शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

आठवणींच्या अंगणात राज कपूर नावाचा पक्षी

By विजय दर्डा | Updated: December 16, 2024 07:22 IST

राज साहेबांनी विचारले, ‘आप ने कभी तस्वीरों को बोलते हुए देखा है?...’ मी म्हणालो, ‘जी हाॅं, तस्वीरें अगर बोलती नही, तो हम रखतेही क्यूं?’

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

शाळेत माझा एक मित्र होता; भाऊ देशमुख. जिल्हाधिकाऱ्यांचा मुलगा. आता तो डॉक्टर आहे. बालपणी मोठ्या लोकांना पत्र लिहिणे त्याला आवडायचे. त्या काळातले मोठे लोक पत्र मिळाल्याचे कळवत. त्याने एक पत्र राज कपूर यांना पाठवले आणि त्यांनी त्या पत्राची पोच दिली. ते पोचपत्र त्याने मला दाखवले. राज कपूर यांना भेटता आले, कमीत कमी पाहता आले तर किती बरे होईल, असे त्यावेळी मनात आले. काळाच्या सोनेरी पानांवर नवी कहाणी लिहिली जाईल हे त्यावेळी कुठे ठाऊक होते!

त्या काळात राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार आणि सुनील दत्त यांचे मला जास्त आकर्षण वाटायचे. त्यातही राज कपूर आणि देव आनंद यांच्यासाठी माझ्या मनात विशेष जागा होती. राज कपूर यांना जवळून पाहण्याची संधी मला महाविद्यालयीन जीवनात मिळाली. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाच्या ‘जीना यहाँ, मरना यहाँ’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलावले गेले होते. त्यांच्यात मीही सामील झालो. आपला आवडता अभिनेता जवळून पाहणे आनंददायी होते. मात्र बोलणे झाले नाही.

पुढे काही वर्षांतच प्रत्यक्ष भेटीचीही वेळ आली. ‘माधुरी’ या चित्रपट विषयाला वाहिलेल्या पत्रिकेचा मी प्रशिक्षणार्थी पत्रकार होतो. राज साहेबांकडे मी भेटीची वेळ मागितली आणि त्यांचे बोलावणेही आले. मोठ्या प्रेमाने त्यांनी स्वागत केले. लुंगी आणि सफेद कुर्ता परिधान केलेले राज कपूर लेखणी आणि दौत घेऊन डेस्क पुढ्यात घेऊन केनच्या चटईवर बसले होते. मागे नर्गिस बरोबरचा त्यांचा सदाबहार फोटो लावलेला होता. मी त्या फोटोकडे पाहत राहिलो. 

‘त्या फोटोत काय ठेवले आहे? माझ्याकडे पाहा. ‘आप ने कभी तस्वीरों को बोलते हुए देखा है?...’ या त्यांच्या उद्गारांनी माझी तंद्री भंग पावली. माझ्या तोंडून निघून गेले, ‘जी हाॅं, तस्वीरें अगर बोलती नही, तो हम रखतेही क्यूं?’आमचे बोलणे सुरू झाले. मी त्यांना विचारले? ‘आपण इतके चांगले चित्रपट कसे तयार करता?’ ते उत्तरले, ‘तुम्ही जशा बातम्या लिहिता तसेच आम्ही चित्रपट निर्माण करतो.’ मी म्हणालो, ‘बातम्या तर घटनांवर आधारित असतात’... ते सांगू लागले, ‘आम्ही समाजाचे निरीक्षण करतो, ते चित्रपटांमधून मांडतो. ‘आवारा’ हा चित्रपट एकप्रकारे वेदनेची अभिव्यक्ती होती. ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटात तत्कालीन परिस्थिती दाखवली गेली. लोकांनी चित्रपट आपल्या जीवनात सन्निध ठेवले पाहिजेत. माझे मित्र शैलेंद्र यांना आपण भेटला आहात काय? चित्रपट गाजेल कसा ते शैलेंद्र उत्तम जाणतात.  माझे सहकारीसुद्धा माझ्या विचारात माझ्याइतके सामील असतात.’

बोलता बोलता त्यांनी विचारले, ‘आपण राहता कुठे?’ मी ‘चर्चगेट’ असे उत्तर दिले तेव्हा ते म्हणाले, ‘चला, मला तिकडेच जायचे आहे. वाटेत बोलू.’ 

