शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले!

By विजय दर्डा | Updated: February 21, 2022 08:42 IST

माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण मी काश्मीरमध्ये व्यतीत केले आहेत. पुन्हा तिथे गेलो, तर दिसले वैफल्य, निराशा आणि विखुरलेल्या खाणाखुणा!

विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहvijaydarda@lokmat.com गेल्या आठवड्यात मी काश्मीरमध्ये होतो. त्या देखण्या देवभूमीत पाऊल ठेवताच जुन्या आठवणींची शाल मनावर पांघरली गेली. मी गेलो होतो नवे काश्मीर पाहायला; पण जुन्या काश्मीरने मला जणू घेरले... तर, आधी त्या जुन्या गोष्टी, मग नव्याकडे येऊ...

२०१६ सालचा फेब्रुवारी महिना, मी श्रीनगर विमानतळावर उतरलो. मला गुलमर्गला जायचे होते. रस्त्याने जाताना दिसलेली  दृश्ये भयावह होती. पोलीस दल आणि सरकारी गाड्यांवर चोहीकडून दगड मारले जात होते. सोपोर आणि बारामुल्लाजवळ  मोठमोठे होर्डिंग्ज दिसले. एका गाढवाच्या तोंडावर अमेरिकन राष्ट्रपतींचा चेहरा चिकटविलेला, त्याच्या गळ्यात पट्टा आणि लोक त्याला बेदम मारत आहेत, असे चित्र त्या विद्रूप होर्डिंग्जवर रंगविलेले! तो प्रवास फार त्रासदायक होता.

... गुलमर्गमध्ये आम्ही शानदार खैबर हॉटेलमध्ये थांबलो होतो. बर्फ पडत होता आणि त्या हव्याहव्याशा गारठ्यात आम्ही टीव्हीवर भारत-पाक क्रिकेट सामन्याचा आनंद घेत होतो. भारताने सामना जिंकला, तसे मी हॉटेलच्या व्यवस्थापकांना म्हटले, चला, माझ्यातर्फे सर्वांना मिठाई वाटा. व्यवस्थापक माझे मित्र. ते हलक्या आवाजात मला म्हणाले, जास्त जल्लोष नका करू, पाकिस्तान हरल्याने इथे लोक उदास बसले आहेत. अनेकांनी तर अन्नही तोंडी लावलेले नाही! - मी थक्क झालो आणि विषण्णही! काश्मीरच्या याच भूमीवरच्या अक्रोड आणि चीर वृक्षाच्या लाकडापासून क्रिकेटच्या  बॅट तयार होतात. त्या वापरून भारतीय खेळाडू धावांचा पाऊस पाडतात. यातलीच बॅट घेऊन गावसकर खेळलाय आणि सचिनही; पण त्या प्रवासात काश्मीरमधल्या बॅटींवर तिथल्या तरुणांनी  पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो लावलेले मी पाहिले!

काश्मीरशी माझी दोस्ती जुनी आहे. दहावीत असताना मी पहिल्यांदा काश्मीरला गेलो आणि त्या अर्ध्याकच्च्या वयातच माझे काश्मीरवर प्रेम जडले. पुढे विवाहानंतर मधुचंद्रासाठी ज्योत्स्नाला घेऊन इथेच आलो होतो. काही वर्षांपूर्वी ‘दीपोत्सव’ या ‘लोकमत’च्या ख्यातनाम दिवाळी अंकासाठी ‘एन एच् 44’ या शीर्षकांतर्गत माझ्या सहकाऱ्यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा प्रवास केला. श्रीनगरमध्ये त्यांच्यावर दगड मारले गेले होते; पण आम्ही वाईट वाटून घेतले नाही. कारण २४ वर्षांचा वाईट काळ मध्ये येऊन गेला होता.... त्या काळात जन्माला आलेल्या काश्मिरी मुलांनी ना शाळा पाहिली, ना खेळाचे मैदान. फुटबॉल पाहिला नाही ना क्रिकेट. फोनही पाहिला नव्हता, पाहिली फक्त संचारबंदी, किंकाळ्या, आरडाओरडा, बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज. तो काळ किती रक्तरंजित  होता हे मी वेगळे सांगायला नको. रुबैया सईद यांना वाचविण्यासाठी किती मोठी किंमत आपण मोजली होती आणि त्यांची बहिण महबुबा मुफ्ती  आज काय करीत आहेत तिथे..!

... मग मी विचार केला की, हिंदुस्थानात राजवट बदलली आहे. ३७० वे कलम गेले आहे, आता एकदा काश्मीरला का जाऊ नये? या माझ्या इच्छेने मला मागच्या आठवड्यात काश्मीरला ओढून नेले. श्रीनगर विमानतळावर तीन स्तरात सुरक्षा व्यवस्था आहे. सीआयएसएफ आणि सीआरएसएफ यांच्याकडून चूक संभवतच नाही... 

