जागतिक अर्थकारणाच्या बहुरंगी रिंगणात, शेअर बाजार चक्रीवादळाच्या उन्मादी गतीने गरगरत असतानाच एक लखलखीत सत्य समोर येत आहे : भारतीय स्त्रियांनी सुवर्णमण्यांच्या माळा ओवून एक शाश्वत टिकणारे वैभवशाली साम्राज्य उभे केले आहे. कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख उदय कोटक यांनी “सर्वांत चतुर निधी व्यवस्थापक” अशा सार्थ शब्दांत या स्त्रियांना गौरविले आहे. सोन्याला आलेली झळाळी पाहता, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बळेच सार्वजनिक पैसा ओतण्याला आणि तुटीच्या अर्थभरण्याला पाठिंबा देणारी सरकारे, केंद्रीय बँका आणि अर्थतज्ज्ञ यांनी (सुवर्णरूपात) मूल्यसंग्रहाचा नित्य आयातदार असलेल्या भारताकडून यासंदर्भात धडे घ्यायला हवेत. आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी एक मजेदार किस्सा सांगितला आहे. दहा वर्षांपूर्वी आपण ८ लाखाला घेतलेल्या कारची किंमत आज दीड लाख झाली; पण पत्नीने त्याच वेळी घेतलेल्या ८ लाखाच्या सोन्याची किंमत ३२ लाख झाल्याचे ते सांगतात. सोने घेण्याऐवजी पर्यटनाला जाण्याच्या त्यांच्या प्रस्तावावर सौ. गोयंका म्हणाल्या होत्या, “सहल होईल पाच दिवसांची. सोने पाच पिढ्या टिकेल.”
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
तात्पर्य? - बायका पुरुषांपेक्षा हुशार असतात.
भारतात सोने हा काही केवळ एक धातू नसतो. भारतीय स्त्रियांनी त्याला एक दिव्य शक्ती बनवले आहे. एके काळी “अनुत्पादक मालमत्ता” म्हणून त्याची हेटाळणी होई; पण आता सोन्याने फिनिक्स पक्ष्यासारखी उंच भरारी घेतलेली आहे. केवळ २०२५ या एकाच वर्षात त्याची किंमत २६% ने वाढलेली आहे. कौटुंबिक वारसा असलेले सोने आज अर्थसत्तेचे अजस्त्र वाहन बनले आहे. शेअर्स आणि बाँडस् त्याच्यासमोर फिके पडत आहेत. भारतात सोन्याकडे केवळ वस्तू म्हणून पाहिले जात नाही. त्यात अनेक भावबंध गुंतलेले असतात. नववधूच्या हातातील बांगड्या, गादीखाली लपवलेले नाणे अशा स्वरूपात ते असते. सोने म्हणजे जीवनातील भयावह संकटाना तोंड देण्यासाठी वापरायची संरक्षण यंत्रणाच जणू!
भारतीय घरांत २४ ते २५ हजार टन सोने साठलेले आहे. संपूर्ण जगातील जडजवाहिराच्या ११% असलेली ही मालमत्ता २४ ते २५ ट्रिलियन रुपये भरते. त्यापुढे अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियातील सोन्याचा सगळा राखीव कोष एकत्रित केला तरी उणा पडतो. सर्व पाश्चिमात्य घरातील एकूण साठा, तर केवळ दोन-तीन हजार टन इतकाच आहे. युरोपचे सोने त्यांच्या केंद्रीय बँकांच्या तिजोऱ्यांत सुस्त पडून असते. यातून एक मोठा सांस्कृतिक भेद प्रत्ययाला येतो. भारतात सोने हे सुरक्षेचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. ते अभिमानाने मिरविले जाते. पाश्चिमात्य जगात संपत्ती अमूर्त शेअर्स आणि बाँडस्मधून वाहत असते. भारतीय स्त्रियांनी आपल्या उपजत शहाणपणाने जागतिक बाजाराच्या भावशून्य गणिताला झाकोळून टाकणारा एक अद्भुत वारसा सोन्याच्या रूपात निर्माण केला आहे.
एके काळी पडीक ठरलेल्या सोन्याने अचानक एव्हढी उंची कशी काय गाठली? चीन-अमेरिकेतील तणाव, अमेरिकेत हळूहळू आर्थिक मंदी येत असल्याची कुजबुज यासारख्या भूराजकीय अशांततेमुळे गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत.
खेड्यापाड्यांतील शेतकरी स्त्रियांच्या दृष्टीने सोने हे दुष्काळापासून संरक्षण देणारे कवच असते. नागरी विभागातील उच्च श्रेणीच्या नोकरदारांसाठी सोने ही शेअर बाजारातील चढ-उतारापासून वाचविणारी ढाल बनते. स्मार्टफोनवरून विकत घेता येणारे डिजिटल सोने ही परंपरागत शहाणपणाला मिळालेली आधुनिकतेची जोड ठरते.
अर्थात सोन्याच्या लकाकीला हुंडा पद्धती, खाणकामामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान असे गुंतागुंतीचे नकारात्मक पैलूही आहेत. सोन्याच्या स्रोतांमागील नैतिक पेचही कमी नाहीत; पण सदैव व्यवहारवादी असलेल्या भारतीय स्त्रिया या साऱ्या आव्हानांना थेट सामोऱ्या जातात. सोन्याच्या पुनर्वापराचा त्या पुरस्कार करतात. टिकाऊ चालीरीतींचा आग्रह धरतात आणि परंपरांचे ओझे सुसह्य करणाऱ्या सुधारणांना बळ देतात. सारासार विचाराला वाव देतात.
आर्थिक वादळाच्या झंझावातात सोने भारताला दिशा दाखवत आहे. त्यांनी संपत्ती नुसती सुरक्षित नव्हे तर वर्धिष्णू ठेवलेली आहे. त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तींनी अल्गोरिदमवर मात केली आहे. शहाणपण काही सुटाबुटात आणि गुंतागुंतीच्या आकडेमोडीत नसते. ते तर साडीबिडी नेसून, पिढीजात स्वप्नांचा वास असलेल्या चमकदार बांगड्या घालून तुमच्या समोर स्मितहास्य करत उभे आहे.
भारतीय स्त्रिया या खरोखर किमयागार आहेत. त्यांनी पृथ्वीच्या पोटातील एका धातूला दूरदृष्टी आणि लवचिकतेचा वारसा बनवले आहे. सोन्याविषयीची त्यांची ओढ म्हणजे एक सोस समजणे हा त्यांच्या प्रगल्भतेचा अवमान ठरेल. त्या सोन्याच्या मागे लागत नाहीत. सोनेच त्यांच्या मागे लागते. स्त्रियांच्या हाती सोने ही केवळ मालमत्ता नव्हे तर बुद्धिमत्ता, केवळ परंपरा नव्हे तर परिवर्तन ठरते, हेच खरे!