शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शांतता (अजूनही) तपास चालूच आहे!

By admin | Updated: August 18, 2015 21:44 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला उद्या दोन वर्षे पूर्ण होतील. अजून त्यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार शासन पकडू शकलेले नाही. गेल्या दोन वर्षात तपासाच्या

डॉ. हमीद दाभोलकर (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अनिस)डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला उद्या दोन वर्षे पूर्ण होतील. अजून त्यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार शासन पकडू शकलेले नाही. गेल्या दोन वर्षात तपासाच्या अनुषंगाने घडणाऱ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर असंख्य लोकांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते आहे की, खरंच या शासनाला डॉ.दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यामध्ये रस आहे का? कारणे अगदी सहज दिसून येणारी आहेत. डॉ.दाभोलकरांचा खून जिथे झाला तो ‘विठ्ठल रामजी शिंदे’ पूल पुण्याच्या भरवस्तीत आहे. त्याच्या एका बाजूला पन्नास फुटावर, ‘शनिवारपेठ’ पोलीस चौकी, तर दुसऱ्या बाजूला दोनशे फुटावर, ‘बालगंधर्व’ पोलीस चौकी. ज्यांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या ते दोघेजण, चाळीस मिनिटे शनिवारपेठ पोलीस चौकीच्या समोर गाडी लावून उभे होते. त्यांनी पन्नास फू ट चालत जाऊन गोळ्या झाडल्या आणि चालत परत येऊन ते गाडीवर बसून निघून गेले. पोलिसांच्या नोंदीनुसार त्यावेळी तिथे नाकाबंदी होती.पहिला प्रश्न असा पडतो की, एखाद्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यासाठी पोलीस चौकीच्या समोर गाडी लावून थांबण्याचे मारकऱ्यांचे धाडस होतेच कसे? त्याला जोडून येणारा दुसरा प्रश्न म्हणजे, ही घटना घडत असताना पोलीस चौकीतील आणि नाकाबंदी करणारे पोलीस कुठे होते? याचे दोनच अर्थ निघू शकतात. एक तर त्या ठिकाणचे पोलीस अत्यंत अकार्यक्षम होते अथवा त्यांना हे मारेकरी पकडण्यात रसच नव्हता. तपासातली येथपासून सुरु होणारी परवड उत्तरोत्तर वाढतच जाताना दिसते.दाभोलकरांच्या खुनाच्या दुसऱ्या दिवशी या घटनेचा आनंद व्यक्त करणारे लेख लिहिले गेले. मागच्या दोन वर्षांमध्ये हे लेख लिहिणाऱ्यांची साधी चौकशीदेखील तपास यंत्रणांनी केलेली नाही. पुढे जाऊन पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी तर गुन्हेगार पकडण्यासाठी प्लँचेटचा वापर केला. ज्या डॉ. दाभोलकरांनी आपले उभे आयुष्य ‘आत्मा, पुनर्जन्म ,प्लँचेट’ यांच्या विरोधात लढण्यासाठी वेचले. त्यांच्याच वाट्याला इतका अशास्त्रीय तपास आला. आघाडी शासनाच्या काळात पोलिसांच्या चौदा टीम आणि एकशेचाळीस मनुष्यबळ या खुनाच्या तपासासाठी काम करीत असल्याचे सांगितले गेले, पण केवळ लोकक्षोभाला उत्तर म्हणून हे आकडे सांगायचे पण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी संशयाची सुई जाते त्या ठिकाणी कसून तपास करायचा नाही असेच एकूणात तपासाचे सूत्र गेल्या दोन वर्षामध्ये राहिले. पुढे न्यायालयाच्या आदेशाने तपास सीबीआय या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेकडे देण्यात आला. पण तिथेदेखील तपासातली परवड थांबत नाही .सीबीआयने तपासासाठी जो अधिकारी दिला, तो हिंदी भाषिक होता आणि पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाची सर्व कागदपत्रे मराठीमध्ये. ही कागदपत्रे समजून घेण्यामध्येच पहिले तीनचार महिने गेले. इतकेच नाही तर पुण्यामध्ये घडलेल्या घटनेचा तपास सीबीआय मुंबईमध्ये बसून करते. पुण्यामध्ये सीबीआयचे कार्यालय असून देखील डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास करणारी टीम मुंबईमध्ये का बसते, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर सीबीआय देऊ शकत नाही. सीबीआयकडे स्वत:चे म्हणून मनुष्यबळ नाही आणि त्यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून महाराष्ट्र शासन त्यांना मनुष्यबळ पुरवत नाही. डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासामध्ये सरकार किती गंभीर आहे याचे हे सारे निर्देशांक आहेत. शासन ‘आघाडी’चे असो अथवा ‘युतीचे’, तपासामध्ये काहीही फरक पडत नाही.