गेल्या काही महिन्यांत राजकारणी लोकांनी एकमेकांवर टीका करताना एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गाठली. त्यांची भाषणे निंदात्मक, किळसवाणी आणि राजकीय संघर्ष करण्यापर्यंत मजल गाठलेली होती. यापूर्वी या देशात अशी भाषा कधीच वापरण्यात आली नव्हती. त्यांनी ताळतंत्र सोडून एकमेकांचे जे वाभाडे काढले, ते अशोभनीय होते. राजकीय पक्षापेक्षा पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या वक्तव्यांनी देशाला लाज आणली. त्यांच्या भाषणावरून आणि एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीवरून भविष्यातील राजकारण कसे राहील, याचा अंदाज सहज बांधता येतो. त्यांच्या टीकेत भ्रष्टाचाराचा जसा उल्लेख होता, तसाच एकमेकांवर व्यक्तिगत आरोप करण्यातही ते कुठे मागे राहिले नाहीत. या गदारोळात राजकीय नेते आणि त्यांचे अनुयायी, तसेच त्यांचे विरोधक यांचे वर्तन योग्य नव्हते, त्यात राजकीय उमेदवाराचा मात्र अंत झाला, लोकांचेही नुकसान झाले.
१५०० साली फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडेमस यांनी केलेली भविष्यवाणी जशी खरी ठरू पाहत आहे, तद्वतच रॉबर्ट पेन या १९४६ सालच्या पुलित्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या ‘आॅल द किंग्ज मेन’ या कादंबरीत भविष्यातील राजकारण कसे निंदात्मक राहील, याचे जे वर्णन केलेले आहे, त्याचा प्रत्यय सध्याच्या राजकारणातून पाहायला मिळत आहे. या कादंबरीत राजकीय भ्रष्टाचाराचे वर्णन लेखकाने केले आहे. त्यातून विली स्टार्क या काल्पनिक गव्हर्नरचा कसा उदयास्त होतो, हे मार्मिकपणे दर्शविण्यात आले आहे. त्यातील स्टार्क हा आपल्या मित्रास मदत करता-करता आपण कसे सर्वश्रेष्ठ आहोत, या भावनेने कसा पछाडला जातो, हे स्पष्ट केले आहे. राजकीय निंदा कशी करण्यात येते आणि बदनामी कशी केली जाते व ती खालपर्यंत कशी झिरपत जाते, हे प्रत्ययकारी पद्धतीने दर्शविण्यात आले आहे.
सध्याचे युग हे खोट्या बातम्याचे, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप करण्याचे आहे. असे आरोप केले जात असताना संबंधित व्यक्तीवर न्यायालयात खटला का भरला जात नाही, याचे लोकांना आश्चर्य वाटते. राजकारणी व्यक्तींवर टीका करताना त्याविषयीचा पुरावा बाळगणे आवश्यक असते, पण अशा आरोपांकडे भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली दुर्लक्ष करण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतल्याचे दिसून आले. या आरोपांच्या संदर्भात वृत्तपत्रांनी पक्षपाती दृष्टिकोन बाळगल्याचे दिसून आले.एका नेत्याने दुसºया नेत्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला, तर दुसºयाने पहिल्या व्यक्तीने आपल्या बायकोचा त्याग केला असल्याने, त्याला कुटुंबाच्या अडचणींची कल्पना कशी येणार, अशा शब्दात त्याचे वाभाडे काढले. एकमेकांना या तºहेने शिव्या देण्याची चढाओढ सुरू झाल्यावर त्या शिव्यांची चळतच निर्माण झाली. एकाने दुसºयाला मूर्ख म्हटले, तर दुसºयाने पहिल्याला गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणून हिणवले. कुणी कुणाला दुर्योधन म्हटले, तर आणखी कुणी काही म्हटले. व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपातून कुटुंबांचीही सुटका झाली नाही. त्यातून मृत व्यक्तींचाही उद्धार करण्यापर्यंत मजल गाठण्यात आली. विरोधकांनी सत्तारूढ नेत्याला रक्तपिपासू आणि आधुनिक काळातील सीझर, हिटलर किंवा नेपोलियन असल्याचा उल्लेख केला.
- डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू.