-श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ अन् तिची माहिती दिली कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी. बुधवारी भल्या पहाटे व नंतर सकाळी या तीन नावांनी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर महिलांच्या भावविश्वात गुंफले गेले. त्याचा संबंध महिलांना मिळालेल्या कर्तबगारीच्या संधीशीदेखील आहे. भारत व पाकिस्तानमध्ये मुख्य फरक काय, तर पाकिस्तानच्या राजकारणात लष्कर आहे आणि भारतात तसे नाही. पाकिस्तानची दुसरी कमकुवत बाजू म्हणजे भारतासारखे तिथल्या संरक्षण दलांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान नाही. तिथल्या आर्मीत लेडी कॅडेट कोर्सच मुळी २००६ मध्ये सुरू झाला. तेव्हाच एअरफोर्समध्ये पायलटच्या संधी खुल्या झाल्या. तथापि, आर्मी, नेव्हीत अजूनही युद्धाच्या आघाडीवर महिला नाहीत. भारतात मात्र स्थलसेना, वायुसेना व नाैसेनेत पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी देण्याच्या धोरणाला दोन दशके उलटून गेली आहेत. शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री असताना १९९२ मध्ये हे क्रांतिकारी पाऊल उचलले गेले. नंतर न्यायाचा तराजू सांभाळणाऱ्या न्यायदेवतेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले.
आता महिला अधिकारी केवळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढतातच असे नाही, तर त्या दोन पावले पुढेही गेल्या आहेत. गुजरातमधील कर्नल सोफिया कुरेशी त्यांच्या कुटुंबातील लष्करी सेवेचा वारसा चालवतात. काही वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले, तर अति उंचावर चेतक, चित्ता ही अत्याधुनिक हेलिकाॅप्टर्स चालविण्यात विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा हातखंडा आहे. या दोघींची नावेही त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी आहेत. ‘सोफिया’ या मूळ ग्रीक नावाचा अर्थ बुद्धी किंवा ज्ञान आणि ‘व्योमिका’ म्हणजे साक्षात आकाशकन्याच.
युद्ध ही केवळ शस्त्रांची लढाई नसते. ते अनेकदा प्रतीकांवरही लढले जाते. त्यातून संदेशही द्यायचा असतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाने असाच संदेश दिला आहे. पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी महिला व मुलांवर शस्त्र उचलत नसल्याचा साळसूदपणा दाखवताना केवळ पुरुष टिपले. डोळ्यादेखत साैभाग्य संपवले जातानाच्या यातना भोगलेल्या अभागिनींना सांगितले गेले की, ‘जा आणि आम्ही काय केले ते पंतप्रधान मोदींना सांगा’. या प्रसंगातूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव पुढे आले. ते नाव खुद्द नरेंद्र मोदींनी सुचवल्याचे सांगितले जाते. असो. लष्करी कारवायांचे नामकरण हा इतिहासाचा एक रंजक कोपरा आहे. ही नावे रणनीती, संस्कृती आणि प्रेरणा यांचा मेळ साधतात. राष्ट्रीय अभिमानही वाढवतात. आक्रमण, बचाव किंवा शांतता मोहिमेला नाव यासाठी द्यायचे की, गुप्तता पाळतानाही तिला विशिष्ट ओळख मिळावी. मोहीम फत्ते करणाऱ्यांना हुरूप यावा. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि गुप्तचर संस्था मिळून ही साधी, अर्थपूर्ण व सहज लक्षात राहणारी नावे ठरवतात. कारवाईची रणनीती, भौगोलिक व सांस्कृतिक संदर्भ किंवा प्रेरणादायी संकल्पनेशी ती नावे जोडलेली असतात.
कारगिलमधून घुसखोरांना सीमेपलीकडे पिटाळण्यासाठी १९९९ मध्ये राबविलेले ‘ऑपरेशन विजय’ हे नाव यशाचे, विजयाचे प्रतीक होते. सियाचीन हिमनदीवर नियंत्रणासाठी ‘ऑपरेशन मेघदूत’ हे संदेशवहनाचे प्रतीक कालिदासांच्या काव्यातून घेण्यात आले होते. ते उंच आणि बर्फाळ प्रदेशाशी सुसंगतही होते. १३ डिसेंबर २००१ च्या संसदेवरील भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना शाैर्य व धैर्याचे प्रतीक म्हणून ‘ऑपरेशन पराक्रम’ राबविण्यात आले. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कब्जा केलेल्या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी १९८४ मध्ये राबविलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’मधील निळा रंग शीख धर्माशी, तर स्टार शब्द मंदिराच्या पावित्र्याशी संबंधित होता. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोहिमेला ‘सूर्योदय’ असे नाव देण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपाने कुंकू हसले अन् आपण दोन पावले पुढे गेलो.shrimant.mane@lokmat.com