देशात खुनाचे राजकारण सुरु झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा भरचौकात शिरच्छेद करण्याची धमकी भाजपाचे स्थानिक पुढारी चेन्नबसवप्पा यांनी दिली आहे. हे बसवप्पा कुठल्याशा महापालिकेचे माजी महापौर आणि भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या ‘कार्यकर्त्यांनी’ दिल्लीतील केरळ सरकारच्या अतिथीगृहावर हल्ला चढवून तेथील व्यक्तींना मारहाण केली व तिथल्या सामानाची मोडतोड केली. त्या अतिथीगृहात गोवंशाचे मांस वाढले जात असल्याचा त्या ‘बिचाऱ्यांचा’ भक्तिशाली वहीम होता. दादरीमध्ये अशाच वहिमावरून अहमद इकलाख या ५८ वर्षे वयाच्या इसमाची दगडांनी ठेचून हत्त्या करणारे ‘कार्यकर्तेही’ याच मनोवृत्तीचे होते. त्यांचे सामर्थ्य हे की त्यांना अडविणारी आणि ‘राजधर्म’ शिकवू शकणारी अटल बिहारींसारखी मोठी माणसे आता तेवढीशी शक्तीशाली राहिलेली नाहीत. केरळ व कर्नाटकात तसेच दक्षिणेतील अनेक राज्यात गोमांस हा नित्याच्या निर्वाहाचा विषय आहे. अतिपूर्वेकडील अरुणाचलपासून त्रिपुरापर्यंतची राज्येही त्यात आहेत. हा निर्वाह केवळ मुसलमान व अल्पसंख्यकातच आहे असे नाही. तो साऱ्याच समाजात प्रचलित आहे. कर्नाटकात गोवंशाच्या मांस विक्रीवर व निर्वाहावर बंदी नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्याच मोकळेपणाचा उल्लेख आपल्या भाषणात केला व केरळच्या अतिथीगृहावरील हल्ल्याचा निषेध केला. त्यावर आपला संताप व्यक्त करीत चेन्नबसवप्पाने त्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी त्यांना दिली. आपले न ऐकणाऱ्यांचा, आपल्याहून वेगळी श्रद्धा व विचार बाळगणाऱ्यांचा आणि आपल्या कारवायांविषयीची वृत्ते प्रकाशीत करणाऱ्या माध्यमांमधील स्त्रीपुरुषांचा शिरच्छेद करण्याची व त्याची दृष्ये जगाला दाखवून आपली दहशत उभी करण्याची कार्यशैली प्रथम तालिबानांनी मध्य आशियात अमलात आणली. त्यात स्त्रिया, मुले, विरोधी माणसे आणि विदेशी पत्रकार अशा साऱ्यांचे जाहीर शिरच्छेदही त्यांनी केले. तिथल्याच एका धनवंताने सलमान रश्दीचे मुंडके तोडून आणणाऱ्याला एक कोटी सोनेरी दिनार देण्याचा मनोदयही जाहीर केला. खून व शिरच्छेद करणाऱ्यांना हिरो करण्याची एक परंपरा आपल्यातही आहे. स्वामी दयानंदांपासून गांधीजींपर्यंतचे महात्मे या दुष्कृत्यांपासून सुटले नाहीत. अलीकडे दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्त्याही याच परंपरेच्या कुजकट मनोवृत्तीतून झाल्या. त्या करणाऱ्यांविषयी मनात प्रेम बाळगणारी व त्यांना साधक म्हणून गौरवणारी माणसेही आपल्यात आहेत. इटलीत मुसोलिनीने अशा मारेकऱ्यांच्या टोळ््या बांधल्या. अर्ध्या चड्ड्या नेसलेली, खांद्यावर लाकडाच्या मोळ््या घेतलेली व त्या मोळ््यात कुऱ्हाड किंवा परशू लपविलेली त्याच्या फॅसिस्ट पक्षाची टोळकी त्यात असत. मुसोलिनी व त्याचा पक्ष याविषयी जराही कुणी वेगळे बोलले की ती परशुयुक्त मोळी त्याच्या डोक्यावर आपटून त्याचा प्राण घेण्याची या टोळ््यांना मुभा होती. जर्मनीत हिटलरने त्याच्या नाझी पक्षाला जोडून अशाच खुनी माणसांची ‘स्ट्रॉर्म ट्रूपर्स’ नावाची संघटना उभी केली होती. हिटलरचे विरोधक ते पक्षाचे विरोधक आणि पक्षाचे विरोधक तेच जर्मनीचेही विरोधक (ही भाषा आता आपल्याकडेही रुजविली जात आहे) म्हणून हे ट्रूपर्स त्या विरोधकांचा खातमा करीत. चेन्नबसवप्पा यांचा सिद्धरामय्या यांच्या शिरच्छेदाचा इरादा असा तालिबानांशी, अल कायदाशी, मुसोलिनीच्या परशूधारकांशी आणि हिटलरच्या स्ट्रॉर्म ट्रूपर्सशी नाते सांगणारा आहे. आपल्या धर्मांधतेला विरोध करणाऱ्या वा त्यानुसार न वागणाऱ्या किती स्त्रियांची त्यांच्या डोक्यावर गोळ््या झाडून तालिबानांनी हत्त्या केली ते आपण दूरचित्रवाहिन्यांवर प्रत्यक्ष पाहिलेही आहे. अशा गोळ््या झाडणाऱ्यांना धर्मपुत्र म्हणणारेही आपल्याला ठाऊक आहेत. दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोपात आणि आताच्या काळात अफगाणिस्तानपासून इराक व सिरियापर्यंत जो खुनी धुमाकूळ झाला व अजून चालला आहे त्याची अंगावर शहारे आणणारी आठवण करून देणारा चेन्नबसवप्पाचा इरादा आहे. हा इसम खुनी मनोवृत्तीचा असेल आणि आपली मानसिकता तो जाहीरपणे सांगत असेल तर त्याला आपला मानणाऱ्या संघटनांची, पक्षांची व पुढाऱ्यांची त्याच्याबाबतची एक जबाबदारी ठरते. अशा इसमाविरुद्ध कारवाई करून त्याला आपल्यापासून दूर करणे हे त्या जबाबदारीचे स्वरुप असते. मात्र त्या साऱ्यांना त्याचे तसे बोलणे व करणे मुळातच आवडत असेल तर त्यांचाही समावेश मध्य आशियातल्या तालिबानांपासून अफगाण सीमेवरच्या अल कायदापर्यंत आणि मुसोलिनीच्या परशूधारकांपासून हिटलरच्या स्ट्रॉर्म ट्रूपर्सच्या दहशती परंपरेपर्यंत जोडावा लागतो. खून ही सर्वात भीषण अशी सेन्सॉरशिप आहे. ज्याचा विचार आपल्याहून वेगळा असेल त्याला तो बोलू वा लिहू न देण्याच्या मनोवृत्तीतून ही सेन्सॉरशिप येते. त्यातून ज्याचे बोलणे वा लिहिणे थांबविणे आपल्या शक्तीबाहेरचे असते त्याला गोळी घालून वा त्याचा शिरच्छेद करून संपविणे हेच मग अशा माणसांच्या हाती शिल्लक राहते. खून करणारी माणसे दुबळी असतात. मन, बुद्धी, विचार वा चर्चा यांचे गांभीर्य त्यांना पेलणारे नसते. अशा माणसांना बंदुका व तलवारी हाती घेणेच जमणारे असते.
खुनाचे राजकारण
By admin | Updated: November 7, 2015 03:39 IST