शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का!

By meghana.dhoke | Updated: January 20, 2024 07:15 IST

रस्ते ओळखीचे, पायाखालचे होतात. अगदी दोन दिवसांत ओळखीचे वाटू लागतात इथले चौराहे, नाके, नुक्कड आणि गल्ल्या. इलेक्ट्रिक रिक्षाला ‘चलो सवारी’ म्हटलं की, शहरभर उभं-आडवं फिरता येतं; आणि मग ओळखीची होऊ लागते अयोध्या.

- मेघना ढोके(संपादक, लोकमत सखी डॉट कॉम)

अयोध्येत कुठून कुठंही फिरलं, हे शहर पिंजून काढलं तरी वीस किलोमीटरच्या परिघातच आपण फिरतो. रस्ते ओळखीचे, पायाखालचे होतात. अगदी दोन दिवसांत ओळखीचे वाटू लागतात इथले चौराहे, नाके, नुक्कड आणि गल्ल्या. इलेक्ट्रिक रिक्षाला ‘चलो सवारी’ म्हटलं की, शहरभर उभं-आडवं फिरता येतं; आणि मग ओळखीची होऊ लागते अयोध्या.अयोध्यातल्या माणसांचा जगण्याचा, परिस्थितीचा समंजस ‘स्वीकार’ त्या शहरात राहावं तसा हळूहळू दिसायला लागतो. समजू लागतो. 

या शहराला खळाळ नाही, जसा इथल्या शरयूला नाही. संथ. गंभीर. शांत. वाहणं फक्त आहे. तोच अलिप्त भाव माणसांमध्येही दिसतो. भांडून तंटून, हक्कानं काही मागावं असं काही इथल्या माणसांच्या बोलण्यात येत नाही. लोक मधाळ बोलतात. इतका उकाडा, गर्दी, तरी कुणी आवाज चढवून बोलत-भांडताना दिसत नाही. आजूबाजूची एकूण परिस्थिती कधी बदलेल असं आपणच चारचारदा विचारलं तरी उत्तर एकच, ‘समय लगेगा, बदलेगा धीरे धीरे. मंदिर निर्माण के साथ ही बदलाव आयेगा. इतने साल तो हम विवाद में ही घिरे रहे. राजनीति चली. अब शायद रामजीको लगा होगा, यह उचित समय है बदलाव का.’

जी काही अपेक्षा आहे, भरवसा आहे तो फक्त दोघांवरच. एक रामजी, दुसरे हनुमानजी. जैसा वो चाहे... अशीच सरसकट भावना! इथे घराघरात ‘ठाकूरजीका कमरा’ असतो. म्हणजे प्रभू रामचंद्रांची खोली! एखाद्या गरिबाच्या घरात भले अंधार असेल, पण ठाकूरजीका कमरा उजळलेला. सजलेला.  माणसं ठाकूरजींकडे पाहून जगतात. भोग-प्रसाद, बालभोग, कच्चा प्रसाद-पक्का प्रसाद, भंडारे, दर्शनाला येणारे यात्री आणि त्यांनी केलेलं दान-पुण्य यांवर हा सारा पसारा आपले सांसारिक भोग भागवतो. कच्चा प्रसाद म्हणजे साधं डाळ-भात, भाजी-रोटीचं जेवण आणि एखादं फळ. पक्का प्रसाद म्हणजे डाळ-भात-खीर-पुरी-हलवा-सब्जी-रोटीचं जेवण.

पंडे सोडून बाकीच्यांचीही लहानशी घरं. लहान-मोठी कामे सुरू असतात. लक्ष्मण घाट, झुमकी घाट, नया घाट, राज घाट असे अनेक घाट. इथं पर्यटक येतात. अंघोळ करतात. दिवे सोडतात. शरयू दर्शन करून खुश होतात. आता तर शरयू घाटावर नित्य सायं आरतीही होते, बनारससारखी. तिथं लहान-मोठी दुकानं लावून अनेक जण आपलं पोट भरतात.एक  चित्र मात्र मोठं विलक्षण असतं. त्याला म्हणतात, ‘मथावन’.

