प्रतीकांचा वापर करता येत नाही; तसेच धर्म, संप्रदाय आणि जातींच्या आधारे मत मागण्याचे आवाहनही करता येत नाही. भेदभाव निर्माण होऊन वैमनस्य पसरेल अशी कोणतीही गोष्ट या काळात करता येत नाही; परंतु सध्या जे काही चालले आहे, ते लपून राहिलेले नाही. नेत्यांच्या जिभा बेलगाम सुटल्या आहेत आणि शत्रुत्वाचे वादळ उठले आहे. निवडणुकीत एकमेकांच्या धोरणावर टीका  होऊ शकते आणि झालीही पाहिजे. एकमेकांवर भीषण आणि घाणेरडे आरोप मात्र करता येत नाहीत; परंतु सध्या जे चालले आहे, त्याने भारताची सामाजिक वीण मुळापासून उसवायला घेतली आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता उल्लंघनाच्या २०० पेक्षा जास्त तक्रारी आल्या असल्याचे आयोगाची आकडेवारी सांगते. आयोगाच्या म्हणण्यानुसार त्यांपैकी १६९ तक्रारींवर कारवाई केली गेली. भाजपाकडून ५१ तक्रारी आल्या. त्यांतील ३८ प्रकरणांवर कारवाई झाली. काँग्रेसकडून ५९ तक्रारी आल्या; त्यांपैकी ५१ तक्रारींवर कारवाई केली गेली. अन्य पक्षांकडून ९० तक्रारी आल्या आणि त्यांपैकी ८० प्रकरणांत कारवाई केली गेली. हे आकडे वाढतच चालले आहेत.

या निवडणुकीत नेते जी  भाषा वापरत आहेत, त्यांतील वाक्ये उदाहरणादाखल येथे उद्धृत करणेही शक्य नाही. मी लहानपणापासून राजकारणाचे सुसंस्कृत रूप पाहिले असून, स्वतः राजकीय जीवनात त्याचे पालनही केले आहे. येथे मी दोन घटनांचा विशेषकरून उल्लेख करू इच्छितो. माझे बाबूजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध प्रचारसभेसाठी अटलबिहारी वाजपेयी यवतमाळला येणार होते. त्या काळात मोठे नेतेही रेल्वेने प्रवास करत असत. कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करत. रेल्वेतून उतरल्यानंतर गंतव्यस्थळी मोटारीने जात. त्या वेळी मोटारीही एकट्यादुकट्याच असत. अटलबिहारींना धामणगावहून यवतमाळला आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी ज्या मोटारीची व्यवस्था केली होती, ती नादुरुस्त झाली. स्थानिक नेत्यांनी बाबूजींना फोन केला, ‘भैयाजी, आपली मदत पाहिजे. आमची मोटार नादुरुस्त झाली आहे आणि १५ मिनिटात रेल्वे येऊन पोहोचेल!’ - बाबूजींना सर्व लोक ‘भैयाजी’ म्हणत असत.

बाबूजी म्हणाले, ‘काळजी करू नका, मोटार पोहोचेल.’ बाबूजीनी बिर्ला जीनिंग मिलच्या भट्टड यांना फोन केला. भैयाजी अटलबिहारींसाठी मोटार पाठवायला सांगत आहेत, हे लक्षात येताच भट्टड यांना आश्चर्यच वाटले. बाबूजींनी कपाशीचा व्यवसाय करणाऱ्या जयरामदास भागचंद यांनाही फोन करून मोटार पाठवायला सांगितले. दोन्ही मोटारी धामणगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. अटलजींनी विचारले की, या दोन गाड्या कशासाठी? त्यांना असे सांगण्यात आले की, या गाड्या दर्डाजींनी पाठवल्या आहेत. दोन अशासाठी की, एक नादुरुस्त झाली तरी आपण वेळेवर सभेच्या ठिकाणी पोहोचू शकाल. ज्यांच्याविरुद्ध प्रचार करायला आपण आलो त्यांनीच गाडी पाठवली हे पाहून अटलजी थक्क झाले. सभेनंतर बाबूजींना भेटायला ते आमच्या घरीही आले होते.

आणखी एक घटना सांगतो. बाबूजींच्या निवडणूक प्रचारकाळात मी त्यांच्याबरोबर असायचो. एकदा यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातून आम्ही चाललो होतो.  रस्त्यात बाबूजींना अचानक रस्त्याच्या कडेला बुचकेजी उभे दिसले. ते बाबूजींच्या विरुद्ध निवडणूक लढवत होते. बाबूजींनी मोटार मागे घेतली आणि विचारले की, काय झाले? बुचकेजींनी सांगितले की, त्यांची मोटार खराब झाली आहे. बाबूजींनी त्यांना मोटारीत बसवले आणि त्यांच्या सभेच्या ठिकाणी नेऊन सोडले.

वैचारिक पातळीवर नेत्यांमध्ये मतभिन्नता असायची; परंतु ते एक दुसऱ्याचा सन्मान करत असत. मला आठवते, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, मधू लिमये.. आदी अनेक नेते बाबूजींकडे येत असत. मीसुद्धा राजकीयदृष्ट्या दुसऱ्या विचारप्रणालीच्या लोकांशी मैत्री राखून असतो. सांगण्याचा मुद्दा हा की, मतभिन्नता असावी; परंतु मनभेद असता कामा नयेत. तथापि आज प्रचाराची पातळी ज्या प्रकारे घसरली आहे, त्यातून लोकशाहीच्या मुळांना धक्का पोहोचत आहे. आपण एक दुसऱ्याचे कितीही प्रखर टीकाकार असलो तरी आपली भाषा नेहमीच मर्यादशील राहिली पाहिजे. त्यासाठी प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा एक शेर मला समर्पक वाटतो :

दुश्मनी जम कर करो  लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएँ  तो शर्मिंदा न हों...

आपण मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि कर्मयोगी भगवान श्रीकृष्णाच्या भूमीवरचे लोक आहोत. आपण स्वतःला विचारले पाहिजे की, त्यांच्या आचरणाचे पालन आपण करतो आहोत काय? आपण भगवान महावीर, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी आणि बाबासाहेबांना पूजणारे लोक आहोत; परंतु आपले आचरण कसे आहे? आज निवडणूक होत आहे. उद्या ती संपेल; परंतु शब्दांचे हे जे विषारी बाण सुटत आहेत आणि ज्या जखमा होत आहेत, त्यांचा कुठलाही इलाज होत नसतो. सद्य:स्थितीत समाजाचे ताणेबाणे सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. देश सगळे काही पाहतो आहे. लक्षात ठेवा, निवडणूक आणि त्यातून येणारी सत्ता ही कधीही देशापेक्षा मोठी असू शकत नाही. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. देश आधी, बाकी सगळे नंतर! तेव्हा सगळ्या संबंधितांना विनंती इतकीच की, किमान या देशाच्या सभ्यतेचा गळा घोटू नका!

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४