सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था मुख्यत: तेलावर अवलंबून होती, आजही आहे; पण आपल्याकडचं खनिज तेल संपलं तर काय, असा प्रश्न अनेक अरब देशांपुढे आहे, तसा तो सौदी अरेबियालाही आहे. आज तेलाच्या बळावरच या देशांची भरभराट झाली आहे; पण हेच वैभव भविष्यातही टिकून राहील असं नाही. कारण तेलाचे साठे संपल्यावर काय, शिवाय तेलाला दुसरे समर्थ पर्याय निघाले तर या देशांची स्थिती आणखी बिकट होईल.
याच कारणानं सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी २०१७ मध्ये ‘नियॉम’ हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. ‘व्हिजन २०२०’ या उपक्रमांतर्गत १७० किलोमीटर लांबीच्या ‘द लाइन’ नावाच्या दोन गगनचुंबी इमारतींचा या प्रकल्पात समावेश आहे. तेलावरचं आपलं अवलंबित्व कमी होऊन, भविष्याचा विचार करून तयार केलेला हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. १५ लाख लोकांसाठी आणि सन २०३० पर्यंत पूर्ण होईल या अपेक्षेनं तयार करण्यात येत असलेल्या या प्रोजेक्टकडे केवळ सौदी अरेबियाचंच नव्हे, तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे.
जगातलं सर्वांत प्रगत असं हे भविष्यवेधी शहर असणार आहे. सौदी अरेबियानं आपल्या स्वप्नातल्या या प्रोजेक्टसाठी खूप सारा पैसा तर पणाला लावला आहेच; पण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसंच जगातल्या अनेक देशांकडून त्यासाठी भरभक्कम कर्जही घेतलं आहे. तेही याच भरवशावर की जगाच्या दृष्टीनंही हा ‘भविष्यातला प्रोजेक्ट’ असेल आणि यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या मांडीला मांडी लावून आपल्याला बसता येईल. त्याचं अपेक्षेनं अनेक देशांनी त्यांना कर्जही दिलं; पण आज या प्रोजेक्टची काय स्थिती आहे?
हाच प्रोजेक्ट सौदी अरेबियाला गाळात घालेल की काय, असं आज अनेकांना वाटू लागलं आहे. आपल्या मूळ दिशेपासून तो भरकटताना दिसतो आहे. २०१७मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प ५०० अब्ज डॉलर्समध्ये पूर्ण होईल असं म्हटलं जात होतं; पण या प्रकल्पाचा खर्च आता ८८०० अब्ज डॉलर्सपर्यंत (८.८ ट्रिलियन डॉलर) जाईल, असा अंदाज आहे. सौदी अरेबियाच्या एकूण वार्षिक बजेटपेक्षा हा खर्च तब्बल २५ पटींनी अधिक आहे.
१५ लाख लोकांची या प्रकल्पातून सोय होईल, असं म्हटलं जात होतं; पण तोच अंदाज आता घटवून तीन लाख लोकांपर्यंत आणण्यात आला आहे. जो प्रकल्प २०३० पर्यंत म्हणजे साधारण तेरा वर्षांत पूर्ण होईल असा कयास बांधला जात होता, तो अजून ५५ वर्षं; काहींच्या मते पुढील शंभर वर्षांतही तो पूर्ण होईल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अनेकांचं म्हणणं आहे, एक खोटं, अतिरंजित, बनावट लक्ष्य समोर ठेवून या प्रकल्पाबाबत भ्रामक दावे केले गेले. यात अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा मोठा वाटा होता. उपग्रहातून घेतलेली छायाचित्रं दाखवतात, या प्रकल्पाची अजून फारशी प्रगती झालेली नाही. काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. प्रकल्पावरील तब्बल २१ हजार कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आहे, इथे काहीच भवितव्य नाही म्हणून अनेक कर्मचारी काम सोडून गेले आहेत. प्रकल्प तर डब्यात जाताना दिसतो आहे; पण कन्सल्टन्सी फर्म्स मात्र खोऱ्यानं पैसा कमवत आहेत.