शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Rafael Nadal: स्वत:च्याच दुखऱ्या गुडघ्यांना हरवून... अखेर तो जिंकला !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 05:39 IST

Rafael Nadal: आता काय आपण कुबड्या घेऊन कोर्टवर उतरायचं का, असा विनोद फेडरर आणि नदाल आपसात करत होते म्हणतात; पण जिगर म्हणजे काय, हे नदालनं दाखवलं!

- चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

रविवारी मेलबर्नच्या टेनिस कोर्टवर पाच तास ५० मिनिटे झुंजून तो जिंकला तेव्हा स्टेडियममध्ये हजर असलेला प्रत्येकजण उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याला मानवंदना देत होता. पण तो दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा झाकून गुडघ्यांवर बसला होता... त्याच्यासाठी हा सर्वोच्च भावनिक क्षण होता. हा नुसता विजय नव्हता, तर अखेरच्या क्षणापर्यंत असं काही संपत नसतं, हा संदेश त्यात दडलेला होता. गेल्यावर्षीच्या अखेरीपर्यंत ‘आता तो संपला’, असं टेनिस जगतातील पंडितांना वाटत होतं. पण जिंकण्याची उर्मी काय असते, हे पस्तिशीतल्या नदालनं उभ्या जगाला दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदाचा पाच सेट चाललेला हा सामना पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं, त्यापेक्षाही, नदालच्या कहाणीचा गाभा पुन्हा एकवार अधोरेखित झाला.

मैदानात उतरणाऱ्या प्रत्येकालाच जिंकण्याची उर्मी असते. अद्वितीय ठरणारे त्याच्या चार पावलं पुढे असतात. एक उंची गाठल्यानंतर गवई मैफिली जिंकायच्या म्हणून साधना करीत नाही. नेमकं हेच अद्वितीय खेळाडूंच्या बाबतीत घडतं. ते स्वतःलाच स्वतःसाठी नवनवे मापदंड निर्माण करतात. अत्युच्च शारीरिक क्षमतांच्या पलीकडे जाऊन अवघड आव्हानांना सामोरे जातात. हे जेव्हा घडतं तेव्हा अशा खेळाडूंच्या तोडीचे प्रतिस्पर्धी अक्षरश: इन मीन तीन राहतात. नदालच्याबाबतीत हेच तर घडलं.

तसं पाहिलं तर टेनिसमधल्या एव्हरेस्टवर पोहोचण्यासाठी फेडरर, जोकोविच आणि नदाल यांच्यात कमालीची चुरस होती. गेल्या वीस वर्षांत झालेल्या ८० ग्रँड स्लॅम  स्पर्धांपैकी ६० जेतेपदं या त्रिकुटामध्ये समसमान वाटली गेली. वीस जेतेपदं हेच आजवरचं पादाक्रांत झालेलं सर्वोच्च शिखर होतं. त्याच्या आणखी वर कोण जाणार, यासाठीची जागतिक चढाओढ विलक्षण उत्कंठावर्धक होती. एक एव्हरेस्ट आणि तीन दावेदार. त्यातले फेडरर आणि नदाल हे गेल्यावर्षी गुडघेदुखीनं जायबंदी झालेले. आता काय आपण कुबड्या घेऊन कोर्टवर उतरायचं का, असा विनोद फेडरर आणि नदाल यांच्या मैत्रीपूर्ण संभाषणात सहज येऊ लागला होता. नदाल तर गेल्यावर्षी दोन मोठ्या स्पर्धांना मुकला. फेडरर सध्या प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे. राहता राहिला जोकोविच. तोच विक्रमादित्य ठरणार, अशी अटकळ होती; पण लस विरोधापायी जोकोविचला कोर्टवर न  उतरताच ऑस्ट्रेलियातून बाहेर पडावं लागलं.

नदाल अंतिम सामन्यात पोहोचला तेव्हा त्याच्या पुढ्यात उभा असलेला रशियाचा मेदवेदेव दहा वर्षांनी तरुण. पहिले दोन सेट हरल्यावर नदालला त्याची लय सापडली आणि एका अद्वितीय खेळाडूचं कसब आणि विजिगिषु वृत्ती यांच्यातील अद्वैत साकारलं.  परिस्थितीने कितीही मोठं प्रतिकूलतेचं दान फेकलं, तरी अखेरच्या क्षणापर्यंत काहीही संपत नसतं, हेच नदालच्या या ताज्या विक्रमी कामगिरीतून अधोरेखित झालं.

काळाच्या ओघात टेनिस हाही पॉवर गेम बनला आहे. पण दुखापतीमधून निर्माण होणाऱ्या आव्हानांवर केवळ पैशाने मात करता येत नाही. फेडरर, नदाल, जोकोविच किंवा सॅम्प्रस यांच्यासारखे चार मिनार अमाप पैसा, प्रसिद्धी आणि जिंकणं-हरणं याच्याही पलीकडे गेलेले असतात. तेही अब्जावधी कमावतात, पण ते सगळं परिघावरचं. गाभ्यात असते, ती  मनःपूत खेळण्याची जिद्द! म्हणून तर उदंड पैसा, कीर्ती कमावल्यानंतरही दुखरे गुडघे आणि हळवं मन घेऊन नदाल कोर्टवर पुन्हा उतरला.

ग्रँड स्लॅम जेतेपद एकवीसवेळा मिळवणारा नदाल हा केवळ क्ले कोर्टचा म्हणजे लाल मातीतला बादशाह असल्याची टीका झालीच होती. ती पचवून तो लढत राहिला. स्पेनमधल्या एका छोट्या शहरातून आला हा नदाल.  श्रीमंत घरातही गुणवत्ता जन्मते आणि बहरते, याचा वस्तुपाठ म्हणजे नदालची कहाणी. शाळकरी वयात ब्राझीलचा रोनाल्डो हा याचा हिरो. त्या वयात याला फुटबॉल आणि टेनिस दोन्हीत सारखाच रस होता. एकाची निवड करायची वेळ आल्यावर यानं फुटबॉलला लाथ मारली आणि  गेली १८ वर्षे टेनिसच्या कोर्टवर अधिराज्य गाजवलं. एखादं शिखर प्रयत्नांती सर करता येऊ शकतं, पण तिथेच मुक्काम ठोकणं कशाला म्हणतात हे समजून घ्यायचं असेल, तर एका माणसाचं आयुष्य पाहावं : राफेल नदाल!  ( chanduk33@gmail.com) 

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिसAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन