शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: आपण कोरडे पाषाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 08:58 IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अखेर त्यांना जे करायचे होते ते केलेच!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अखेर त्यांना जे करायचे होते ते केलेच! शुक्रवारी त्यांनी डोनेस्क, लुहान्स्क, खेरासन आणि झापोरेझिया हे युक्रेनचे चार प्रांत रशियात समाविष्ट करून घेतले. त्या प्रांतांमध्ये घेतलेल्या सार्वमतात स्थानिक नागरिकांनी रशियात सामील होण्याचा कौल दिला आणि त्यानुसार हे सामिलीकरण झाले, असे पुतीन यांनी जाहीर केले आहे. गत फेब्रुवारीत युक्रेनवर आक्रमण सुरू करताना, लवकरात लवकर संपूर्ण युक्रेन घशात घालण्याचीच पुतीन यांची मनीषा होती; मात्र युक्रेनने अनपेक्षितरीत्या केलेल्या चिवट प्रतिकारामुळे ती धुळीस मिळाली. 

परिणामी रशिया आणि पुतीन यांच्या प्रतिमेला चांगलाच धक्का पोहचला. त्याची थोडी फार भरपाई करण्यासाठी म्हणून पुतीन यांनी सार्वमताचे नाटक करून युक्रेनचे चार प्रांत हडपले, हे स्पष्ट आहे. पुतीन यांच्या या कृतीची जगातील बहुतांश देशांनी निंदा केली आहे. विशेषतः उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच ‘नाटो’चे सदस्य देश तर पुतीन यांच्यावर चांगलेच तुटून पडले आहेत. रशियाचे हे कृत्य बेकायदेशीर असून, अशा हिंसक साम्राज्यवादास एकविसाव्या शतकात अजिबात स्थान नाही, असा सूर सर्वच पाश्चात्य देशांनी लावला आहे. तत्पूर्वी युक्रेनच्या चार प्रांतांच्या रशियातील सामिलीकरणाची घोषणा करताना, पुतीन यांनीही पाश्चात्य देशांवर चांगलीच आगपाखड केली. मध्ययुगीन कालखंडापासूनच पाश्चात्य देशांनी वसाहतवादी धोरणे अंगिकारली असून, रशियालाही आपली वसाहत बनविण्याची त्यांची योजना होती, असे टीकास्त्र पुतीन यांनी डागले. 

पाश्चात्यांनी भूमी आणि संसाधनांच्या हव्यासापोटी माणसांची प्राण्यांप्रमाणे शिकार केली, अनेक देशांना अमली पदार्थांच्या आगीत झोकले, अनेक देशांमध्ये वंशविच्छेद घडविले, यावरही त्यांनी बोट ठेवले. आज पाश्चात्य देश आणि रशिया दोघेही एकमेकांवर साम्राज्यवाद, विस्तारवाद, तसेच वसाहतवादाचे आरोप करीत आहेत; परंतु प्रत्यक्षात दोघांनीही भूतकाळात तेच केले आणि वर्तमानकाळातही तेच करीत आहेत. आज भले कोणताही पाश्चात्य देश मध्ययुगाप्रमाणे भौगोलिक विस्तारवादी नीतीचा अवलंब करीत नसेल; परंतु त्यांचा आर्थिक विस्तारवाद कोण नाकारू शकतो? ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड आदी युरोपातील देशांनी मध्ययुगीन कालखंडात उत्तर अमेरिकेपासून आशियापर्यंत आणि दक्षिण अमेरिकेपासून आफ्रिकेपर्यंत अनेक देशांना गुलामीत ढकलून ज्या वसाहती निर्माण केल्या, त्यांच्या पाऊलखुणा आजही जगभर दिसतात. 

आज युरोपमध्ये जी समृद्धी दिसते, तिचे श्रेय विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीएवढेच, गुलामीत ढकललेल्या देशांच्या अमर्याद लुटीलाही जाते, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर जी टीकेची झोड उठवली आहे, ती चुकीची म्हणता येणार नाही; पण अशा पाऊलखुणा जगभर विखुरलेल्या दिसत नाहीत म्हणून, रशिया साम्राज्यवादी नव्हता, असेही नव्हे! गत पाच शतकात सीमांमध्ये सातत्याने बदल होत, रशियाला मिळालेला क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या देशाचा बहुमान, हा लष्करी आक्रमणे आणि वैचारिक व राजकीय एकीकरणाचाच परिपाक होय! थोडक्यात काय, तर आज एकमेकांवर तुटून पडत असलेले पाश्चात्य देश आणि रशिया या बाबतीत एकाच पारड्यात आहेत! 

दोघेही एकमेकांना शाश्वत मानवी मूल्यांचा आदर करण्याचा आग्रह धरत असले तरी, प्रत्यक्षात दोघांचीही स्थिती ‘लोका सांगे ज्ञान, आपण कोरडे पाषाण’ याच श्रेणीत मोडणारी आहे! त्यामुळे रशियाने युक्रेनमध्ये मांडलेला डाव नजीकच्या भविष्यात संपुष्टात येण्याची शक्यता धूसर आहे. आठ वर्षांपूर्वी रशियाने अशाच प्रकारे युक्रेनचाच क्रायमिया हा प्रांत घशात घातला होता. तो अद्यापही रशियाच्याच ताब्यात आहे. त्यावेळीही पाश्चात्य देशांनी आताप्रमाणेच युक्रेनला थेट लष्करी साहाय्य करण्याऐवजी, रशियाला जी-८ मधून निलंबित करणे, आर्थिक निर्बंध लादणे, याच उपाययोजनांचा अवलंब केला होता. दुसरीकडे रशियाने त्यावेळीही अण्वस्त्रहल्ल्याच्या धमक्या दिल्या होत्या. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात पोळलेल्या पश्चिम युरोपातील देशांना कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या भूमीवर आणखी एका महाविनाशक युद्ध खेळल्या जायला नको आहे. त्यामुळे रशियावर अधिकाधिक कडक आर्थिक निर्बंध लादणे आणि युक्रेनला लष्करी साहित्य पुरविणे, यापलीकडे आणखी सक्रिय भूमिका पाश्चात्य देश अदा करतील, असे वाटत नाही. त्यांच्या या बोटचेपेपणामुळे रशियाचे मात्र आयतेच फावते ! 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन