शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

या धर्मवेड्यांना शिक्षा करा

By admin | Updated: April 13, 2015 23:24 IST

कोणत्याही समाजाविषयी द्वेष पसरवणारे वा दोन जमातीत भांडणे लावणारे भाषण वा लिखाण न करण्याचे बंधन राज्यघटनेतील भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारानेच नागरिकांवर लादले आहे.

कोणत्याही समाजाविषयी द्वेष पसरवणारे वा दोन जमातीत भांडणे लावणारे भाषण वा लिखाण न करण्याचे बंधन राज्यघटनेतील भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारानेच नागरिकांवर लादले आहे. तसे करणे हा भारतीय दंडसंहितेनुसारही एक मोठा अपराध आहे. असे असताना शिवसेना या पक्षाचे ‘सामना’ हे मुखपत्र ‘मुसलमानांचा मताधिकार काढून घ्या. त्यांना पोसणे हे सापाला विष पाजण्यासारखे आहे’ असे लिहीत असेल किंवा हिंदू महासभेचा कोणता पुढारी ‘सगळ्या मुसलमान व ख्रिश्चनांचे खच्चीकरण करा’ अशी भाषा बोलत असेल तर त्यांच्याविरुद्ध रीतसर खटला दाखल झाला पाहिजे व न्याय व्यवस्थेने त्यांना योग्य ती शिक्षाही केली पाहिजे. आज मुसलमान व ख्रिश्चनांविरुद्ध बोलणारे हे लोक उद्या बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि आदिवासींविरुद्धही अशीच अर्वाच्य व समाजद्रोही भाषा बोलायला कमी करायचे नाहीत. शोभा डे या लेखिकेने मराठी चित्रपटांविषयी केवळ एक तिरकस वाक्य लिहिले म्हणून विधिमंडळासमोर अपराधी ठरवून बोलवायला निघालेले महाराष्ट्राचे विधिमंडळ सामना आणि हिंदू महासभा याबाबत कोणती भूमिका घेते हे पाहणे ही त्यांच्याही न्यायबुद्धीची परीक्षा घेणारे ठरणार आहे. शिवसेना हा महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी राज्य स्तरावर अधिकृत मान्यता असलेला पक्ष आहे आणि हिंदू महासभा हा तिच्या माणसांचा शोध घ्यावा एवढा दुर्मीळ झालेला पक्ष असला तरी त्याला १०० वर्षांचा मुस्लीमद्वेषाचा इतिहास आहे. व्यक्तींना त्यांच्या वक्तव्यासाठी वा लिखाणासाठी जबाबदार धरणारी लोकासने व न्यायासने या पक्षांबाबत काही एक करीत नसतील तर त्यांच्या खऱ्या लोकहितदक्षतेविषयी व राष्ट्रीय एकात्मतेवरील निष्ठेविषयी आपल्याला शंका घ्यावी लागेल. मुंबईच्या वांद्रे विधानसभा क्षेत्रातील पोटनिवडणुकीत शनिवारी मतदान झाले. मातोश्री हे शिवसेनेचे जन्मस्थानच या क्षेत्रात आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेसने नारायण राणे यांना उभे केले आहे. पण त्याहून महत्त्वाची बाब ही की त्या क्षेत्रात मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन या संघटनेनेही आपला उमेदवार उभा केला आहे. सेना आणि काँग्रेस यांच्यात हिंदू मते विभागली गेली तर वांद्र्यात मोठ्या संख्येने असलेल्या मुसलमानांच्या मतदारांच्या बळावर मजलीसचा उमेदवार एखादेवेळी विजयीही होईल. तसे झाले तर तो शिवसेनेचा घरातला पराभव ठरेल आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचेही त्यामुळे मातेरे होईल. ‘सामना’चा फुत्कार या पार्श्वभूमीवरचा आहे. हिंदू महासभेच्या अशा भाषेचा इतिहास मोठा व त्या पक्षाच्या परंपरेला धरून असणारा आहे. शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत आणि राज्याच्या फडणवीस सरकारातही तो पक्ष सहभागी आहे. सत्ताधाऱ्यांनी किमान जबाबदार भाषा बोलणे वा लिहिणे अपेक्षित आहे. मोदी विकासाची भाषा बोलतात आणि फडणवीस आश्वासनांखेरीज दुसरे काही बोलत नाहीत. (मग त्यांचा संघ परिवार व त्यातली उठवळ माणसे काही का बोलेनात) स्वत: बाळासाहेब ठाकरे मुसलमानांना ‘लांडे’ म्हणत. त्यांच्याविषयी अतिशय हीन दर्जाची भाषा बोलत. मात्र त्यांना मताधिकार नसावा किंवा त्यांचे खच्चीकरण करावे असे तेही कधी म्हणाले नाहीत. सावरकरांनीही आपली जीभ तशी कधी विटाळली नाही. सेनेतील उतावीळ आणि भाजपातील उठवळ लोक अशी भाषा बोलताना पाहिले की आपले राजकारण पुन्हा एकवार पाकिस्तान घडविण्याची तयारी करीत आहे की काय अशी भीती वाटू लागते. नरेंद्र मोदी आपल्या पक्षातील उठवळांना दाबतात, त्यांना तंबी देतात आणि प्रसंगी त्यांना जाहीरपणे दटावतातही. शिवसेनेचे तसे नाही. त्यात कोण कोणाला दटावणार आणि दटावले तरी ते कोण ऐकून घेणार? आणि हिंदू महासभा? त्यात तर अशी जास्तीची कडवी व अर्वाच्य भाषा बोलणारे गौरविलेच जातात. द्वेष हाच ज्यांचा राजकारणाचा पाया व हेतू आहे त्यांच्याकडून असेच बोलले वा लिहिले जाणार. आपल्या अशा बोलण्या-लिहिण्यामुळे या समाजाच्या व देशाच्या ऐक्याला कायमचे तडे जातात हे समजण्याएवढे तारतम्यही त्यांच्यात उरत नाही. त्यांना लोकप्रतिनिधी किंवा पुढारी वगैरे म्हणणे हा आपलाही अडाणीपणा आहे. गुन्हेगार, अपराधी व देशद्रोही सगळ्याच समाजात असतात. मुसलमानात एकटे जिनाच जन्माला येत नाहीत, अब्दुल हमीद आणि अब्दुल कलामही जन्माला येतात. ख्रिश्चनांमध्ये समाजसेवेचा आदर्श घडविणारी मदर तेरेसा असते. हिंदूंमध्ये टिळक, आगरकर आणि जोतिबा जन्मतात तसा एखादा गोडसेही जन्माला येतो. मात्र अशा एका अपराधी इसमासाठी त्याच्या साऱ्या समाजाला दोषी ठरवून त्याचा मताधिकार काढून घेण्याची वा त्याचे खच्चीकरण करण्याची भाषा बोलणे हा लोकशाहीविरुद्ध जाणाराच नव्हे तर साध्या मानवाधिकाराविरुद्ध जाणारा गुन्हा आहे. देशभरातील उठवळांना कायमची दहशत बसेल अशाच शिक्षेचे हे लोक अधिकारी आहेत. गेले काही महिने अशी भाषा बोलणाऱ्यांचा जोम वाढला आहे आणि तो देश आणि समाज या दोहोंसाठीही विघातक आहे. खरे तर देशाच्या ऐक्याच्या मुळावर उठलेलेच हे धर्मांध राजकारण आहे.