शशी थरूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते, खासदार
सध्याच्या ट्रम्प युगात परकीय वस्तू आणि परकीय माणसे यांचा संपर्क टाळण्यासाठी, स्वतःभोवती तटबंदी उभी करण्याच्या कल्पनेने जोर धरला आहे. अर्जेंटिनाचे जेवियर मिलेइ आणि हंगेरीचे व्हिक्टर ऑर्बन यांच्यासारखे प्रभावशाली नेते ही कल्पना उचलून धरत आहेत. परंतु, जोहान नोबर्ग या स्वीडिश इतिहासकारांनी Peak Human या आपल्या नव्या पुस्तकात तिच्या विरोधात अत्यंत प्रभावी युक्तिवाद केला आहे. गेल्या तीन सहस्रकातील, अथेन्सपासून ते अँग्लोस्फियर आणि अब्बासिद खिलाफतीपर्यंतच्या विविध संस्कृतींचा अभ्युदय आणि ऱ्हास यांचा सखोल आढावा नोबर्गनी या पुस्तकात घेतला आहे. जगभरातील ज्या संस्कृतींनी खुलेपणा स्वीकारला, व्यापार, परकीय माणसे आणि नवनव्या कल्पनांचे सतत स्वागत केले त्यांचीच भरभराट झाली, हेच त्यांच्या संशोधनातून दिसून येते. याउलट ज्या संस्कृतींनी आपली दारे मिटून घेतली त्यांची गतिशीलता आणि वैभवही लयाला गेले आहे.
याचे ठळक उदाहरण म्हणून त्यांनी इ. स. ९६० ते १२७९ या काळातील चीनच्या त्सांग साम्राज्याचा उहापोह केला आहे. त्सांग सम्राटांनी कायद्याचे राज्य आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी सत्ता राबवली. स्पर्धा परीक्षा घेऊन अधिकाऱ्यांची निवड केली. न्याय आणि स्थैर्य राखणारे धोरण अमलात आणले. शेतकऱ्यांना मालकी हक्क आणि सर्वत्र मुक्त संचाराची मोकळीक दिली. त्यातून कृषी उत्पादनही वाढले आणि शहरेही विकसित झाली. कैफेंग हे राजधानीचे शहर एक गजबजलेले महानगर बनले. त्यावेळच्या लंडनपेक्षाही त्याची लोकसंख्या जास्त होती.
त्सांग राजवंशाने अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारालाही चालना दिली. तिथले व्यापारी कागदी चलन वापरत होते आणि कारागीर नवनव्या औद्योगिक प्रक्रिया विकसित करत होते. व्यापार आणि उपक्रमशीलतेसाठी लाभलेल्या या मुक्त वातावरणामुळे एक गतिमान अर्थव्यवस्था निर्माण झाली आणि समृद्ध सांस्कृतिक चलनवलन शक्य झाले. कालांतराने मिंग सम्राट गादीवर येताच चीनने अंतर्लक्षी धोरण अवलंबले. या सम्राटांनी मुक्त संचार थांबवला, वेठबिगारी लादली आणि परराष्ट्रीय व्यापारावर कठोर बंधने घातली. या प्रतिगामी धोरणांमुळे चीनचे उत्पन्न लक्षणीय घटले.
नोबर्गचे हे विश्लेषण अन्य ऐतिहासिक सुवर्णयुगांनाही लागू पडते. अथेन्सची भरभराट झाली ती केवळ लोकशाहीची जननी असल्यामुळेच नव्हे. माफक जकात दर आणि परकियांबाबत स्वागतशील उदारमतवादी समाज हेही तिथल्या समृद्धीचे एक कारण होतेच. जिंकलेल्या समुदायांना आपल्यात सामावून घेऊन त्यांच्याकडून नवनव्या गोष्टी शिकत राहिल्यामुळे तसेच व्यापार आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी रस्त्यांचे प्रचंड जाळे सर्वत्र विणल्यामुळेच रोम इतके बलाढ्य झाले. विभिन्न लोकसमूह आणि तऱ्हेतऱ्हेच्या कल्पनांना आपली दारे उघडी ठेवणे हीच आपल्या वैभवाची गुरूकिल्ली असल्याचे या दोन्ही संस्कृतींनी दाखवून दिले.
