शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाचनीय लेख - इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्म ‘वेगळा’ का आहे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:51 IST

काय खावे-प्यावे, पूजा कशी-कोणाची करावी, काय वाचावे-पाहावे, सण कसे साजरे करावेत, हे अन्य कुणी सांगितलेले हिंदूना आवडत नाही !

पवन शर्मा

हिंदू कट्टर पंथीयांच्या बाबतीत एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हिंदू धर्माच्या बौद्धिक भव्यतेबद्दल त्यांना फार थोडी माहिती असते. हिंदुत्व हा शाश्वत धर्म आहे. सनातन धर्म. हजारो वर्षे तो टिकला, याचं कारण ‘हे करा ते करू नका’ अशा सूचना नव्हे; तर या धर्माकडे खूप मोठी बौद्धिक संपत्ती, तात्त्विक दृष्टी आहे म्हणून. मतमतांतराच्या भिन्न भिन्न छटा सामावून घेण्याची या धर्माची तयारी आहे. हिंदुत्व एकेश्वरवादी नाही. त्याची अनिवार्य अशी संहिता नाही. ठराविक पद्धतीने करावयाची सक्तीची प्रार्थना नाही. येथे धर्मगुरू नाहीत. एक नव्हे तर तत्त्वज्ञानाची सहा दर्शने या धर्माने सांगितली. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर मीमांसा आणि कदाचित सगळ्यात ताकदवान असे अद्वैत ही ती सहा दर्शने. संघटित अशा मध्यवर्ती तत्त्वज्ञानात मतभेदांचे स्वागत आहे. उदाहरणार्थ ऐहिकतेचा पुरस्कार करणाऱ्या चार्वाकाने वेदांना खोटे ठरवले तरी चार्वाकाला हिंदुत्वात स्थान आहे. तांत्रिक मंडळी मुख्य प्रवाहातल्या हिंदुत्वापासून वेगळी असतील; पण तरी ती त्या धर्माचा भाग आहेत. धर्मनिंदा किंवा पाखंडी मताबद्दल येथे कधी कोणाला सुळावर चढवण्यात आलेले नाही. 

आदी शंकराचार्यांना (७८८-८२०) हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते. ‘पारंपरिक हिंदू प्रथा पाळण्याचे बंधन माझ्यावर नाही,’ असे ते निर्भयपणे म्हणू शकले. निर्वाणशतक या आपल्या प्रसिद्ध स्तोत्रामध्ये ते म्हणतात ‘न मंत्रो, न तीर्थम, न वेद, न यज्ञ:’ याचा अर्थ असा की मंत्र, यात्रा, कर्मकांड; इतकेच नव्हे तर वेदही महत्त्वाचे नाहीत! महत्त्वाचे आहे ते ‘चिदानंद रूपम’ जागृती आणि आशीर्वचन. हिंदू देवतांची चित्रे आणि इतर अवडंबरांबाबत अलीकडे बरेच वादंग होत आहेत. ते समजून घ्यावयाचे तर आपल्याला सगुण आणि निर्गुण म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान समजून घेताना दिव्यत्वाच्या अनुभूतीतील हे द्वैत महत्त्वाचे आहे. निर्गुणाच्या मार्गाने पाहू जाता ब्रह्म अनंत, काही धारण न करणारे, निराकार, शाश्वत, अदृश्य आणि विश्वात सर्वसाक्षी आहे. देव त्यातूनच निर्माण झाले आहेत. आपले देव कसे असावेत, याची कल्पना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य हिंदू धर्म देतो. तुलसीदास म्हणतात ‘अगुण सगुण दुई ब्रह्मस्वरूप, अकथ, अगध, अनादी, अनुपा.’ निराकार निर्गुण आणि साकार सगुण ही एकाच ब्रह्माची दोन रुपे आहेत, जी अनिर्वचनीय, अथांग, अनादी आणि समांतर आहेत. ब्रह्म हे निराकार, अनंत असल्याने ईश्वराच्या पातळीवर त्याला देव किंवा देवी अशा रुपांच्या बंधनात टाकता येत नाही, पोथी निष्ठेत बांधता येत नाही, जे इतर धर्मात होते. हिंदूंच्या देवता अशा आहेत की ज्यांना कोणत्याही रुपात पाहता येते. यथाशक्ती पूजता येते. भक्त त्याच्या आवडीप्रमाणे आरती, स्तोत्र म्हणतो. आरास करतो. आपापल्या पद्धतीने आपल्या देवाशी संवाद साधतो.  प्रकट होताना देवाची आनंददायी मानवी रूपे अनेक असू शकतात. हे एकात अनेक आणि अनेकात एक असे आहे. म्हणूनच तर हिंदू दगडांची, झाडांची, पर्वतांची किंवा नदीची पूजा भक्तिभावाने करू शकतात.

