- प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)एखाद्या व्यक्तीवर न्यायालयात खटला चालू आहे आणि नंतर तिची सुटका होते, तेव्हा ती निर्दोष आहे, असं ठरवायचं की, पुराव्याअभावी तिची सुटका झाली आहे, असं मानायचं?मराठीतील सुप्रसिद्ध सावरकरवादी विचारवंत व संशोधक शेषराव मोरे यांनी केलेल्या विधानामुळं हा प्रश्न उद्भवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना न्यायालयानं निर्दोष सोडलेलं असताना गांधी हत्त्येत त्यांचा हात होता, अशी बदनामी कोणी करीत असेल, तर या संबंधात पोलिसात तक्रार करता येते आणि ती करावी, असं मोरे यांनी अंदमानातील विश्व मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून जे समारोपाचे भाषण केले, त्यात म्हटलं आहे. मोरे हे संशोधक आहेत. त्यामुळं संशोधकी बौद्धिक शिस्तीनुसार तपशीलाबाबत ते काटेकोर असतील, असं मानायला हवं. म्हणून या साऱ्या गांधी हत्त्येच्या प्रकरणातील न्यायालयीन तपशील काय दर्शवतो, ते बघू या.या प्रकरणात नथुराम गोडसे व इतर आठ आरोपींच्या विरोधात २७ मे १९४८ रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आलं. सावरकर सात क्रमांकाचे आरोपी होते. आठवा आरोपी दिगंबर रामचंद्र बडगे याला माफीचा साक्षीदार म्हणून २१ जून १९४८ रोजी न्यायालयानं मान्यता दिली. त्याची एक आठवडा तपशीलवार उलट तपासणी झाली आणि तो विश्वासार्ह साक्षीदार आहे, अशा निष्कर्षाप्रत न्यायालय आलं. मगच त्याला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता देण्यात आली.हा तपशील विशेष लक्षात घेण्याचं कारण म्हणजे गांधीजींच्या हत्त्येच्या कटात सावरकरांचा हात होता की नाही, याबाबत न्यायालयानं जो निर्णय दिला, त्यात या बडगेची साक्ष महत्वाची होती. ‘नथुराम व आपटे या दोघांसमवेत मुंबईतील शिवाजी पार्क भागात असलेल्या ‘सावरकर सदनात’ मी १४ व १७ जानेवारी १९४८ अशा दोन वेळा गेलो होतो. दुसऱ्यांदा १७ जानेवारीला भेट संपल्यावर निरोप देताना, ‘यशस्वी होऊन या’, असं सावरकर म्हणाल्याचं मी ऐकलं. नंतर परत जाताना आपटे यानं मला सांगितलं की, गांधीजींची १०० वर्षे आताच भरली आहेत, हे काम यशस्वीपणं पार पाडलं जाईल, याची सावरकरांना खात्री आहे’.न्यायाधीश आत्मचरण दास यांनी १० फेब्रुवारी १९४९ ला निकाल देताना सावरकर यांच्याविषयी म्हटलं होतं की, ‘बडगेची साक्ष विश्वासार्ह आहे. पण त्याला पुष्टी देणारा जो पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला, तो नि:संदिग्ध व पुरेसा नाही. त्यामुळं अशा पुराव्याच्या आधारे सावरकर यांना दोषी मानणं योग्य ठरणार नाही’. गांधी हत्त्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून सावरकरांची न्यायालयानं मुक्तता केली, हे खरं. पण त्यांना निर्दोष ठरवलेलं नाही, केवळ ‘नि:संदिग्ध व पुरेसा पुरावा नसल्यानं’ त्यांची मुक्तता करण्यात आली, हे वरचा सगळा घटनाक्र म दर्शवतो.हा झाला न्यायालयीन खटल्याचा तपशील. याच काळात देशाचे गृहमंत्री असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे गांधी हत्त्येच्या कटातील सावरकरांच्या सहभागाबद्दल काय मत होतं, ते पाहू या. पंडित जवाहरलाल नेहरू यांना २७ फेब्रुवारी १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात पटेल यांनी म्हटलं आहे की, ‘बापूंच्या हत्त्येच्या तपासाबद्दल दररोज संध्याकाळी काही काळ मी संपूर्ण माहिती घेत असतो आणि जे काही मुद्दे उद्भवतात, त्यावर सूचनाही देत असतो...आतापर्यंत जो पुरावा समोर आला आहे, त्यानुसार सावरकरांच्या सूचनेनुसार काम करणाऱ्या (‘डायरेक्टली अंडर सावरकर’ असे पटेल यांचे शब्द आहेत ) हिंदू महासभेतील एका अतिरेकी गटानं बापूंच्या हत्त्येचा कट आखून तो अंमलात आणला’. श्यामाप्रसाद मुकर्जी यांना ७ मे १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात सरदार पटेल यांनी म्हटलं होतं की, ‘या खटल्यासंबंधात महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल सी. के. दफ्तरी यांच्याकडून मी सतत माहिती घेत असतो. जर सावरकरांना आरोपी करायचे असेल, तर त्याआधी माझ्याशी सल्लामसलत करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. अर्थात हा झाला न्यायालयीन कामकाजासंबंधीचा मुद्दा. पण नैतिकदृष्ट्या जर बघायचं झालं, तर गुन्ह्यातील एखाद्याच्या सहभागाबद्दल त्याला दोषी ठरवता येणं शक्य आहे.’ शेवटी सावरकरांना आरोपी करण्यात आलं. याचा अर्थ त्याला पटेल यांची संमती होती, हे उघड आहे आणि नैतिकदृष्ट्या सावरकर दोषी आहेत, असंही पटेलांना वाटत असल्याचं स्पष्ट होतं. मोरे यांची चलाखी अशी की, न्यायालयीन खटल्याचा हा सगळा तपशील सोईस्करपणं डोळेआड करून ते केवळ कपूर आयोगाच्या अहवालाचा उल्लेख करतात. ‘९९ दोषी व्यक्ती सुटल्या तरी चालेल, पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये’, या तत्वानुसार चालणाऱ्या न्यायालयीन कामकाजात जे शक्य झालं नाही, ते काम कपूर आयोगानं केलं, एवढाच काय तो फरक आहे.संशोधक मानले जाणारे मोरे हे इतकी बौद्धिक बेशिस्त दाखवतात; कारण एक भक्त म्हणून ते सावरकरांकडं बघत आहेत, संशोधक म्हणून नव्हे. मग ते तसा आव कितीही आणोत. सावरकरांचं जाज्वल्य देशप्रेम, क्रांतिकारत्व, विज्ञाननिष्ठा, जातीपातीला त्यांचा असलेला विरोध इत्यादीबद्दल दुमत असायचं कारणच नाही. पण हे सारं होतं, ते एकजिनसी समाज असलेलं बलिष्ठ हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी. आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते सावरकर, आंतरधर्मीय विवाहाचे कट्टर विरोधक होते. असं असूनही मोरे जेव्हा म्हणतात की, सावरकरांचंच काम दाभालकर पुढं नेत आहेत, तेव्हा ती सावरकरांवरील अंधश्रद्धाच असते.‘अखंड भारता’चं स्वप्न पाहणाऱ्या सावरकरांचे भक्त असलेले असे हे मोरे अंदमान भारतात असूनही ‘विश्व’ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारून ‘पुरोगामी दहशतवादा’वर बोलतात, तेव्हा वैचारिक भंपकपणा यापेक्षा त्याला दुसरं काय म्हणायचं?
संशोधक शेषरावांची बौद्धिक बेशिस्त
By admin | Updated: September 10, 2015 04:39 IST