शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

अपराध्यांच्या हाती देश असावा काय?

By admin | Updated: February 15, 2017 23:49 IST

अम्मा ऊर्फ जयललिता, चिन्नम्मा ऊर्फ शशिकला आणि त्यांचे दोन अन्य सहकारी यांच्याविरुद्ध अवैध मार्गाने प्रचंड संपत्ती गोळा केल्याचा खटला १९९६ मध्ये

अम्मा ऊर्फ जयललिता, चिन्नम्मा ऊर्फ शशिकला आणि त्यांचे दोन अन्य सहकारी यांच्याविरुद्ध अवैध मार्गाने प्रचंड संपत्ती गोळा केल्याचा खटला १९९६ मध्ये तामिळनाडूच्या एका कनिष्ठ न्यायालयात दाखल झाला. तीन वर्षांत त्याचा निकाल लागून न्यायालयाने त्या चौघांनाही चार वर्षांच्या तुरुंगवासाची व प्रत्येकी दहा कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. अम्मा आणि चिन्नम्माने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपली सत्तापदे कायम राखली. ती आता जयललितांना त्यांच्या निधनामुळे आणि चिन्नम्माला सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा केल्यामुळे सोडावी लागली. चिन्नम्मांसह उर्वरित दोघांना आता कर्नाटकच्या तुरुंगवासात पुढली चार वर्षे घालवायची आहेत. या साऱ्यांत व्यथित करणारा प्रकार, डोक्यावर चार वर्षांचा तुरुंगवास व दहा कोटींचा दंड असताना अम्मा आणि चिन्नम्मा तामिळनाडू सरकारातील सर्वोच्च पदावर राहिल्या. या काळात अम्मांनी तीन वेळा मुख्यमंत्रिपद अनुभवले. जनतेची लूट केली आणि त्यांची संपत्ती या संबंध काळात वाढतीच राहिली. देश व समाज यांचा एवढा मोठा अपराध करणारी माणसे तब्बल १९ आणि २० वर्षे जनतेवर राज्य करतात आणि देश लुबाडून खातात हा प्रकार आपल्या न्यायव्यवस्थेतील दिरंगाईला अपराधी ठरवणारा आणि लोकशाहीला लाज आणणारा आहे. अम्मा व चिन्नम्मा या एकट्याच या गैरव्यवस्थेचा वापर करून सत्तेत राहिल्या असे नाही. कर्नाटकचे रेड्डी बंधू, बिहारचे लालू यादव, गुजरातचे अमित शाह, मध्य प्रदेशातील व्यापंम घोटाळ्याशी संबंध असलेले सगळे आजही मोठ्या सत्तापदांवर आहेत आणि जनतेची लूट करीतच ते देशाला नीतीचा उपदेश करीत आहेत. महाराष्ट्रातले छगन भुजबळ अपराधी असतानाही सत्तेवर होते. आताच्या सत्ताधाऱ्यांत व विरोधी बाकांवर बसणाऱ्यांत शिरावर अपराधाचे ओझे असलेली माणसे मोजायला घेतली तर हातापायांची बोटे त्यासाठी पुरी पडायची नाहीत. खुद्द संसदेत खुनाचा गुन्हा केल्याचा आरोप असणारे शंभरावर, बलात्कारवाले दीडशेवर, खंडणीखोर दोनशेवर आणि किरकोळ गुन्हे करणारे आणखी अनेकजण त्यात आहेत. अशा अपराध्यांची आकडेवारी अनेकदा जाहीरही झाली आहे. चिटफंडाचा व्यवहार करून लोकांना लुबाडणारे, संरक्षणाच्या नावाखातर खंडणी वसूल करणारे आणि गौरी-गणपतीची वर्गणी म्हणून लोकांमागे तगादा लावणारे किती अपराधी आपल्या राजकारणात आणि त्यातल्या सत्तापदांवर आहेत याची स्वतंत्र शिरगणती होणेच आता आवश्यक आहे. आपण केलेल्या कोट्यवधींच्या अपराधासाठीही आपल्याला वीस-वीस वर्षे काही होत नाही हा दिलासा गुन्हेगारांसाठी आश्वासक तर सामान्य माणसांसाठी भयकारी ठरणारा आहे. मनात आणले तरी या मोठ्या माणसांचे अपराध न्यायालये अग्रक्रमानेही निकालात काढू शकतात. काही वेळा त्यांनी तसे केलेही आहे; मात्र बहुसंख्य प्रकरणे लांबत जातात आणि ती लांबत राहतील अशी व्यवस्था आपले हिकमती पुढारी न्यायालयांशी संधान जुळवून करीत असतात. १९७५ ची आणीबाणी अस्तित्वात असताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचे सभापती या चौघांपैकी कोणावरही फौजदारी गुन्हे दाखल होऊ नयेत अशी घटनादुरुस्ती आणून त्या चार थोरांना कायमचे निर्दोष राखण्याचा प्रयत्न झाला. नंतरच्या काळात तो फसला असला तरी तसा परिणाम साधणाऱ्या तरतुदी आणि पळवाटा कायद्यात शिल्लक आहेत आणि आपली न्यायालयेही त्या रोखून धरण्यात आजवर अपयशी ठरली आहेत. सामान्य गुन्हेगार पकडले जातात आणि असामान्य गुन्हेगार आरोप सिद्ध झाल्यानंतरही दिमाखाने समाजात मिरवितात. जयललितांचे असे मिरविणे, लोकांनी झुंडींनी येऊन त्यांच्या पाया पडणे, त्यांच्यापुढे मंत्र्यांनी लोटांगण घालणे आणि लाखो लोकांच्या सभेत त्यांनी नीतीचा उपदेश करणारी राजकीय व्याख्याने देणे हा प्रकार तामिळनाडूच्या अंगवळणी पडल्यासारखा आहे. त्यांच्या विरोधात बसणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्यांवर हजारो कोटींनी देश बुडविल्याचा आरोप आहे. त्यात ए. राजा आणि कनिमोझीसारखी त्या पक्षाच्या नेत्यांच्या नात्यातली माणसे आहेत. तात्पर्य, देश, समाज व न्याय यांची अधोगती रोखायला आता जनतेनेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. ‘या बड्यांविरुद्ध लागलेले खटले आधी निकालात काढा आणि त्यांच्याकडून त्यांच्या अपराधी असण्याच्या काळात होऊ शकणारी आमची लूट व फसवणूक थांबवा’ असे जनतेनेच न्यायालयांना आता बजावले पाहिजे. एका व्यक्तीचा खून करणारा माणूस येथे खुनी होतो; मात्र शेकडोंच्या वा हजारोंच्या संख्येने माणसे मारणारे पुढारी धर्माचे व नीतीचे संरक्षक म्हणून मोकळे राहतात. अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे उपाध्यक्ष स्पायरो अ‍ॅग्न्यू हे त्यांच्या पदावरून सरळ दहा वर्षांच्या तुरुंगवासात गेले. कोणत्याशा राज्याचे गव्हर्नर असताना त्यांनी केलेला अपहार तेव्हा त्यांच्या आड आला होता. मोठी माणसेच मोठा अपराध करू शकतात. सबब त्यांना मोठी शिक्षा होणे व तीही तत्काळ होणे लोकहिताचे आहे. लोक लुबाडले जातात आणि त्यांना लुबाडणारे पोलिसांच्या सलाम्या स्वीकारतात, हे दृश्यच आपली मान शरमेने खाली जायला लावणारे आहे.