शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख - पाठीवर बॅग टाका, उडत उडत प्रवासाला जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 06:15 IST

पुढच्या काही दशकात लोक चक्क हवेतून उडत उडतही प्रवास करू शकतील आणि तेही कोणत्याही वाहनाशिवाय ! - हा कल्पनाविलास नव्हे, सत्य आहे !

अच्युत गोडबोले

स्वयंचलित वाहनांबरोबरच पुढच्या काही दशकातच सगळीकडे ‘ऑटोनॉमस एरियल व्हेईकल्सचा म्हणजेच विनाचालक आकाशातून उडणाऱ्या वाहनांचा बोलबाला असेल. या कार्स हेलिकॉप्टरप्रमाणे सरळ आकाशाकडे झेपावू शकतील. त्यांना ‘टेक ऑफ’साठी भलामोठा रनवे लागणार नाही. रस्त्यानं चालता चालताही या कार्स आकाशात झेपावू शकतील ! १९३६ साली हेन्री फोर्डनं फ्लाईंग कार तयार केली होती. पण, त्याच्या वैमानिकाचा मृत्यू झाल्यामुळे त्यानं ‘फ्लाईंग कार्स’चा नाद सोडला. तरी १९४० साली त्यानं ‘मोटार कार आणि विमान यांचं मिश्रण असलेलं वाहन लवकरच येईल’ असं भाकीत केलं होतं.

१९५६ साली अमेरिकेच्या लष्करी विभागानं उडणाऱ्या जीप्सची निर्मिती केली होती. लहानशा अंतरावर जायला त्या अतिशय उपयुक्त होत्या. फक्त त्या जमिनीपासून फार वरून प्रवास करू शकत नव्हत्या. त्यामुळे युद्धादरम्यान त्यांचा काहीच उपयोग होणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांचा वापर थांबला.२०१७च्या सुमारास अमेरिका, जर्मनी, जपान आणि चीन इथल्या अनेक स्टार्ट अप्स आणि मोठमोठ्या कंपन्यांनी फ्लाईंग कार्सविषयीच्या संशोधनात रस दाखवायला सुरुवात केली. दुबईतल्या सरकारनं २०३० सालापर्यंत २५ टक्के रहदारी ही याच प्रकारच्या वाहनांची असेल, असं स्वप्न बाळगलं आहे. २०१७ साली २ प्रवासी घेऊन जाणाऱ्या ‘ऑटोनॉमस एअर टॅक्सी’ म्हणजेच ‘विनाचालक एअर टॅक्सी’ची दुबईत यशस्वी चाचणी झाली. ही टॅक्सी ५ मिनिटं हवेत घिरट्या घालून खाली उतरली. ती दरताशी १०० किलोमीटर इतक्या वेगात अर्धा तास उडू शकते, असा या कंपनीचा दावा आहे. २८ जून २०२१ रोजी स्लोवाकियामधल्या नित्रा आणि ब्रातीस्ल्वा या दरम्यानचं अंदाजे ९६ किलोमीटरचं अंतर ‘एअर कार’नं ३५ मिनिटांत पार केलं. आतापर्यंत झालेल्या प्रयोगांमध्ये इतका वेळ आकाशात विहार करणारी ही पहिलीच कार ठरली. ‘एअर कार’मध्ये बीएमडब्ल्यूचं इंजिन बसवलेली ही कार दरताशी १७० किलोमीटर या वेगानं उडत अनेक कसरतीही करू शकते. ८,२०० फूट वर उडत एका वेळी १,००० किलोमीटरपर्यंतचं अंतर कापण्याची या कारमध्ये क्षमता आहे, असा दावा या कंपनीनं केला आहे. उद्या अशा टॅक्सीज १,००० - २,००० फूट (नासाच्या अंदाजाप्रमाणे ५,००० फूट) उंच उडू शकतील आणि दरताशी १८० मैल इतक्या वेगात त्या धावू (उडू) शकतील !

