-देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)'जिन्हूं न निंदा दुखी करदी है, न उसतत खुश करदी है... जो मान-अपमान नूं बराबर समझदा है...'या गुरुवाणीतील ओळींमधून शीखांचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांनी स्थिरचित्त, निर्भय आणि निःस्पृह जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवला. निंदा-स्तुती, हर्ष-शोक, मान-अपमान यापलीकडे जाऊन सत्यासाठी उभे राहण्याची शिकवण त्यांनी केवळ शब्दांनी नाही, तर आपल्या जीवनातून आणि शहिदीतून दिली.
सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंदजी यांच्या पुत्राचे बालनाव 'त्यागमल' होते. करतारपूरच्या युद्धात त्यांनी दाखवलेल्या अद्वितीय पराक्रमामुळे त्यांना 'तेगबहादूर' म्हणजेच 'शूर तलवारबाज' हे नाव प्राप्त झाले. शौर्य आणि त्याग यांचा अद्वितीय संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. आठवे गुरु श्री गुरु हरकृष्णजी यांच्या निधनानंतर १६६५ मध्ये ते गुरुगादीवर विराजमान झाले. पंजाबमधील बाबा बकाला येथे त्यांनी नववे गुरु म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि शीख पंथाला नवे आध्यात्मिक नेतृत्व दिले.
मुघलकालीन दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा निरपराध नागरिकांवर अन्याय होत होता, तेव्हा जनतेने श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांना साद घातली. त्यांनी दिल्लीकडे प्रस्थान केले आणि धर्मस्वातंत्र्यासाठी निर्भयपणे उभे राहिले.
त्यांचे सहकारी भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला यांना अमानुष छळ सहन करावा लागला. पण गुरुजी डगमगले नाहीत. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौक येथे, आज जिथे गुरुद्वारा शीश गंज साहिब उभा आहे, त्या ठिकाणी त्यांनी शीर अर्पण केले. धर्मातर किंवा चमत्कार दाखवण्यास नकार देत शहादत स्वीकारली. त्यांच्या या सर्वोच्च त्यागामुळे त्यांना 'हिंद दी चादर' ही पदवी लाभली म्हणजेच हिंदुस्थानच्या धर्म संस्कृतीचे रक्षण करणारी ढाल.
श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे बलिदान कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हते, ते असहिष्णुतेच्या विचारसरणीविरुद्ध होते. त्यांनी केवळ आपले शीर दिले नाही, तर जगण्याचा मार्ग दिला अन्यायासमोर न झुकण्याचा, सत्यासाठी उभे राहण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा.
भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहत आहे; परंतु विकास केवळ आर्थिक नसतो, तो मूल्याधिष्ठित असतो. सत्य, साहस, त्याग, कर्तव्य आणि समभाव हीच गुरुपरंपरेची देणगी आहे. आजच्या युवकांसाठी श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांची शहादत ही केवळ इतिहासातील घटना नाही, ती जीवनाची दिशा आहे.
राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे बलिदान हे भारतीय इतिहासातील सुवर्णपान आहे. त्यांच्या शहादतीतून आपण असा भारत घडवण्याची प्रतिज्ञा करूया जिथे सहिष्णुता, न्याय, मानवाधिकार आणि वैश्विक शांतता सर्वोच्च असतील. हीच त्यांना खरी आदरांजली.
हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्वातंत्र्याची जपणूक, श्रद्धेचे स्वातंत्र्य, मानवतेचे रक्षण व मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च शहिदीचे हे कालातीत प्रतीक आहे.
हा ऐतिहासिक स्मरणोत्सव बहुदिवसीय, व्यापक स्वरूपातील सार्वजनिक कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात येत असून, त्यामध्ये आध्यात्मिक साधना, ऐतिहासिक जागृती, युवकांचा सहभाग तसेच सामाजिक एकात्मता यांचा समन्वय साधण्यात येत आहे.
प्रथमच या उपक्रमांच्या माध्यमातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी तसेच भगत नामदेव संप्रदाय अशा श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्याशी ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक नाते असलेल्या समुदायांना एका व्यासपीठावर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. ३५० वर्षानंतर या ऐतिहासिक नात्याचे पुनरुज्जीवन व बळकटीकरण करण्याचा राज्य शासनाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
या कार्यक्रमांमध्ये आध्यात्मिक प्रवचने, कीर्तन, ऐतिहासिक प्रदर्शन, शैक्षणिक सादरीकरणे तसेच समुदाय संवाद यांचा समावेश असून, श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे जीवन, कार्य, शिकवण व त्याग यांचे सखोल दर्शन घडविले जात आहे. गुरुजींच्या शहिदीचे ऐतिहासिक महत्त्व व संविधानिक मूल्ये-धर्मस्वातंत्र्य, समानता व न्याय यांच्याशी असलेले त्यांचे नाते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.
Web Summary : Guru Tegh Bahadur's sacrifice embodies religious freedom, tolerance. His martyrdom inspires a value-based nation prioritizing justice, human rights, and peace. Maharashtra government commemorates his legacy, fostering unity across communities through spiritual and educational initiatives, reinforcing his message of standing for truth.
Web Summary : गुरु तेग बहादुर का बलिदान धार्मिक स्वतंत्रता, सहिष्णुता का प्रतीक है। उनकी शहादत न्याय, मानवाधिकारों और शांति को प्राथमिकता देने वाले एक मूल्य-आधारित राष्ट्र को प्रेरित करती है। महाराष्ट्र सरकार उनकी विरासत का स्मरणोत्सव मना रही है, आध्यात्मिक और शैक्षणिक पहलों के माध्यम से समुदायों के बीच एकता को बढ़ावा दे रही है, सत्य के लिए खड़े होने के उनके संदेश को मजबूत कर रही है।