अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या अठरा हजार भारतीयांपैकी १०४ जणांची पहिली तुकडी अपेक्षेनुसार लष्करी विमानाने अमृतसर येथे पोहोचविण्यात आली. अशी हद्दपारी केवळ भारतीयांबाबत घडत नसल्याने आणि ही नवी गोष्टही नसल्याने हे विमान उतरेपर्यंत लक्ष वेधले जावे असे काही नव्हते. तथापि, एकोणीस महिला, चार-सहा वर्षांच्या बालकांसह तेरा मुलामुलींचा समावेश असलेला हा जत्था अमानवीय पद्धतीने परत पाठवला गेल्याचे उघड झाले आणि देशवासीय तसेच संसदेतही संताप व्यक्त झाला.
आपल्या समर्थकांपुढे कठोर शासक असल्याचे दाखविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे असे अमानवी वागणे संतापजनकच आहे. अध्यक्षा बनल्यानंतर ट्रम्प बेबंद झाले आहेत. जगाचे मालक असल्यासारखे मनमानी निर्णय घेत आहेत.
आरोग्यापासून पर्यावरण रक्षणापर्यंत जगाच्या सामूहिक प्रयत्नांपासून अमेरिकेला दूर ठेवणे, तृतीयपंथीयांचे मानवी हक्क नाकारणे ते थेट गाझा पट्टी ताब्यात घेण्याची भाषा करणे असे विचित्र व विक्षिप्तपणाचे निर्णय घेत आहेत.
अनधिकृत वास्तव्य करणाऱ्यांना त्यांच्या मायदेशात परत पाठविण्याचा निर्णय त्यातल्या त्यात कायद्याची बूज राखणारा आहे. तथापि, त्याची अंमलबजावणी ट्रम्प यांच्यातील विक्षिप्त हुकूमशहाचे दर्शन घडविते. आता भारतात जे परत आले आहेत, त्यांचा विचार करता हालअपेष्टा, अमानवीय वागणूक, अपमान हा त्यांच्या फसलेल्या स्वप्नांचा शोकांत आहे.
मायदेशात कष्ट उपसण्यापेक्षा संपन्न, समृद्ध अमेरिकेत जाऊन सुखी जीवन जगण्याच्या स्वप्नापाठी हे लोक धावले. हे ‘स्वप्न’ ज्यांनी विकले त्या एजंटांच्या भूलथापांना फसल्यामुळे अधिकृतपणे त्या देशात प्रवेशाचा मार्ग बंद झाला तर अवैध मार्गाने तिथे पोहोचले. त्या प्रवासात कित्येक किलोमीटर पायपीट, खवळलेला समुद्र व भयावह जंगलातून जीवघेणा प्रवास आणि शेवटी चोरून-लपून सीमा ओलांडून अमेरिकेच्या भूमीत प्रवेश हे सारे त्यांनी केले.
काहींनी आपल्यासोबत डंकी फ्लाईटमधून प्रवास किंवा अंधारवाटांवरून सोबत चाललेल्यांचे मृत्यूही पाहिले. इतके सगळे केल्यानंतर अखेरीस वाट्याला आली ती अमानवीपणे मायदेशात केलेली पाठवणी. अर्थात हे सारे अवैधच असल्याने कालपर्यंत या मंडळींबाबत कोणी सहानुभूती बाळगत नव्हते. जे बेकायदेशीर त्यावर कायदेशीर प्रक्रियेचाच उतारा होणार, हे सगळे मानून चालले होते.
तथापि, लष्करी विमानात बसवून या लोकांना भारतात सोडून देताना त्यांच्या हातापायात बेड्या अडकविण्यात आल्या. अगदी विमानातही त्या बेड्या खोलल्या गेल्या नाहीत. नैसर्गिक विधीसाठी काही वेळ मोकळे सोडण्याची माणुसकीही दाखवली गेली नाही. आणि वरून अमेरिकेच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या विभागाचा प्रमुख मोठी मर्दुमकी गाजविल्याच्या आविर्भावात या छळाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकतो.
अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना परग्रहावरील प्राणी (एलीयन) म्हणून हिणवतो. हे केवळ अमेरिकेतून परत आलेल्या भारतीयांसाठीच अपमानजनक आहे असे नाही, तर भारताचे सार्वभौमत्व, सन्मान या साऱ्यांना ट्रम्प यांनी दाखविलेल्या या वाकुल्या आहेत.
लोकसंख्या, मध्यमवर्गाचा आकार, क्रयशक्ती आदींचा विचार करता भारत ही जगातील मोठी, खुली बाजारपेठ आहे. अमेरिकेला तिची गरज आहे, तसेच अमेरिकेच्या संपन्नतेत भारतीयांचे मोठे योगदान आहे. चीनशी स्पर्धेत अमेरिकेला भारताचाच आधार असणार आहे.
स्वत: व्यावसायिक असलेल्या ट्रम्प यांना हे कळत नसावे असे अजिबात नाही. तरीही ही अशी मग्रुरी ट्रम्प यांनी दाखविली आहे. ती त्यांनी सर्वच देशांसोबत दाखविली. भारतासह काही देशांनी ती सहनही केली. तथापि, दक्षिण अमेरिकेतील छोट्या, जेमतेम पाच-साडेपाच कोटी लोकसंख्येच्या स्वाभिमानी कोलंबियाने मात्र ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले.
अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सुनावले की, ‘अमेरिकेच्या लष्करी विमानांना आमच्या हद्दीत प्रवेश देणार नाही. नागरी विमानाने आमचे नागरिक पाठवणार असाल ते स्वीकारू.’ सोबतच अमेरिकेतील कोलंबियनांना आवाहन केले की, स्वाभिमानाने परत निघून या. इकडे तुमच्या उपजीविकेची सोय करतो. सोशल मीडियावर पेट्रो यांच्या स्वाभिमानाची तसेच कोलंबिया व भारताच्या भूमिकेची उगीच तुलना होतेय असे नाही. प्रश्न एवढाच आहे की, ट्रम्प यांच्या रूपातील मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?