शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

राजनाथसिंहांची कोंडी

By admin | Updated: May 20, 2015 23:29 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार करीत असून, त्यासाठी त्यांनी संघाकडे परवानगी मागितली असल्याचे वृत्त महत्त्वाचे आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार करीत असून, त्यासाठी त्यांनी संघाकडे परवानगी मागितली असल्याचे वृत्त महत्त्वाचे आहे. गेल्या आठवड्यात नक्षलवादाचे निमित्त करून त्यांनी जी नागपूरवारी केली तिचा खरा उद्देशही तोच होता. राजनाथसिंह हे मोदी सरकारवर आरंभापासून नाराज आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले तेव्हा ते पक्षाचे अध्यक्ष होते. संघाच्या सूचनेवरून ते पद सोडून मोदींच्या प्रचारात सहभागी झाले. गृहमंत्री व पक्षाचे एक ज्येष्ठ नेता या नात्याने त्यांचा मंत्रिमंडळातील क्रमांक दुसरा असल्याचे सांगितले जाते. परंतु त्यांच्या वाट्याला येत असलेली राजकीय वंचना, सरकारी कामकाजात त्यांची होत असलेली उपेक्षा आणि मोदींची वकिली करण्याचे त्यांच्याकडे नसलेले दुसरे काम पाहता एकेकाळी कार्यक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याची सध्याची मानसिक कुचंबणा कोणाच्याही लक्षात यावी. त्यातून त्यांचे चिरंजीव पंकजसिंह यांच्या कथित भ्रष्टाचाराचा पुरावा दर्शविणारी एक चित्रफीतच मोदींनी त्यांना आरंभी दाखविली. त्या भ्रष्टाचाराचा गवगवाही फार झाला. मात्र मोदी सरकारने त्याला उत्तर देण्याचा एकही प्रयत्न कधी केला नाही. तेव्हापासून सुरू असलेली आपली कोंडी राजनाथांना आता असह्य होऊ लागली आहे. त्यांच्या खात्याच्या सचिवपदावर त्यांना न विचारता एल. सी. गोयल यांची पंतप्रधानांच्या कार्यालयाने केलेली नियुक्तीही त्यांना अपमानकारक वाटते. केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीचे ते सदस्य असताना त्यांच्याच खात्यातील नियुक्तीबाबत त्यांना डावलले गेल्याचा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला आहे. याच काळात त्यांच्या खात्याला दिला जाणारा निधी सरकारने कमी केला व त्यामुळे पोलीस व इतर यंत्रणांमध्ये करावयाच्या सुधारणा जागच्या जागी राहिल्या. कोणत्याही महत्त्वाच्या व धोरणविषयक प्रश्नाबाबत मोदी त्यांना विचारत नाहीत आणि त्यांचे मतही घेत नाहीत. त्यातून पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या आक्रमक व आगाऊ राजकारणावर राजनाथ संतप्त आहेत. मोदी, शाह आणि जेटली हीच तीन माणसे सध्याचे सरकार चालवीत असावी आणि त्यांच्यामुळेच आपल्याला संसदेत बसता आले म्हणून भाजपाची बाकीची मंडळी टाळ्या वाजवीत असावी असेच राजकारणाचे चित्र सध्या देश पाहत आहे. एकेकाळी सुषमा स्वराज फार बोलायच्या आणि चांगलेही बोलायच्या. परराष्ट्रमंत्र्याच्या पदावर आल्यापासून त्यांची वाचाच गेली आहे. मोदींनी एवढे परदेश दौरे केले पण त्यातल्या एकातही त्यांनी सुषमाबार्इंना सोबत घेतले नाही व त्याविषयी त्यांच्याशी चर्चा केल्याचे दिसले नाही. आताही मोदी चीन व मंगोलियात असताना सुषमाबाई मात्र मध्य प्रदेशच्या भोपाळात आहेत. हीच अवस्था उमा भारतींची. आपण कोणाच्यातरी कृपेने सरकारात आहोत असेच त्यांचे वागणे आहे. एकेकाळी डरकाळीवाचून न बोलणारी ही साध्वी आता साधी किंचाळतानाही दिसत नाही. नितीन गडकरीच तेवढे रस्त्यांच्या व जलप्रवासाच्या घोषणा करतात. पण त्यांची सरकारातील वाटचाल एकाकी दिसते. बाकीच्या मंत्र्यांचे असणे वा नसणे सारखे आहे. माध्यमे त्यांची दखल घेत नाहीत आणि आपल्या कोणत्याही वक्तव्याचा अर्थ पंतप्रधानांचे कार्यालय कसा लावील या शंकेने बाकीचे मंत्री धास्तावले आहेत. पर्रीकर बोलतात पण ते त्यांच्या खात्यापुरते आणि स्मृती इराणी बोलतात ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून त्यांना काढून टाकल्यानंतर तीत पुन्हा येण्यासाठी. मोदींनी एकवार त्यांना ‘मेरी बहन’ म्हटले पण पुन्हा त्यांनी या बहिणीची कधी वास्तपुस्त केल्याचे दिसले नाही. पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा नेता असल्याने व मंत्रिमंडळाची जबाबदारी सामूहिक असल्याने त्यात अनेकांची कोंडी होणार आणि त्यातल्या काहींनाच भाव मिळणार हे अपेक्षित असून, तरी आताच्या एवढी मंत्रिमंडळातील विषमता पूर्वी कधी दिसली नाही. ‘आम्ही काय बोलणार, आमचे ऐकतो कोण’ असाच भाव बहुतेक मंत्र्यांच्या चर्येवर दिसतो. एक देश, एक पक्ष आणि त्याचा एकच नेता हे प्रचारतंत्र पूर्वी युरोपात वापरून झाले आणि त्याची परिणतीही जगाने पाहिली. भारतात सध्या तो प्रयोग सुरू आहे आणि भाजपा व संघ परिवारासह त्यांना लागू असलेली सगळी प्रसिद्धी माध्यमेही त्यात सहभागी झाली आहेत. राजनाथसिंहांचा संताप या कोंडीतून व अशा राजकीय वातावरणात होणाऱ्या कुचंबणेतून आला आहे. मोदींचे सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष होण्याआधीच त्यातील ज्येष्ठ मंत्र्यांवर आलेली ही पाळी आहे. सारीपटावरच्या मुक्या सोंगट्या कोणीतरी हलवाव्या, पुढे न्याव्या किंवा जागीच ठेवाव्या अशी या बिचाऱ्यांची सध्याची स्थिती आहे आणि ती दयनीय आहे. राजनाथसिंह बऱ्याचवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेले नेते आहेत. त्यांना ही अवस्था सहन होत नसेल तर ती त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया मानली पाहिजे. त्यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणे आणि ती संघाने लागलीच मान्य करावी अशी आजची स्थिती नाही. मोदी संघालाही कितपत जुमानतात याचा अंदाज आता जाणकार बांधू लागले आहेत. पंतप्रधान होऊन एक वर्ष झाले तरी ते संघदर्शनाला आले नाहीत आणि नागपुरात येऊनही रेशीमबागेकडे फिरकले नाहीत ही गोष्ट कोणाच्या नजरेतून सुटली नाही. सबब वाट पाहणे एवढेच आता राजनाथसिंहांच्या हाती उरले आहे.