- डॉ. दीपक शिकारपूरराजकीय त्सुनामी आपण सर्वांनी नुकताच अनुभवला. त्याचे अंदाज अनेकानी वर्तविले. त्यात काही प्रमाणात तफावत होती, पण काही दिवसांपूर्वी ‘फणी’ हे चक्रीवादळ ओरिसा, बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. अतिशय माफक हानी झाली. याचे पूर्ण श्रेय नियोजन व नवतंत्रज्ञानाला द्यायला हवे. संगणकीय प्रणालींच्या जोडीला उपग्रहीय तंत्रज्ञान, विविध प्रकारची छायाचित्रे असल्याने, माहितीचे विविध पैलू हाती येऊन त्यांचा अभ्यासही चटकन करता येतो व इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या मदतीने हे अंदाज सर्वत्र कळूही शकतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेले ‘फणी’ चक्रीवादळ. त्याची तीव्रता खूप असूनही, पूर्वी आलेल्या वादळांच्या तुलनेत, आपली जीवित आणि वित्तहानी कमी झाली. गेल्या वर्षीदेखील नवतंत्रज्ञानाच्या योग्य वापराने वादळाची सूचना सर्वत्र पोचविणे शक्य झाल्याने नुकसानीचा आकडा कमी होता. २00८ साली आलेल्या नर्गिस चक्र ीवादळामुळे तर तब्बल एक लाखापेक्षा जास्त लोक मरण पावले होते.आता एक प्रश्न साहजिकच काहींच्या मनात येईल की, उपग्रहीय प्रतिमा उर्फ सॅटेलाइट इमेजेस यापूर्वीही वापरल्या जात होत्याच, मग नवतंत्रज्ञान त्याहून वेगळे काय आहे आणि ते अधिक भरवशाचे कसे ठरते? वर्मोन दोराक या अभ्यासकाने शोधून जवळजवळ परिपूर्णतेकडे नेलेल्या ‘दोराक टेक्निक’चा वापर जगभर केला जातो. भूकंपाप्रमाणेच चक्रीवादळाने होणारे नुकसान त्याच्या तीव्रतेवर म्हणजेच त्यातून निर्माण होणाºया वाऱ्यांचा वेग आणि पडणाºया पावसाचे प्रमाण यावर अवलंबून असते. डिप्रेशन म्हणजेच कमी दाबाच्या पट्ट्यात जमलेल्या ढगांची उंची, तेथील दाब व तापमान यांवरही बरेचसे परिणाम अवलंबून असतात. (खुद्द या वादळांचेही सायक्लोन, हरिकेन, टायफून असे विविध प्रकार असतात). उपग्रहांकडून मिळणाºया प्रतिमा आणि छायाचित्रे यांचा गाढा अभ्यास करून दोराकने वादळांचे त्यांच्या दृश्यरूपावरून वर्गीकरण केले. यासाठी उपारुण किरणतंत्राचा (इन्फ्रारेड रेज) वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. प्रत्येक वादळाच्या ‘चेहरेपट्टी’वरून त्याची तीव्रता पुष्कळच अचूकतेने सांगता येऊ लागली.
धोकादायक चक्रीवादळांची पूर्वसूचना व नवतंत्रज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:48 IST