- डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)पौराणिक धारणांमध्ये एक अत्यंत गमतीशीर संदर्भ येतो. एके दिवशी महर्षी वाल्मिकी यांनी नारदाला विचारले, ‘पृथ्वीवर सर्वगुणसंपन्न आणि जिला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणता येईल अशी कोणी व्यक्ती आहे काय?’ - नारद तिन्ही लोकांत भ्रमंती करत असत आणि जगातील आद्य पत्रकार म्हणून त्यांना सगळे काही ठाऊक असे. त्यांनी क्षणातच इक्ष्वाकु वंशाचे श्रीराम यांचे नाव घेतले. तेच श्रीराम गेली हजारो वर्षे आपल्या हृदयात भगवंताच्या रूपात विराजमान झालेले आहेत... आपल्या प्रेरणेचे मुख्य स्रोत झालेले आहेत. मला अचानक प्रभू श्रीरामांच्या या संदर्भाची आठवण का झाली?
हे तुम्ही वाचत असाल, तेव्हा यवतमाळ या माझ्या मूळगावी प्रखर विद्वान कथाकार श्री मुरारी बापू रामकथा सांगत आहेत. या भव्य आयोजनाच्या तयारीत मी गुंतलेलो असताना काही लोकांनी मला विचारले, ‘तुम्ही तर जैन धर्म मानणारे आहात; मग तुमच्या नेतृत्वाखाली श्रीरामकथेचे हे आयोजन कशासाठी?’
- अशा प्रश्नामागची कारणे मला समजतात. धर्म इतक्या तुकड्यांत विभागला गेला आहे की, सर्व धर्मांची मूल्ये अखेर एकच आहेत ही गोष्ट लोकांच्या विस्मरणात गेली आहे. मी म्हणालो, ‘धर्माचे मूळ समजून घ्या. तरच जैन धर्माचा एखादा अनुयायी प्रभू श्रीरामाची कथा आयोजित करून काय मिळवणार आहे, ही गोष्ट आपल्याला कळू शकेल!’
- सर्वात आधी माझी आई वीणादेवी दर्डा आणि त्यानंतर माझी पत्नी ज्योत्स्ना यांनी धर्माची मूळ तत्त्वे लक्षात घेऊन मला म्हटले होते, ‘आराधनेचे मार्ग वेगवेगळे असू शकतात; परंतु सर्व धर्मांचा उद्देश एकच आहे. प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण यांचे जीवन मानवजातीसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. आपण रामकथा आयोजित केली पाहिजे.’ तोपर्यंत साध्वी प्रीतिसुधाजी यांचा चतुर्मास आम्ही पूर्ण केलेला होता. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी जैन समाजाबरोबरच मोठ्या संख्येने अन्य धर्माचे लोकही आलेले होते. आम्ही रमेशभाई ओझा यांची ‘श्रीमद्भागवत कथा’ आयोजित केली तेव्हाही सर्व धर्माच्या लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आता तीच गोष्ट श्री मुरारी बापू यांच्या श्रीरामकथेच्या बाबतीत मला अनुभवास येत आहे.
श्री मुरारी बापू, श्री रमेशभाई ओझा, जया किशोरीजी किंवा यांच्यासारख्या अन्य संतांविषयी समाजात एक वेगळ्या प्रकारचा विश्वास आहे. हे संत समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत, अशी लोकभावना आहे. अर्थात, काही लोक असेही आहेत की, जे झूल पांघरून जादूगारासारखे चमत्कार दाखवतात आणि ‘दिव्यशक्ती’ म्हणून त्याचे प्रदर्शन करतात. अनेकदा राजकारण आपल्या फायद्यासाठी त्यांचा उपयोगही करत असतात. परंतु, त्यामुळे समाजाचे खूपच नुकसान होते. चमत्काराच्या या प्रवृत्तीपासून कोणताही धर्म वाचलेला नाही. धर्मात ‘आम्ही तेवढे चांगले’ या प्रवृत्तीनेही समाज आणि धर्माचे मोठे अहित केले आहे.