दुर्दैवाने भारतातील कोणतेही उदाहरण नोबर्गने दिलेले नाही. परंतु, आपल्याही समृद्ध इतिहासात, खुलेपणामुळेच भरभराट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा खुलेपणा विस्तृत व्यापार, धार्मिक सहिष्णुता, बौद्धिक देवाणघेवाण यातून प्रत्ययाला येतो. परकीय कल्पना, तंत्रज्ञान आणि माणसांशी संपर्क वाढवून अनेक साम्राज्यांनी आणि चळवळींनी स्वतःची संस्कृती समृद्ध करतानाच आर्थिक विकासालाही गती दिली आहे. मौर्य साम्राज्य (इ.स.पू. सुमारे ३२२ ते १८५) हे याचे सर्वात प्राचीन उदाहरण होय. उपखंडातील बराच मोठा प्रदेश एका छत्राखाली आणल्यानंतर या साम्राज्याला स्थैर्य लाभले. त्यामुळे अंतर्गत आणि बाह्य व्यापाराचा विस्तार करणे शक्य झाले. गंगेचे पठार मध्य आणि पश्चिम आशियाशी जोडणाऱ्या सुप्रसिद्ध उत्तरपथासारखे रस्त्यांचे विस्तृत जाळे मौर्य सम्राटांनी बांधले. मसाल्याचे पदार्थ, रेशीम आणि कपाशीसारखा भारतीय माल अगदी हेलेनिस्टिक राज्यांपर्यंत आणि त्या पलिकडेही विक्रीस नेऊन आपला व्यापार भरभराटीस आणला.
इ. स. ३२० ते ५५० दरम्यानच्या गुप्त साम्राज्याच्या कालखंडाचा ‘भारताचे सुवर्णयुग’ असा गौरव केला जातो. गुप्त सम्राटांनी आग्नेय आशिया, चीन आणि रोमन साम्राज्याशी मजबूत व्यापारी संबंध राखले होते. हे राज्यकर्ते कला आणि विज्ञान यांचे प्रमुख आश्रयदाते बनले. परिणामी, विविध क्षेत्रांत भव्य प्रगती होऊ शकली. आर्यभट्ट या गणिती खगोलशास्त्रज्ञाने शून्याचा शोध लावला. त्यानंतर या कल्पना पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये पोहोचल्या. मंदिरांची वास्तुकला, सुबक शिल्पकला आणि अजिंठ्यासारखी सजीव भित्तीचित्रे अशा कलांचा उत्कर्ष हा त्या काळात उपलब्ध असलेल्या बौद्धिक आणि आर्थिक भांडवलाचाच परिपाक होता.
चौल आणि पुढे मुगल साम्राज्याच्या बाबतीतही नोबर्ग यांचे विधान शब्दश: खरे ठरते. त्याबद्दल उद्याच्या उत्तरार्धात...
Web Summary : Shashi Tharoor highlights historian Johan Norberg's argument: Openness fosters prosperity, citing examples from Athens to the Mughal Empire. Cultures embracing trade and new ideas thrive. Conversely, isolation leads to decline, evidenced by China's shift under the Ming dynasty. Openness, not walls, is key.
Web Summary : शशि थरूर इतिहासकार जोहान नोर्बर्ग के तर्क को उजागर करते हैं: खुलापन समृद्धि को बढ़ावा देता है, एथेंस से मुगल साम्राज्य तक के उदाहरणों का हवाला देते हैं। व्यापार और नए विचारों को अपनाने वाली संस्कृतियाँ फलती-फूलती हैं। इसके विपरीत, अलगाव पतन की ओर ले जाता है, जैसा कि मिंग राजवंश के तहत चीन में बदलाव से स्पष्ट है। दीवारें नहीं, खुलापन ही कुंजी है।