जिथे मी आयुष्यातले सर्वांत सुंदर क्षण घालविले तिथे मला पुन्हा जायचे होते. ५० वर्षांपूर्वी ज्योत्स्नाबरोबर दल सरोवरात ज्या शिकाऱ्यात बसलो तो शिकारा मी शोधत होतो. शिकारेवाला भाईजान भेटतात का हे पाहत होते. ते मला म्हणाले होते, ‘जनाब पहले क्यों नहीं बताया? हम शिकारे को दुल्हन की तरह सजा देते और उसमें आपकी दुल्हन बैठती.’ ... पण यावेळी मला ना तो शिकारा दिसला ना ते भाईजान! दल सरोवराच्या किनाऱ्यावर तुटलेला एक शिकारा दिसला..वाटले, हाच तर तो नव्हे... पण विचारणार कोणाला?

...त्याकाळी  दल सरोवर प्रेमाने बहरलेले असे. एकमेकांमध्ये बुडालेल्या नवपरिणित जोड्या सजलेल्या शिकाऱ्यांमध्ये प्रेमगीते गात.. ‘कश्मीर की कली हूं मै मुझसे ना रुठो बाबूजी’/एक था गुल और एक थी बुलबुल..दोनो चमन मे रहते थे...! त्यावेळचे जनजीवन आनंदाने भरलेले होते. आकाश स्वच्छ होते. तारे चमकत असत. हवेत केशराचा सुगंध दरवळत होता. हवेच्या झोक्याने झेलमच्या पाण्यावर तरंग उमटत असत. लाल चौकात जाऊन खाण्या-पिण्याची मजा काही औरच होती! कृष्णाच्या ढाब्यावर खाल्लेल्या  राजमा-चावलची चव मी  अजून विसरलेलो नाही; परंतु शेजारच्या देशाने लावलेल्या आगीमुळे तिथले हे सारे सुख विस्कटून गेले...

यावेळी मी दल सरोवराशी फिरायला गेलो तर हवेत दारूगोळ्याचा उग्र वास भरलेला होता. २२ चौरस किलोमीटरचे ते सरोवर आक्रसलेले वाटत होते.  जवळजवळ ६ मीटर खोल असलेले हे सरोवर उदास वाटत होते. किनाऱ्याला प्रत्येक १०० मीटरवर पोलीस पहारा होता. सगळीकडे शस्त्रधारी सीआरपीएफचे जवान दिसत होते. चिलखती गाड्या, नेत्यांच्या मागे जॅमर लावलेल्या गाड्या, सरोवराच्या बाजूचे सेंटॉर हॉटेल, तेही मरगळलेले दिसले. चार चिनार ही माझी आवडती जागा; पण त्यातले तीन चिनार सुकलेले.. एक कसेबसे उभे! कुठे उरले ते चार चिनार? शिकाराही उदास होता. वाटले या प्रदेशाच्या उदासीची काजळीच आहे बहुतेक ही! 

श्रीनगर असो वा पहलगाम, शिकारेवाला, टॅक्सीवाला, दुकानदार, किंवा हॉटेलमधले कर्मचारी; कुणाशीही बोला, प्रत्येकाचे म्हणणे एकच, हम हिंदुस्तान के हैं, टूरिजम जितना बढ़ेगा उसी से हमारी रोजी रोटी बढ़ेगी!  मी त्यांना समजावत होतो, एक देश, एक झेंडा आणि एक कायद्याची इथे आवश्यकता होतीच. आता घुसखोरांना आळा बसेल. आपले जनजीवन बदलेल. काश्मीर पुन्हा स्वर्ग होईल.  पण ते तळतळून म्हणत होते, लेकिन इसके लिए धारा ३७० हटाने की क्या जरूरत थी? 

- ही जनभावना! - ती फार महत्त्वाची असते. या काश्मीर भेटीत मी माझे मित्र आणि अतिशय जाणते राज्यपाल मनोज सिन्हा आणि हरदिल अजीज फारुक अब्दुल्ला यांनाही भेटलो. पण काश्मीर उदास होते, हे खरे! त्यातून मी गेलो तो महिना! ट्युलिपच्या रांगा बहरलेल्या नव्हत्या, सफरचंदाच्या बागांमध्ये झाडांवर फळेही उरली नव्हती! केशराची शेतेही सुनी होती; पण दुकानात मांडलेल्या केशराच्या वासाने मन भरून आले. कहाव्याचा आस्वाद तर घेतलाच. मला जहांगीरच्या वचनांची आठवण झाली. ‘गर फिरदौस बर रूये जमी अस्त/ हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त.’ (पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो येथे आहे, येथेच आहे.)

पण हे आज वास्तव नाही. काश्मीरला स्वर्ग बनवायचे असेल तर स्वीत्झर्लंडप्रमाणे या प्रांताला सांभाळावे, पुन्हा सजवावे लागेल. तरुणांना काम द्यावे लागेल. चिनार वृक्षांना नवे जीवन द्यावे लागेल. शिकारे सजवावे लागतील. लाल चौकात निर्भयपणे जाऊन तिरंग्याला सलाम करून येता येऊ शकेल, असे वातावरण तयार करावे लागेल...आणि सगळ्यात महत्त्वाचे, काश्मीरच्या सुंदर प्रदेशात प्रेमाचा संदेश पुन्हा पोहोचवावा लागेल. मगच आपण म्हणू शकू, ‘पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल, तर तो येथे आहे... येथेच आहे’.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत