शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

विशेष लेखः काळाच्या पुढे पाऊल टाकणाऱ्या राजमाता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 08:26 IST

मुंग्यांना साखर, जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालणारी ही 'पुण्यश्लोक' स्त्री तडफदार, खंबीर आणि सदैव प्रजाहितदक्ष नेतृत्वाचे अजोड असे उदाहरण आहे.

पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

आजच्या देशाचा व महाराष्ट्राचा विचार करता २३० वर्षापूर्वी कोणत्याही 'स्त्री'ने एक राज्यकर्ती म्हणून राज्याचे नेतृत्व करणे सोपी गोष्ट नव्हती. राजमाता जिजाऊंच्या कालखंडानंतर खंबीरपणे स्त्री राज्यकर्ता म्हणून अहिल्यादेवींनी मराठा साम्राज्यातील एक प्रभावी व मुत्सद्दी शासक म्हणून कारभार पाहिला.

अहिल्यादेवींच्या कार्याविषयी माहिती मला घरातच मिळाली. माझा जन्मच इंदूरचा, म्हणजे तत्कालीन होळकर संस्थानातील. माझे आजोबा (आईचे वडील) स्व. माधवराव जगदाळे हे कोल्हापूरच्या शिरोळचे. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले व पुढे काही काळानंतर होळकर महाराजांकडे सुपूर्द केले. त्यानंतर आजोबांचे जगदाळे घराणे इंदूरला स्थायिक झाले. माझ्या आईचा प्रेमलाबाईचा जन्मसुद्धा इंदूरचा. त्यांचे बालपण व शिक्षण होळकर संस्थानामध्येच झाले. त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वावर व पुढील राजकीय कारकिर्दीवर अहिल्यादेवींच्या नेतृत्व-कर्तृत्वाचा प्रभाव होता. त्यांच्या पूजेमध्ये अहिल्यादेवींची प्रतिमा कायम असायची.

अहिल्यादेवी २८ वर्षाच्या असतानाच त्यांचे पती खंडेराव होळकर यांना लढाईत हौतात्म्य आले. सासरे मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला सती जाण्यापासून रोखले. त्यांनी पतीच्या चितेवर सारे वस्त्रालंकार ठेवले. रंगविरहित कपडे वापरण्याचा निर्धार केला. ऐशोआराम व विलासांचा त्याग करीत उर्वरित आयुष्य प्रजेच्या हितासाठी घालवण्याचा प्रण केला. हे साधर्म्य राजमाता जिजाऊंच्या पश्चात अहिल्यादेवींच्या बाबतीत आढळून येते. ज्या काळात पतीच्या किंवा सासऱ्याच्या कर्तृत्वावरून सुनेची ओळख करून दिली जायची त्याच कालखंडात एक महान शासक, पराक्रमी योद्धा आणि माळवा प्रांताच्या 'राजमाता' अशी ख्याती महाराणी अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली. महिला सशक्तीकरणावर त्यांनी विशेष भर दिला. विधवा स्त्रियांसाठी अहिल्यादेवींनी कायद्यात बदल केले. त्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार, उदरनिर्वाहाकरिता पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला. शिवाय दत्तकपत्रावर आकारला जाणारा नजराणा (कर) रद्द केला. स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही पावले क्रांतिकारी होती. राज्यातील जनतेला भिल्लांचा उपद्रव असह्य झाल्यानंतर कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी भिल्लांचा बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह केला जाईल. त्या वेळेस जातपात बघितली जाणार नाही. भिल्लांना धडा शिकवणारे असामान्य योद्धा यशवंतराव फणसे यांच्यासोबत स्वतःच्या कन्येचा थाटामाटात विवाह लावून दिला.

अतिशय बिकट व दुःखाच्या परिस्थितीत ग्वाल्हेरच्या सरदार गोपाळराव शिंद्यांनी १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवेल अशा तडफदारीने त्यांनी शिंदे फौजेचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण अबला नव्हत्या. राज्याच्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.

प्रजेच्या हितासाठी अहिल्यादेवींनी जाचक करपद्धती सौम्य केल्या. गावोगावी नेमलेले पाटील आणि कुळकर्णी यांच्या वतनी हक्कांचे संरक्षण केले. न्यायनिवाड्यासाठी पंच अधिकारी नेमले. डोंगरातील भिल्ल व गोंड आदिवासी प्रवासी प्रजेकडून 'भिलकवडी' नावाचा कर वसूल करतात अशा तक्रारी आल्यावर त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला; पण त्याबदल्यात त्यांच्याकडून पडीक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना हद्दी नेमून देत शेतीसाठी जमीन करार-पट्टयाने देण्याची पद्धत सुरू केली. राज्यातील विणकरांची स्थिती सुधारण्यासाठी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली.

अन्न, पिण्याचे पाणी, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती व्हावी म्हणून अन्नछत्रे, विहिरींचे बांधकाम, वाटसरूंसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रम इत्यादींची निर्मिती केली. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशू-पक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसांत घोंगड्या वाटल्या जात. यातून अहिल्यादेवींच्या कुशल प्रशासक वृत्तीचे दर्शन तर होतेच, पण सर्व प्राणिमात्रांबद्दलचा त्यांचा कळवळा पाहून त्यांना दिलेली 'पुण्यश्लोक' ही उपाधी सार्थ ठरते.

अहिल्यादेवींनी देवधर्म केला, दानधर्म केला, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नव्याने धर्मशाळा, मंदिरे, घाट निर्माण केले; पण हे सगळे करत असताना प्रजेचा हक्क असलेली संपत्ती वापरली नाही, तर खासगी संपत्तीमधून सर्व खर्च केला. महाराष्ट्रासह देशभरातील ५५ पेक्षा अधिक नामांकित तीर्थक्षेत्रांत अहिल्यादेवींनी धर्मशाळा बांधल्या. अहिल्यादेवींच्या संग्रही निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मीकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी दुर्मीळ ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रजेच्या सुखासाठी वेचला. अनेक संकटे झेलत, खंबीरपणे त्या आपल्या निर्णयाशी ठाम राहिल्या. महाराष्ट्राला पुरोगामी विचार देण्यात त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा वाटा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन!! 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण