शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आग ना हिंदू ओळखते, ना मुसलमान! दंगलीमुळे देशाचे भविष्य जाळायचा हक्क कुणालाही नाही!

By विजय दर्डा | Updated: March 24, 2025 07:04 IST

धर्मातून प्रेम पसरवावे की द्वेषाचा भडका उडावा, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते.

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

धर्मातून प्रेम पसरवावे की द्वेषाचा भडका उडावा, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते. दंगलीची चूड लावून या देशाचे भविष्य जाळायचा हक्क कुणालाही नाही!

एक दु:ख सलते आहे आणि डोक्यातली विषादाची खदखद थांबलेली नाही. महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव असलेले माझे प्रिय नागपूर शहर अचानक दंगलींच्या आगीत का होरपळून निघाले? नागपूरच्या महाल भागात १९२३ आणि १९२७ च्या नंतर १९९१ मध्येही दंगल झाली होती. परंतु, त्यानंतर तणावाच्या काही किरकोळ घटना वगळल्या तर नागपूर शांत होते. मग अचानक ही आग कशी लागली?  गोंड शासक बख्त बुलंदशाह आणि भोसले राजघराण्याने या शहरावर केलेल्या संस्कारांमुळे सर्व समुदायाचे लोक प्रेम आणि सलोख्याने नांदत असतात. रामनवमीच्या मिरवणुकीत मुस्लीम आणि शीख समुदायाचे लोक सेवा देतात, सरबत वाटप करतात. रमजान आणि ईदमध्ये हिंदूही मोठ्या प्रमाणावर सामील होतात.

हे ताजुद्दीन बाबांचे शहर आहे. सबका मालिक एक अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या भक्तांचे हे शहर आहे. येथे जैन समाज महावीर जयंतीच्या दिवशी भव्य मिरवणूक काढतो. सर्व समाजाचे लोक त्या मिरवणुकीचे स्वागत करतात. नागपूर स्वभावानेच इतके अगत्यशील आहे की येथील समाजात वैमनस्याला कुठे जागाच नाही.

नागपूरमध्ये जे काही घडले ते मूठभर लोकांचे कारस्थान होते. याच लोकांनी अशा अफवा पसरविल्या की परिस्थिती बिघडायला वेळ लागला नाही.  व्हिडीओ एडिट करणे, अफवा पसरविणे आणि दंगलीसाठी लोकांना जमविणे या आरोपांवरून मुख्य सूत्रधार फहीम खान याला पोलिसांनी  अटकही केली. तरीही अफवा थांबल्या नाहीतच. आग आणखी भडकली. 

जे घडले त्यानंतर माझे स्पष्ट मत असे आहे, की नागपूरची शांतता बिघडविणाऱ्या सर्व लोकांना शोधून काढून, मग ते कोणत्याही समाजाचे असोत, इतकी कडक कारवाई केली पाहिजे की अशी घटना पुन्हा होता कामा नये. सणासुदीच्या काळात कोणाला विनाकारण त्रास होणार नाही याची काळजीही पोलिसांनी घेतली पाहिजे. गुप्तचर खाते असफल ठरले हे म्हणणे मला मान्य नाही. परंतु, आणखी चांगले धागेदोरे मिळून ही परिस्थिती टाळता आली असती. पोलिस प्रशासन, विशेषत: नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मी प्रशंसा करू इच्छितो. त्यांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली आणि जनजीवन सुरळीत केले. दोन्ही बाजूंच्या शांतताप्रिय लोकांनीही पोलिसांना सहकार्य करून  अत्यंत कळीची भूमिका पार पाडली आणि शहराच्या इतर भागात दंगल पसरू दिली नाही.

धार्मिक वैमनस्य आणि त्यातून भडकणारी ही आग मनाला वेदना देणारा विषय आहे. दंगली कशाप्रकारे सामान्य माणसांचे जगणे उद्ध्वस्त करतात हे मी पाहिले आहे. याच कारणाने मी ‘कोविड’च्या काळात हार्वर्ड युनिव्हर्सिटीसाठी ‘रिलिजन,  कॉन्फ्लिक्ट अँड पीस’ या विषयावर संशोधन केले होते. धर्म हा आपल्या जीवनातील  पूर्णपणे व्यक्तिगत भाग आहे. असला पाहिजे. धर्मातून प्रेम पसरवावे की द्वेष, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते; असा निष्कर्ष या संशोधनातून निघाला. प्रत्येक धर्म शांतता आणि बंधुभावाचीच महती सांगतो. परंतु द्वेषाचे वादळ मात्र व्यक्तिगत स्वार्थातूनच उभे राहते. खरे तर, कोणत्याही  धर्माच्या नावाने कधीही आग लागता कामा नये. राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी ठरवले तर दंगली होणारच नाहीत हे उघडच होय.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फुटकळांचे राजकारण आणि धर्माच्या नावावर आपली पोळी भाजणारे रोज नवनवे प्रश्न उपस्थित करत आहेत. आताही जे दंगे झाले त्याच्यामागे औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण आहे. एका कबरीवरून आपण आज इतका त्रास का करून घेतो आहोत? मध्ययुगीन इतिहासात प्रत्येक सुलतान आणि प्रत्येक राजा जुलमाच्या नवनव्या कहाण्या रचत होता. त्याच  रूढीवादी मानसिकतेत आपल्याला परत जायचे आहे का? अरे बाबांनो, आता तर जुनाट परंपरावादीही द्वेषभावना सोडून एकदुसऱ्यांच्या बरोबर राहत आहेत. कोणे एकेकाळी  नागालँडमधले काही समूह दुसऱ्या समूहाच्या लोकांचे शिर कापून आपल्या बैठकीच्या खोलीत लटकावून ठेवत. आता तेही असे करत नाहीत. आपण आधुनिक काळातले लोक आहोत. आपले विचारही व्यापक असले पाहिजेत. ‘मोगल बादशाह आजच्या काळात मुळीच प्रासंगिक नाहीत; कोणत्याही प्रकारची हिंसा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या मताशी मी शब्दश: सहमत आहे.

देशात दरवर्षी किती दंगली होतात आणि आता काय परिस्थिती आहे याच्या आकडेवारीत जाण्याची मला अजिबात इच्छा नाही. संभलची तर मी चर्चाही  करणार नाही. परंतु एवढे मात्र नक्की म्हणेन, की दंगल पसरते तेव्हा सामान्य माणसांबरोबरच समाज आणि देशही जळत असतो. म्हणून संयम राखा. हे लिहित असताना मला बशीर बद्र यांचा एक शेर आठवतो आहे..

‘लोग टूट जाते है एक घर बनाने मेंतुम तरस नही खाते बस्तीया जलाने में?’

vijaydarda@lokmat.com

टॅग्स :nagpurनागपूर