- संदीप प्रधानमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीकरिता आपली पहिली-वहिली सभा मुंबईत घेतली. काल पुण्यात त्यांच्या सभेवर पावसामुळे पाणी फेरले गेले होते. लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हीडिओ’ या हॅशटॅगने राज यांच्या सभा हीट झाल्या. मात्र मोदींच्या करिष्म्यापुढे त्यांच्या प्रचाराने टिकाव धरला नाही. अगदी अलीकडे कोहिनूर मिलच्या खरेदी व्यवहाराबाबत त्यांची व त्यांच्या व्यावसायिक भागीदारांची ईडीने चौकशी केली. त्यामुळे विधानसभेच्या प्रचारात राज हे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागणार का? असा प्रश्न होता. राज यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात मोदी-शहा या जोडगोळीचा साधा नामोल्लेखही केला नाही. रस्त्यांचे खड्डे, विजेचा लपंडाव वगैर नागरी समस्यांवर राज यांनी ठाकरी शैलीत प्रहार केला. अखेरीस त्यांनी आपण आतापर्यंत कुठल्याही पक्षाने केली नाही, अशी मागणी करतो, असे सांगत मला सत्तेकरिता नव्हे तर सक्षम विरोधी पक्षाकरिता मत द्या, असे आवाहन केले.राज यांचे हे आवाहन वरकरणी आकर्षक व ‘आऊट ऑफ बॉक्स’ वाटत असले तरी भारतीय राजकारणात कुठल्याही निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मत देण्याची भारतीय मतदारांची मानसिकता असते. याचा अर्थ मतदार हाच निवडणूक काळात विरोधी पक्षाची भूमिका वठवत असतो. त्यामुळे जर सरकारची कामगिरी खराब असेल, भ्रष्टाचार बोकाळला असेल, नेते उतलेमातले असतील तर लोक त्यांना घरी पाठवतात. जनतेचा हा सरकारविरोधी कौल सत्ताधारी कोण होणार नाही ते निश्चित करतो. त्यानंतर ज्यांना लोकांनी निवडणुकीत झटका दिलेला असतो त्यांच्याकडे विरोधकांची खुर्ची आपसूक चालून येते. ती मागण्याची गरज नसते. विरोधकांची स्पेस ही निवडणूक लढवून नव्हे तर कृतीतून मिळते.राज यांच्या पक्षातील बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई वगैरे प्रमुख, पहिल्या फळीतील नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. पक्षातील दुस-या फळीतील तरुण, आक्रमक नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे खुद्द राज हेही निवडणूक लढवण्यास तयार झाले. अन्यथा अलीकडेच झालेल्या मेळाव्यात ईव्हीएमवर निवडणुका होत असतील तर त्या कशाला लढवायच्या असे म्हणत त्यांनी आपल्या नेत्यांना पैसे जपून वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबत तळ्यात मळ्यात भूमिका घेतलेला पक्ष निवडणुकीनंतर धारदार विरोधी पक्षाची भूमिका कृतीतून घेईल का, हीच लोकांच्या मनातील शंका आहे.
राज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 22:44 IST