ज्यांना शरयू स्नान शक्य नाही, ते अनेक जण- विशेषत: स्थानिक लोक शरयू दर्शनाला नित्यनेमानं येतात. ओंजळीत पाणी घेऊन, ते डोक्याला लावतात. डोक्यावरून पाणी फिरवतात. डोळ्यांना लावतात आणि जमिनीवर डोकं टेकवून शरयूला नमस्कार करतात.  ही माणसं खूप वेळ स्तब्ध उभी दिसतात. जणू आपल्या मनातले व्यापताप शरयूला  सांगत असावीत.

इलेक्ट्रिक रिक्षांची ‘सवारी’ इथं फार स्वस्त. दहा-दहा रुपये सीट, म्हणजे सवारी. कुठंही जा, सवारी दहा रुपये. फैजाबादच्या दिशेनं मुख्य रस्त्यावर धावणारे ‘टेम्पो’, म्हणजे आपल्या डुक्कर रिक्षांचं जरा वेगळं भावंड; तेही दहा-वीस रुपये सवारीत अगदी थेट फैजाबादपर्यंत सोडतात. त्यामुळे फिरस्ती स्वस्त. खाणं स्वस्त रस्त्यावरचं. पंधरा रुपये पराठा, दहा रुपये समोसा, दस रुपया चावलपासून दर सुरू होतात. अनेक लोक पांढरा भात आणि गाड्य़ावर असलेल्या लोणच्याच्या बरणीतून लोणचं - एवढंच खाताना दिसतात.

ज्याची ऐपत जास्त तो म्हणतो, ‘लगा दो-दो पराठा और!’ बाकी कपभर चहा, बिस्कूट, चावल, समोसा हे खाणं तसं गरिबाचंच.मुख्यत्वे उत्तर भारतातूनच इथं दर्शनाला येणारा वर्ग गरीब; धर्मशाळा, आखाडे इथं राहणारा. त्याला परवडावं असं सारं जग. चकचकीत काही नाहीच.  सगळा साधा  मामला. जानकी महलच्या बाहेर चहाची टपरी चालवणारे अग्रवालचाचा सांगतात, ‘यहा लोग प्रभू की चरणो में आते है, कोई मौज के  लिए थोडी आते है? लक्झरी नहीं यहां, अध्यात्म ढुंढते है!’

बहुधा साऱ्या अयोध्येनंच हे मानलं आहे. सगळे सांगतात, ये आध्यात्मिक नगरी है, ब्यापारी नहीं.  पैसा नहीं, यहां त्याग सिखो. राजा की बेटी, राजा की बहू, रामजीकी पत्नी होकर सीताजी का रूप यहां त्याग का है. तो हम कौन है?’अयोध्येत फिरताना सतत कानावर पडत असतं, जैसी ‘सरकार’की मर्जी... जैसा रामजी चाहे... जो हनुमानजी ठीक समझे!अयोध्येत लोक म्हणतात की,  जिथं प्रत्यक्ष रामाला वनवास होतो, सीताजींना लोक छळतात, संसारातले मानवी भोग त्यांना चुकत नाहीत, तर आपल्याला त्रास होतो त्याचं काय एवढं?

- रामलल्लाचं मंदिर निर्माण सुरू झाल्यावर या गावाने आस धरली... सगळं बदललं... शहरात मोठी रौनक आली!शरयू वाहत असते तिची ती. आणि अयोध्या अशी भेटते अनेक रूपांत. पण मानवी चेहऱ्यात. सुख-दु:खांसह. आपण मुक्कामी जातो, त्याहून वेगळी दिसते अयोध्या निघता निघता. आणि थोडी सोबतही येते आपल्याबरोबर!लोक शरयूचे जल नेतात बाटलीत भरून थोडंथोडं घरी जाताना. तशी अयोध्याही येतेच आपल्या सोबत.येताना आणि परत जाताना इथं आलेला जीव सारखाच नसतो म्हणतात! 

लोकमत 'दीपोत्सव’ २०२१ मध्ये प्रसिध्द झालेल्या प्रदीर्घ लेखाचा संपादित अंश.(छाया : प्रशांत खरोटे)

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या