अशा आयोजनाच्या मागे माझे उद्दिष्ट धार्मिक अजिबात नाही, किंबहुना ‘समाजावर संस्कार करण्यासाठी आपण काय केले पाहिजे’ हा विचार प्राधान्याने आहे. कोणत्याही देशासाठी वास्तविक शक्ती त्याच्या संस्कृतीमध्ये दडलेली असते. परंतु, आपले सर्वात मोठे धन असलेला संस्कृती आणि संस्कारांचा तो मार्ग आज आपल्या तरुण पिढीला दाखवला जात नाही. शेकडो वर्षांच्या गुलामीनंतरही आपले स्वत्व टिकलेले आहे, कारण त्यामागे आपली संस्कृती आणि आपले संस्कार आहेत. भारतीय संस्कृती या भूमीला एक परिवार मानते आणि विश्वातील प्रत्येक जिवाच्या कल्याणाची कामना करते.
मी जवळजवळ सर्व धर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे मनन आणि विश्लेषण केले आहे; म्हणूनच मी धार्मिक आणि आध्यात्मिक समरसतेचा पुरस्कार करतो. श्री मुरारी बापू यांची रामकथा ऐकताना प्रभू श्रीरामांचे आदर्श आचरण मला प्रेरित करते. आपण रामचरितमानस वाचले तर प्रभू श्रीरामांचे अद्भुत व्यक्तिमत्व आपल्याला कळेल. विज्ञानाच्या कसोटीवर प्रभू श्रीराम पूर्णपणे खरे उतरतात. त्यांच्यात पित्याच्या आज्ञेचा आदर तर आहेच, परंतु जिने वनवासात पाठवले त्या आईबद्दलही प्रचंड आदर बाळगणे ही किती मोठी गोष्ट आहे.
सौम्य, विनम्र, मितभाषी, सत्यवादी, कुशाग्र, धैर्यवान आणि त्याचबरोबर अत्यंत साहसी असे हे व्यक्तिमत्त्व आहे. आज समाज जातीपातींच्या श्रृंखला आणि महिलांवरील अत्याचारामुळे संत्रस्त आहे. परंतु, प्रभू श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरे खाऊन समतामूलक समाजाची रचना, महिलांबद्दल आदर आणि जातीपातीची बंधने तोडण्याचे किती मोठे उदाहरण समोर ठेवले आहे! कोणतीही साधने हाताशी नसताना त्यांनी रावणासारख्या महारथीला पराभूत करण्याची ताकद असलेले सैन्य अल्पावधीत उभे केले. तरुणांना व्यवस्थापन आणि नेतृत्वाची क्षमता शिकायची असेल, तर अशी शिकवण दुसरीकडे कुठे मिळेल!
हीच गोष्ट मला भगवान श्रीकृष्णातही दिसते. रणांगणात जेव्हा ते अर्जुनाचे सारथ्य करत होते, तेव्हा समोर कौरवांची विशाल सेना होती. पांडवांच्या बाजूला ते एकटे होते; परंतु त्यांनी पांडवांना विजय मिळवून दिला. व्यवस्थापनाचे हे केवढे मोठे उदाहरण आहे. माणसाच्या रूपात आपल्या संपूर्ण जीवनात ते कठीण गोष्टींचा सामना करत राहिले. परंतु, श्रीकृष्णाचे मुखकमल कधी म्लान झाले नाही. आमचे तरुण प्रभू श्रीकृष्णापासून आंतरिक शक्ती कशी वापरायची, हे शिकू शकतात. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची शिकवण त्यांना घेता येईल.
श्रीमद्भागवत आणि रामचरितमानसमध्ये संपूर्ण जीवनाची सूत्रे सामावलेली आहेत. खरे संत आपल्याला याच सूत्रांविषयी सांगत असतात. श्री मुरारी बापू यांच्या सान्निध्यात यवतमाळमध्ये झालेले रामकथेचे आयोजन जाती-पाती आणि धार्मिक विषयांच्या पलीकडे जाऊन समाजाला एका सूत्रात बांधण्यात सफल होईल, याची मला खात्री आहे!