गोविंद पानसरेंच्या खुनाच्या तपासाबाबतीत काही वेगळे घडताना दिसत नाही. सहा महिने उलटून तिथेदेखील तपासात काही प्रगती नाही. डॉ. दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या घटनांमध्ये अनेक साम्यस्थळे असताना डॉ.दाभोलकरांच्या खुनाचा तपास करणारी सीबीआय आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास करणारी महाराष्ट्र राज्याची स्पेशल टीम यांच्यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेक वेळा विनंती करूनदेखील एकही संयुक्त बैठक झालेली नाही, हे खेदाने नमूद करावे लागते. गेल्या दोन वर्षांत तपासाच्या संदर्भाने आम्ही अनेक तपास अधिकारी आणि वेगवेगळ्या पक्षाच्या राजकारण्यांना भेटलो. आपल्या समाजातील पोलीस आणि राज्य यंत्रणांचे हे जवळून होणारे दर्शन भयचकीत करणारे आहे. डॉ दाभोलकर आणि गोविंद पानसरेंच्या खुनाच्या तपासामध्ये जर पोलीस आणि शासन असे वागत असेल तर समाजातील बाकीच्या घटकांशी ही यंत्रणा कशी वागत असेल याची कल्पनाच मन विषण्ण करते.या वेदनादायी पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र अनिस आणि समविचारी संघटनांनी ही लढाई अत्यंत संयमाने आणि निर्धाराने लढवली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे निषेध आणि राग व्यक्त करण्यासाठी एकही हिंसक प्रतिकिया महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये संघटनेने उमटू दिलेली नाही. लोकशाही आणि सनदशीर मार्गानेच ही लढाई अनिस लढली आहे. प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला अनिस महाराष्ट्रभर निदर्शने करते. ज्या पुलावर डॉ दाभोलकरांचे बलिदान झाले त्या ठिकाणी दर महिन्याला वीस तारखेला कार्यकर्ते जमतात. तपासातील दिरंगाईचा निषेध तर करतातच पण अनिसचे, विज्ञान बोधवाहिनी व जादूटोणा विरोधी कायद्याची जनसंवादयात्रा असे अनिसचे अनेक उपक्रम डॉ. दाभोलकरांचे जिथे बलिदान झाले तेथूनच कटाक्षाने सुरु केले गेले आहेत. ज्या व्यक्तींनी आणि विचारांनी डॉ दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्यांना आमचे हे उत्तर आहे की डॉ. दाभोलकरांना मारून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम थांबणार नाही. निषेध, धरणे, मोर्चे या सर्व गोष्टींच्या बरोबरीने रक्तदान, अनिस सभासद नोंदणी अभियान निर्भय प्रभातफेरी असे अनेक अभिनव निषेधाचे मार्ग अनिसने गेल्या दोन वर्षांमध्ये अवलंबिले. अनिसच्या इस्लामपूर शाखेने ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ हे रिंगण नाटक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनात बसवले आणि एका वर्षात त्याचे शंभर प्रयोग केले. सॉक्रेटीसपासून दाभोलकर-पानसरे यांच्यापर्यंत येणारी विवेकी विचारांची परंपरा, ते विचार मांडणाऱ्यांना सोसावे लागलेले त्रास आणि त्यासकट विवेकी विचारांचे टिकून राहणारे अस्तित्व याची प्रत्ययकारी मांडणी या रिंगण नाटकात करण्यात आली आहे.एका बाजूला खुनाचा तपास लागावा म्हणून करण्याचे प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला अनिसचे काम टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठीची लढाई गेले दोन वर्षे अनिस सातत्याने लढत आहे. पण ही लढाई केवळ अनिसची नाही. या देशात विचारस्वातंत्र्य लोकशाही आणि राज्यघटनेच्या चौकटीत देशाचे राज्य चालावे असे वाटणाऱ्या प्रत्येक संवेदनशील नागरिकाने या लढाईत सहभागी होणे आवश्यक आहे. नाही तर अनिसचे मूठभर कार्यकर्ते आणि शासनाची असंवेदनशील आणि अकार्यक्षम यंत्रणा यांच्या विषम लढाईमध्ये शांतता तपास चालू आहे .... यापेक्षा वेगळे काही हाती येणार नाही .