फ्लाईंग कार्ससारखंच फ्लाईंग ड्रोन्स आणि हॉवरबाईक यांच्यामधूनही उडत प्रवास करणं शक्य होईल. ‘हॉवरसर्फ’ या रशियन कंपनीनं अशा बाईक्स तयार केल्या आहेत. दरताशी ९६ किलोमीटर अंतर कापू शकणाऱ्या या बाईक्स ३३ फुटांपर्यंत उंच उडू शकतात. या बाईक्स आज जरी स्वयंचलीत नसल्या, तरी भविष्यात ती शक्यता नाकारता येत नाही. पुढच्या काही दशकात लोक चक्क हवेतून उडत उडतही प्रवास करू शकतील आणि तेही कोणत्याही वाहनाशिवाय ! या प्रकाराला ‘जेट पॅक’, ‘रॉकेट बेल्ट’ किंवा ‘रॉकेट पॅक’ अशी अनेक नावं आहेत. अनेक कथा - कादंबऱ्यांमध्ये अशा प्रकारची उडती माणसं रंगवली आहेत. जेट पॅकचा मुख्य वापर अंतराळवीर करत असले, तरी त्याचा आता जमिनीवरही वापर करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही प्रमाणात तो यशस्वीही झाला आहे. आपण पाठीला एखादी बॅग अडकवतो, तसाच हा प्रकार असतो. ती बॅग एखाद्या रॉकेटचं काम करते. जेट पॅकला जोडलेल्या दोन हँडलर्सच्या मदतीनं आपण हे जेट पॅक नियंत्रित करू शकतो. न्यूझीलंडच्या मार्टिन एअरक्राफ्ट कंपनीनं २०१० साली फ्लाईंग जेटपॅक बनवला होता. या जेटपॅकच्या मदतीनं किमान अर्धा तास ३,००० फुटांपर्यंत उंच उडत दर  ताशी ७४ किलोमीटरचा प्रवास करता येतो. हा जेटपॅक ‘मार्टिन जेटपॅक’ या नावानंच ओळखला जातो. अर्थात तो बाजारात उतरला तरी सामान्यांच्या आवाक्यात यायला त्याला बरीच वर्षेे लागतील. २०१७ साली ब्रिटनमध्ये रिचर्ड ब्राउनिंग यानं असे सूट तयार करणारी ‘ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज’ नावाची एक कंपनी सुरू केली. तब्बल ३३ देशांमध्ये त्यानं आपल्या ‘ग्रॅव्हिटी जेट सूट’ची  प्रात्यक्षिकं करून लोकांची आणि गुंतवणूकदरांची मने जिंकली. 

२०१९ साली या जेट सूटनं दरताशी १३५ किलोमीटरच्या वेगानं उडत ‘गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नावही नोदवलं. या सूटमधल्या १,०५० हॉर्सपॉवर प्रणालीला ५ लहान जेट इंजिन्स बसवलेली आहेत. यातली दोन हाताजवळच्या हँडलर्सना आणि १ बॅगपॅकमध्ये बसवले गेले. हा सूट वापरून दरताशी ५० मैल वेगात प्रवास करता येतो. जगातला हा पहिला ‘जेटपॅक सूट’ मानला जातो. १३ मार्च २०१९ रोजी या ‘जेटपॅक सूट’ला पेटंटही मिळालं आहे. जेट सूटसाठी पेटंट मिळवणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. आज मनोरंजनाबरोबरच इंग्लंड, अमेरिका आणि युरोपच्या अनेक लष्करी दलांनी या सूटमध्ये रस दाखवला आहे. इंग्लंडच्या नौदलात याची प्रात्यक्षिकंही केली जाताहेत. समुद्रातून एका जहाजावरून दुसऱ्या (शत्रूच्या किंवा स्वत:च्या) जहाजावर या सूटच्या मदतीनं सहज उडत जाता येतंय.

उद्या सर्वसामान्य माणसं चालण्याऐवजी उडत उडत प्रवास करताहेत, असं चित्र दिसलं तर नवल वाटायला नको ! godbole.nifadkar@gmail.com

(ख्यातनाम लेखक आणि सहलेखिका-आसावरी निफाडकर)

टॅग्स :Robotरोबोटcarकार