देवांच्या गोतावळ्यात देवीला समान महत्त्व देणारा हिंदू हा कदाचित एकमेव प्रमुख धर्म असेल. तिच्या सगुण स्वरूपात देवी किंवा शक्तीला विविध प्रकारे मूर्त केले गेले आहे. अनंतत्वाची विविध रूपे साकार करण्याचा तो प्रयत्न आहे. सरस्वती ही ज्ञान, वाणी, कला आणि शहाणपणाची देवता. लक्ष्मी चांगल्या नशिबाची, समृद्धी, संपत्ती आणि प्रजनन शक्तीची देवता. पार्वती शिवशक्तीचे प्रतिनिधित्व करते. सीता ही आदर्श स्त्रीचे प्रतीक. राधा ही कृष्णाची प्रेमिका. देवीचे अत्यंत नाट्यपूर्ण रूप म्हणजे काली. तिला शिवाच्या साष्टांग; परंतु शांत शरीरावर तांडव करताना दाखवले आहे. ती वर्णाने काळी असून, डोळे मात्र लाल आणि केस पिंजारलेले आहेत. मुखातून जीभ बाहेर आलेली आहे. तिने मानवी कवट्यांची माळ गळ्यात घातली असून, तिला अनेक हात आहेत. त्यातल्या एका हातात खंजीर दिसतो. दुसऱ्यात तोडलेले मुंडके आहे. ती स्मशानात राहते. 

- ज्यांना देवत्व  सामान्य स्वरुपात पाहावयाचे आहे, त्यांच्यासाठी काली समजून घेणे जरा कठीण आहे. हिंदुत्वात परस्पर विरोधी गोष्टी एकमेकांच्या शेजारी आणून बसवून बौद्धिक अविष्कार घडवणे, हे काही नवीन नाही. कालीची प्रतिमा मुद्दामच अशी नाट्यपूर्ण चितारली गेली असावी. दिव्यत्वाच्या असाधारण मानवी क्षमता जाणवून देण्याचा हेतू त्यामागे आहे. तिच्या भक्तांसाठी ती अपराजित, अग्निशिखा, महाकाली आहे. ती दुष्टांचे  निर्दालन करते. - अशा महान धर्माला हिंदुत्वाच्या अर्धवट शिकलेल्या ठेकेदारांनी थिल्लर रूप देणे हा खरेतर गुन्हा आहे. हिंदुत्व ही जीवनशैली असून, त्यामागे ठाम अशी आखलेली भूमिका आहे. त्यामुळे तो निष्क्रिय धर्म होत नाही. उलट पक्षी प्रबळ सनातन धर्म होतो. अशा धर्माला केवळ कर्मकांडातील ‘हे करा ते करू नका,’ अशा स्वस्त चलनी व्यवहारांमध्ये उतरवणे योग्य नाही. खरे तर काय खावे, काय प्यावे, प्रार्थना कशी करावी, पूजा कशी, कोणाची करावी, काय वाचावे, सण कसे साजरे करावेत, कपडे कसे परिधान करावेत, हे सांगितलेले हिंदूंना आवडत नाही. ख्रिस्ती किंवा मुस्लिम धर्माच्या रीतींनुसार हिंदुत्वाचे रक्षण करता येणार नाही. हिंदू धर्म सर्व धर्मांचा आदर करतो; कारण मुळातच तो सहिष्णू आणि अनेकतेवर आधारलेला आहे आणि बहुसंख्य हिंदूंचा असा विश्वास आहे की धर्मपालन कसे करावे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्यांचा धर्म त्यांना देतो.

(लेखक राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :HinduहिंदूHinduismहिंदुइझम