निघता निघता राज साहेब म्हणाले, ‘मी आपल्या पिताजींना ओळखतो. माझे वडील आणि आपल्या कुटुंबाचा परिचय झालेला आहे.’ मी म्हटले, ‘यवतमाळच्या कार्यक्रमाला बाबूजींनी पृथ्वीराज कपूर यांना बोलावले होते हे मला माहीत आहे. एक नाटक घेऊनही ते आले होते. त्यावेळचे फोटो माझ्याकडे आहेत.’

 ते खुश झाले. मोटारीत त्यांच्या हातात एक पॅड होते.  मधूनच काहीतरी लिहायचे. मध्येच माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे. मी विचारले, ‘आपण गाता, वाद्य वाजवता, जीवनात इतके वैविध्य कसे आहे?’ 

ते म्हणाले, ‘आनंदात जगायचे की दु:खाचे रडगाणे गात, हे आपल्या हातात आहे. दोनवेळची भाकरी आपण गाणे गुणगुणत खातो की रडगाणे गात, ते खूप महत्त्वाचे आहे. खूप पैसे असलेले काही जेवताना रडतात हे मी पाहिले आहे. मिळेल तो भाकरतुकडा मस्तीत खाणारे गरीबही पाहिले आहेत मी!’

संधी साधत मी विचारले, ‘आपल्या कुटुंबातल्या मुली चित्रपटात काम का करत नाहीत?’ ते म्हणाले, ‘मुलीच का, मुलांनीही चित्रपटात काम करणे चांगले मानले जात नव्हते. आम्ही चित्रपटात काम करावे, असे आमच्या आजोबांना वाटत नसे!’

बोलता बोलता लोकमतच्या नागपूर आवृत्तीचीही चर्चा झाली. आपली बहीण ऊर्मिलाचे नाते सियाल परिवाराशी आहे, असे राज साहेब म्हणाले. एका लग्नासाठी ते मुलांबरोबर नागपूरला आले होते. त्यांच्या पत्नी कृष्णा जबलपूरच्या, परंतु पुष्कळ काळ त्या नागपूरमध्ये होत्या, असेही ते म्हणाले. माझे वडील स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी जबलपूरच्या तुरुंगात होते, हा संदर्भ दिला, तेव्हा त्यांनी जबलपूरच्या न्यू एंपायर सिनेमा हॉलविषयी सांगितले. त्याचा संदर्भ त्यांच्या सासूरवाडीशी होता.  प्रसिद्ध अभिनेते प्रेमनाथ, राजेंद्रनाथ तथा नरेंद्रनाथ हे त्यांचे मेव्हणे! बोलता बोलता मोटार चौपाटीवर भारतीय विद्याभवनच्या जवळ एका पानाच्या दुकानासमोर थांबली. पानवाल्याने तत्काळ पान तयार केले. त्यांनी खाल्ले. काही विडे सोबत बांधून घेतले; आणि तिथून मोटार सरळ चर्चगेटवर हॉटेलपाशी येऊन थांबली. मीही राज साहेबांच्या मागे मागे गेलो. कोपऱ्यातल्या एका टेबलावर जय-किशन बसले होते. राजसाहेब नेहमी तिथे चहा घ्यायला येत असत असे समजले. निरोप घेताना आर. के. स्टुडिओच्या होळीचे आमंत्रण मिळाले,  परंतु मी कधी जाऊ शकलो नाही.

बाबूजी उद्योगमंत्री असताना राजसाहेब त्यांना भेटायला आले. घर बांधायला सिमेंट मिळत नाही, असे ते सांगत होते. त्यावेळी सिमेंटची मोठी टंचाई होती.  परंतु, बाबूजींनी त्यांना सिमेंट मिळवून दिले. कारण राज कपूर भारताचे सांस्कृतिकदूत आहेत, अशीच त्यांची भावना होती. रशिया, जपान आणि इस्रायलमध्ये लोक आजही त्यांची आठवण काढतात. अलमाटीमध्ये एका हॉटेलचा संपूर्ण मजला त्यांच्या नावाने आहे.

राज साहेबांचे यवतमाळला येणे झाले नाही. पुढे कबड्डीच्या एका कार्यक्रमासाठी ऋषी कपूर यवतमाळला आले. हे नातेसंबंध पुढे नेण्यासाठी रणबीर कपूर यवतमाळला कधीतरी नक्की येतील अशी आशा मी बाळगतो. रणबीरमध्ये तर मला राज साहेबच दिसतात.

राज साहेबांना विनम्र आदरांजली. हम आपको कभी भुला न पाएंगे...

 

टॅग्स :Raj Kapoorराज कपूरVijay Dardaविजय दर्डाbollywoodबॉलिवूड