सुपरस्टार सैंया अन् चालत्या बाइकवरचा रोमान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 08:46 AM2022-01-13T08:46:02+5:302022-01-13T08:46:10+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंडस काही वेळा नवे बदल घडवतात, अनेकदा कायदा मोडून जीव धोक्यात घालतात! या ट्रेंडसचं काय करावं?

Romance on a superstar army and a walking bike | सुपरस्टार सैंया अन् चालत्या बाइकवरचा रोमान्स

सुपरस्टार सैंया अन् चालत्या बाइकवरचा रोमान्स

Next

- गौरी पटवर्धन

नवरी म्हणजे बुजलेली, लाजलेली, दागिन्यांनी मढून एका जागी बसलेली हे गृहीतक समाजाने वर्षानुवर्षं परंपरेच्या अगदी काळजाशी धरून ठेवलं होतं. तिच्या बुजलेपणावर तिच्या शालीनतेची किंमत ठरवली जायची. मराठी चित्रपट आणि सिरियल्सनी या गृहीतकाला वेळोवेळी खतपाणीही घातलं. या सगळ्यामुळं नवरा जरी स्वतःच्या लग्नात नाचू शकत असला तरी नवरी मात्र एका जागी उभी किंवा बसलेली हे चित्र काही बदलेना. हिंदी सिनेमावरच्या पंजाबी प्रभावामुळं आणि मराठी माणसांवरच्या हिंदी चित्रपटांच्या प्रभावामुळं एक दिवसाची लग्नं वाढत- वाढत पाच दिवसांवर जाऊन पोहोचली; पण तरीही त्यातली नवरीची जागा मात्र तीच राहिली, २०२१ सालापर्यंत! 

२०२१ साली जुन्नर तालुक्यातल्या एका नवरीनं मांडवात एंट्री घेतली तीच मुळी “मेरे सैंया सुपरस्टार’’ या गाण्यावर नाचत. नवरा मुलगा स्टेजवर उभा होता आणि नवरी त्याच्याकडं बघून, त्याला उद्देशून मस्त नाचत- नाचत स्टेजपाशी आली. तिच्या मित्र- मैत्रिणी-करवल्यांनी तिच्या या नाचाचा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट केला, सोशल मीडियावर टाकला आणि तो ट्रेंड जणू काही वणव्यासारखा पसरला. ज्यांना नाचता येतं आणि नाचायला आवडतं अशा मुलींना स्वतःच्या लग्नात नाचत बोहोल्यापाशी येण्याची आयडिया इतकी आवडली की, आता अनेक लग्नांमध्ये नवरी मुलगी मस्त नाचत एंट्री घेते. काही वेळा नवरा मुलगा ते फक्त बघतो, तर काही वेळा तोही तिला जॉइन होतो. या एका ट्रेंडनं एरवी तसा काहीशा गंभीर आणि शांत वातावरणात पार पडणाऱ्या लग्नसोहळ्याला ट्रेंडी आणि यूथफुल करून टाकलं.

नवरीनं असं स्वतःच्या लग्नात नाचत येणं  प्रत्येकाला/ प्रत्येकीला आवडेलच असं नाही. ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी जुनी पद्धत आहेच; पण असं करायला आवडणाऱ्यांसाठी मात्र स्वतःचं लग्न एन्जॉय करण्याचा अजून एक मार्ग खुला झाला. सोशल मीडियाच्या उदयापूर्वी असं एखादीनं केलं असतं, तर तिच्याबद्दल चर्चा झाली असती, टीका झाली असती, कौतुक झालं असतं; पण तिच्याकडं बघून असं फार कोणी केलं नसतं. सोशल मीडियामुळं मात्र त्याचा ट्रेंड झाला आणि तो पटकन पसरला. असे अनेक ट्रेंडस् सोशल मीडियावर सतत येत असतात. त्यातले काही टिकतात, तर काही विरून जातात. जे टिकतात ते का टिकतात याचा काही पत्ता मात्र लागत नाही. काही वर्षांपूर्वी “सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय”नं असाच धुमाकूळ घातला होता.

अर्थात, सोनू काय आणि सैंया सुपरस्टार काय, हे तसे निरुपद्रवी ट्रेंडस् आहेत. त्यांच्यामुळं कोणाचं काही नुकसान होत नाही; पण सगळे सोशल मीडिया ट्रेंडस् आणि चॅलेंजेस् इतके निरागस नसतात. ‘ब्लू व्हेल चॅलेंज’मुळं मुलांचे जीव जाऊन त्यावर कायद्यानं बंदी आणावी लागली होती, ती काही फार जुनी गोष्ट नव्हे.  अशातच गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये एका तरुण जोडप्याचा चालत्या बाइकवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात मुलगा बाइक चालवतो आहे. मुलगी त्याच्या समोर त्याच्याकडं तोंड करून बसलेली आहे आणि ते दोघं चालत्या बाइकवर एकमेकांचं चुंबन घेताहेत, असा तो व्हिडिओ आहे. यात सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचं असं प्रदर्शन करावं का नाही, हा मतभेदांचा मुद्दा असू शकतो; पण बाइक चालवताना ड्रायव्हिंगमधलं लक्ष कमी होईल, अशी कुठलीही कृती करणं हे तर धोकादायकच आहे. तो कायद्यानंही गुन्हा आहे. अर्थातच या दोन मुद्यांवरच हा ट्रेंड व्हायरल होण्याची शक्यता वाढते.

सर्वसामान्यपणे तरुण मुलांना जे काही धोकादायक असेल ते थरारक वाटतं आणि कायदा मोडण्यात थ्रिल वाटतं. त्यामुळं असे ट्रेंडस् व्हायरल होण्याची भीती जास्त असते. हे ट्रेंडस् इतके पटकन पसरतात, की कोणाचं बघून कोण काय करतंय हे यंत्रणेला समजायच्या आत गावोगावी मुलांनी ते करून बघायला सुरुवात केलेली असते. ट्रेंडस् व्हायरल होणं या प्रकाराबद्दल काही वेळा अशीही शंका येते की, तरुण मुलांची बंडखोर वृत्ती लक्षात घेऊन समाजविघातक प्रवृत्ती मुद्दाम त्यांना असल्या कल्पना सुचवत असतील. अर्थात, तसं असेल किंवा नसेल तरी त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो. मग आता याला उत्तर काय? तर उत्तर म्हणून चांगल्या गोष्टींचा ट्रेंड व्हायरल होतो का, हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण जो नियम सोशल मीडियाला तोच नियम ट्रेंड‌्सना. ते तंत्र आहे, त्यामुळं ते चांगलं किंवा वाईट नसतं. आपण ते चांगल्या कारणासाठी वापरू शकतो का, हा खरा प्रश्न आहे.

Web Title: Romance on a superstar army and a walking bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.