शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मिठाच्या ‘व्यसना’ने भारतीयांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 06:40 IST

मिठाच्या ‘व्यसना’मुळे लाखो भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. याकडे गांभीर्याने पाहायला हवे.

विनय र. र., विज्ञान प्रसारक

मिठाच्या ‘व्यसना’मुळे लाखो भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. याकडे गांभीर्याने पाहायला हवे. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये दैनंदिन आहारात खूप मोठ्या प्रमाणात मीठ वापरले जाते आणि ते अतिशय धोकादायक आहे, भारतामध्ये मिठाचे सेवन दररोज सुमारे ११ ग्रॅम आहे, ते तीन ग्रॅमपर्यंत आणले पाहिजे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच भारताला दिला आहे.

भारतामध्ये मिठाचे सेवन जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या कमाल ५ ग्रॅम प्रतिदिनपेक्षा दुपटीहून अधिक आहे. आहारातील मिठाचे सेवन कमी न केल्यास, दरवर्षी ४० ते ६९ वर्षे वयोगटातील अंदाजे ८३ लक्ष भारतीयांच्या हृदयात रक्ताची गुठळी होणे, तसेच हृदयविकाराचे रुग्ण वाढतील. त्यातील २० लक्ष केवळ या कारणाने मृत्यू पावतील, याकडेही जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे लक्ष वेधले आहे. हे टाळण्यासाठी पुढील ३० वर्षांच्या कालावधीत मिठाचे सेवन दररोज ११ ग्रॅमऐवजी केवळ ३ ग्रॅम केल्यास हा धोका टाळता येऊ शकेल.

भारताच्या राष्ट्रीय कृती आराखड्यात आणि असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी २०२५ पर्यंत; म्हणजे पुढच्या साधारण एक-दीड वर्षात मिठाच्या सेवनातील ३० टक्के घट साध्य करण्यासाठी सरकार आणि फास्ट फूड उत्पादकांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. मीठ उत्पादकांनीही ‘आरोग्याच्या सगळ्या कमतरता आम्ही मिठाच्या माध्यमातून दुरुस्त करू, असा चंग बांधू नये.’ नाहीतर, इलाज व्हायच्या ऐवजी अनारोग्य बळावेल.

भारतात अलीकडे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रेडिमेड, खारवलेले अन्नपदार्थ.. याशिवाय भारताच्या पारंपरिक पदार्थांत म्हणजेच पापड, लोणची.. यामध्येही मिठाचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणावर असते. जास्त मीठ खाण्याची सवय लागल्यावर त्याची चटक लागते. कालांतराने मिठाचेच व्यसन लागते आणि लोक अधिकाधिक मीठ खाऊ लागतात. मिठाच्या या व्यसनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होतोच होतो.

युरोपियन युनियनने मिठाच्या प्रमाणानुसार तयार खाद्यपदार्थांचे वर्गीकरण केले आहे. तसा उल्लेख वेष्टणावर केला जातो. मिठाचा वापर चार वर्षांत १६% कमी करण्याचा निर्णयही युरोपियन युनियनने घेतला आहे.

बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, इंग्लंड, ग्रीस, हंगेरी, नेदरलँड, पोर्तुगाल, स्लोवाकिया या देशांमध्ये बेकरी पदार्थात मर्यादित मीठ ठेवण्यासाठी कायदे आहेत. तसेच सॉस, चीज, मांस व तृणधान्यापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये असणाऱ्या मिठावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, तुर्कस्तान या देशांत ब्रेडमध्ये एक ते दोन टक्क्यांपेक्षा जास्त मीठ वापरण्यास बंदी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार दरडोई दर दिवशी मिठाचे प्रमाण ५ ग्रॅम पुरेसे आहे. मात्र, आपण भारतीय प्रचंड मीठ खातो. जास्त मीठ खाण्यामुळे रक्तदाबावर विपरीत परिणाम होतो. वाढीव मिठामुळे शरीरातील पेशींमधून रक्तात अधिक पाणी ओढले जाते. त्यामुळे रक्ताचे आकारमान वाढते आणि हृदय, रक्तवाहिन्या, मूत्रपिंडे यांच्यावर ताण येतो. आपल्याकडे बैठ्या जीवनशैलीमुळे आधीच हृदय व रक्तदाब विकार वाढले आहेत. त्यात मिठाच्या अधिक सेवनाने भर पडत आहे. मृत्यूच्या कारणांत याचा वाटा २६ % झाला आहे.

कोणत्याही मिठाचे सेवन आरोग्याला सारखेच. मात्र, भारत सरकारने आयोडाईज्ड मिठाची सक्ती केल्यामुळे नैसर्गिक समुद्री मीठ खाण्यासाठी विकणे हा गुन्हा ठरतो. समुद्री मीठ हा शरीरासाठी आयोडीन उपलब्ध होण्याचा सर्वांत चांगला स्रोत आहे. आयोडीनच्या अभावामुळे गलग्रंथी सुजतात. भारतात २० कोटी लोकांना हा आजार आहे. दर सात माणसांमागे एक!

फ्री फ्लो मिठात वरून आयोडीन क्षार घातलेला असतो. १ किलो मिठात २० मिलीग्रॅम आयोडीन क्षार मिसळतात. त्याची किंमत सुमारे २ पैसे आहे. दळलेले मीठ ५ रु. किलो. मात्र, आयोडाईज्ड फ्री फ्लो मीठ २६ रु.पासून १०० रु. किलोपर्यंत मिळते! समुद्राच्या मिठामध्ये पोटॅशियम क्लोराईडचे प्रमाण २.४६ टक्के असते ते फ्री फ्लो मिठामध्ये नगण्य असते. काही कंपन्या मिठात पोटॅशियमचे प्रमाण वाढवतात. एक किलो मिठात १६ ग्रॅम इतके पोटॅशियम क्लोराईड घालतात. ते मीठ ५० रु. ते २०० रु. किलोपर्यंत विकले जाते! आता लोहयुक्त आयोडाईज्ड फ्री फ्लो मीठ बाजारात आले आहे. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. भारतात पुरुषांमध्ये २५% तर महिलांमध्ये ५७% ॲनिमिया आहे. आपल्याला रोज ४० मिलीग्रॅम लोहाची आवश्यकता असते. १ ग्रॅम मिठात १.१ मिलिग्रॅम लोह घालायला भारतीय आरोग्य खात्याची मान्यता आहे. या लोहाची किंमत ०.०२५ पैसे असते. मात्र, हे मीठ ५० ते ९० रु. किलोने विकले जाते.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाने गरिबापासून कोट्यधीशांपर्यंत सर्वांना जागे केले होते. आजही - नैसर्गिक मीठ हा आमचा अधिकार आहे, या विचाराने सर्वांनी जागे होण्याची आवश्यकता आहे.

कुदरती नमक - अच्छा नमक!

शरीराला आवश्यक असणारे क्षार आणि खनिजे आपल्याला भाजीपाला, फळे, फळभाज्या, मांसाहार यातून पुरेशा प्रमाणात मिळतात. आहारात विविधता आणि सर्वसमावेशकता ठेवली तर चांगलेच. कधीतरी चंगळ म्हणून ‘चवीपुरते चिमूटभर मीठ’ पुरेसे आहे - मग, ते समुद्री असो वा खनिज वा हिमालयी - फार फरक नाही. कोणत्याही प्रक्रिया केलेल्या महागड्या मिठाची गरज नाही. सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक मीठ उत्तम.