शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: भारताला ‘प्रचंड’ धक्का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2022 09:26 IST

नेपाळच्या पंतप्रधानपदावर अनपेक्षितपणे पुष्पकुमार दहल उपाख्य प्रचंड यांची वर्णी लागली आहे.

नेपाळच्या पंतप्रधानपदावर अनपेक्षितपणे पुष्पकुमार दहल उपाख्य प्रचंड यांची वर्णी लागली आहे. नेपाळ संसदेचे कनिष्ठ सभागृह प्रतिनिधीसभेच्या २७५ सदस्यांच्या निवडीसाठी २० नोव्हेंबरलाच निवडणूक पार पडली होती; मात्र प्रचंड यांच्या नेपाळी कम्युनिस्ट (माओइस्ट सेंटर) पक्षासोबत निवडणूकपूर्व युती केलेल्या नेपाळी काँग्रेस पक्षाचे  नेते शेरबहादूर देऊबा यांनी प्रचंड यांना पहिल्यांदा पंतप्रधानपदाची संधी देण्यास नकार दिल्याने, सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. अखेर प्रचंड यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि मावळते पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी प्रचंड यांची अट मान्य केल्याने, सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

यापूर्वी २०१८ मध्ये प्रचंड आणि ओली यांच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांनी एकत्र येत नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी झालेल्या करारानुसार ओली अडीच वर्षांनतर पंतप्रधानपदाची सूत्रे प्रचंड यांच्याकडे सोपविणार होते; मात्र नोव्हेंबर २०१९ मध्ये ओली हेच सभागृहाची मुदत संपेपर्यंत पंतप्रधानपदावर राहतील, असे उभय नेत्यांनी मान्य केले होते. त्यानंतर वर्षभरातच प्रचंड आणि ओली यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. पुढे प्रतिनिधी सभा बरखास्त होणे व पुन्हा बहाल होणे, सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड व ओली यांच्या पक्षाचे विलीनीकरणच अवैध ठरवून विलीनीकरणपूर्व स्थिती बहाल करणे, ओली यांची अल्पमतातील पंतप्रधान म्हणून नियुक्ती होणे, असे बरेच काही घडले. आता प्रचंड आणि ओली पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले आहेत, तर सर्वाधिक सदस्य असलेला नेपाळी कॉंग्रेस पक्ष विरोधी बाकांवर बसणार आहे. म्हणजे एकत्र निवडणूक लढलेले आता विरोधक असतील, तर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले सत्तेसाठी गळ्यात गळा घालून बसतील! त्यामुळे नेपाळमध्ये राजकीय स्थैर्य किती काळ नांदेल, हा प्रश्नच आहे. 

सोबतच आगामी काळात नेपाळचे भारतासोबत संबंध कसे असतील, हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागचे कारण हे की, यापूर्वी दोनदा नेपाळचे पंतप्रधानपद भूषविलेल्या प्रचंड यांना भारतविरोधी म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत तर भारत-नेपाळ संबंध अतिशय खराब झाले होते आणि नेपाळ पूर्णतः चीनच्या कच्छपि लागला होता. बहुधा, अनुभवासारखा दुसरा गुरू नसतो, या उक्तीची प्रचिती आल्याने, दुसऱ्या कारकिर्दीत मात्र प्रचंड यांनी भारत आणि चीन यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. भारतासाठी ही किंचित दिलासादायक बाब असली तरी, ओली यांचे `किंगमेकर’ बनणे आणि त्यांच्या प्रचंड यांच्यासोबतच्या समझोत्यानुसार २०२५ मध्ये ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर परतण्याची शक्यता, ही जास्त चिंताजनक बाब आहे. ओली यांनी ते प्रचंड यांच्यापेक्षाही मोठे भारत विरोधक असल्याचे त्यांच्या कारकिर्दीत सिद्ध केले होते. 

पूर्व लडाखमध्ये भारतीय सेना चिनी लष्कराच्या आक्रमक हालचालींचा मुकाबला करीत असतानाच, नेपाळनेही सीमेवर भारताची कुरापत काढली होती, हे कसे विसरता येईल? पुढे शेरबहादूर देऊबा पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतरच भारत-नेपाळ संबंधांमध्ये सुधारणा झाली होती. या पार्श्वभूमीवर देऊबा यांचा पक्ष सरकारमध्ये सामील असणेच भारतासाठी हितावह ठरले असते; परंतु शेजारी देशांमध्ये सत्ता कुणाकडे असावी, हे आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देत मार्गक्रमण करणे याशिवाय भारताच्या हाती काही नाही. परिणामी आगामी काळात भारताच्या मुत्सद्देगिरीचा चांगलाच कस लागणार आहे. वाढता अंतर्गत असंतोष आणि कोविडच्या प्रकोपामुळे सीमेवर काही तरी कुरापत काढून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा जुनाच डाव चिनी राज्यकर्त्यांद्वारा नव्याने खेळला जाण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना अलीकडेच अरुणाचल प्रदेश सीमेवरील तवांग येथे चिनी लष्कराने त्याची चुणूकही दाखवली. आता तर नेपाळमध्ये प्रचंड-ओली जोडगोळीचे सत्तेत पुनरागमन झाले आहे. त्यामुळे चीनला आयताच `बूस्टर डोस’ मिळाला आहे. 

येनकेनप्रकारेण भारताला घेरण्यासाठी संधीच्या शोधातच असलेल्या चीनसाठी ही पर्वणीच! काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत जे काही झाले त्यामुळे चीनसाठी ती आघाडी तूर्त तरी कामाची राहिलेली नाही. मालदिव व बांगलादेशातही सध्या भारताशी जुळवून घेणारी सरकारे सत्तेत आहेत. त्यामुळे चीनद्वारा नेपाळवर जास्त लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता विचारात घेऊन, नेपाळ आघाडीवर `प्रचंड’ धक्का बसू नये, यासाठी भारताला डोळ्यात तेल घालून सज्ज राहावे लागणार आहे!

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nepalनेपाळ