अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नावाने पंजाबातील घुमान या नामदेवनगरीत, पडद्यामागच्या हिकमती राजकारण्यांनी भरविलेले ८८वे साहित्य संमेलन त्याच्या खऱ्या हेतूसह सफल संपूर्ण झाले आहे. साहित्यिक कमी आणि राजकारणी जास्त असलेल्या या संमेलनाचा खरा हेतूच काही मराठी पुढाऱ्यांना ‘राष्ट्रीय’ बनविणे हा होता. त्यासाठी त्यांनी देशातल्या एका मोठ्या टोलधारकाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष बनविले व त्याच परिसरातील एका राजकारणी एनजीओला त्याचे संयोजकत्व दिले. संमेलनाची आखणी ज्या तऱ्हेने झाली त्यातून हा हेतू साऱ्यांना उघड दिसणाराही होता. संमेलनाला हजर राहायला जे साहित्यिक मुंबई, पुणे व नागपुरातून गेले त्यांच्यासाठी गलिच्छ रेल्वेगाड्यांची तर ज्या पत्रकारांना त्यासाठी नेले त्यांच्या सहकुटुंब विमान प्रवासाची व्यवस्था केली गेली. एकट्या नागपुरातून पत्रकारांची पंधरा कुटुंबे घुमानची अशी विमानवारी करून आली. साहित्यिकांहून पत्रकारांची उपयुक्तता राजकारणी माणसांच्या लेखी मोठी व दीर्घकालीन असते हे वास्तवच अशावेळी लक्षात घ्यायचे. संमेलनात ज्या ज्येष्ठ समीक्षकांचा सत्कार व्हायचा, त्या ८० वर्षे वयाच्या रसाळांना रेल्वेने यायला सांगितले गेले तर दुसऱ्या सत्कारमूर्तीबाबत तेही सौजन्य कोणी दाखविले नाही. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, भूपृष्ठ रहदारी मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्घाटन समारंभात, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोपाला हजर होते. आभारासाठी विनोद तावड्यांनीही आपली वर्णी लावली होती. राजकारण्यांच्या या भाऊगर्दीत साहित्यिकच अंग चोरून बसलेले दिसले. राजकारणी नेत्यांनी साहित्य संमेलनांना येऊ नये असे कोणी म्हणणार नाही. मात्र तेथे जाऊन त्यांनी साहित्यिकांची कोंडी करू नये एवढे त्यांना नक्कीच म्हणता येईल. परंतु घुमानचे संमेलनच राजकीय कारणासाठी भरविले गेल्याने व महामंडळ नावाची क्षीण यंत्रणा त्या आयोजनामागे फरफटत गेल्याने याहून वेगळे काही होणारही नव्हते. कलेला राजाश्रय असावा हे म्हणणे वेगळे आणि कलेने राजाची बटिक होणे वेगळे. घुमानच्या संमेलनात यातले काय घडले याचा विचार त्यात सहभागी झालेल्या साऱ्यांनीच आता अंतर्मुख होऊन केला पाहिजे. तशा सगळ्याच कला राजाश्रयी असतात. परंतु संस्कृतीने कलेचा प्रांत नेहमीच स्वायत्त मानला व आपल्या परंपरेनेही तो तसा राखला. गेली काही संमेलने राष्ट्रवादी काँग्रेसने पळविलेली दिसली, त्यामुळेही कदाचीत घुमानचे भाजप व अकाली दलाच्या युतीने खिशात घातलेले संमेलन जास्तीचे वेगळे दिसले असेल. या संमेलनाची निमंत्रण पत्रिका ज्यांनी पाहिली त्यांच्याही लक्षात सत्ताधाऱ्यांसमोरचे साहित्यिकांचे अगतिकपण लक्षात येणारे होते. महामंडळाच्या घटक संस्था त्यांच्या क्षेत्रातील साहित्यिकांची नावे संमेलनातील सहभागासाठी पाठवितात व तशा सूचीला महामंडळ मान्यता देते. घुमानमध्ये असे काही झाले नाही. विदर्भातून ज्या तीन साहित्यिकांचा त्यातील परिसंवादात सहभाग होता ते सगळे पत्रकार होते व त्यातले एक हिंदीभाषिकही होते. राज्याच्या इतर भागातील नामवंत साहित्यिकही या पत्रिकेत अभावानेच आढळले. ज्या थोड्या कवी व लेखकांची नावे डफावर दिसली ते पुन्हा अर्धराजकीय व अर्धवाङ्मयीनच होते. सत्तेचा एक गुणधर्म केंद्रीत होत जाणे हा आहे. तिच्याभोवती व तिच्या आश्रयाने वाढणाऱ्या सगळ्या संस्था व चळवळी क्रमाने सत्तेच्या कलाने जाताना त्याचमुळे दिसतात. सगळेच राजकारणी अशा व्यासपीठांचा वापर आपल्या प्रचारासाठी करतात असे नाही, मात्र त्यांची उपस्थिती हाच त्यांच्या प्रचाराचा भाग ठरतो. या संमेलनात यावर जास्तीची कडी करीत महाराष्ट्र सरकारने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत कोणते दिवे लावले याची प्रचारपुस्तिकाच तेथे वाटली. प्रसिद्धी माध्यमांनीही साहित्यिकांच्या भाषणांहून मंत्र्यांच्याच भाषणांना जास्तीची जागा दिली. त्यातून साहित्य संमेलनात साहित्यिकांचे स्थान नेमके कोणते व केवढे हाच प्रश्न पुढे आला. राजकारण आणि साहित्यकारण ही दोन एकाच समाजजीवनाची अंगे आहे. त्यात संबंध नसावा असे कोणी म्हणणार नाही. मात्र हा संबंध परस्परांच्या क्षेत्रांची स्वायत्तता राखणारा व त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखणाराच राहिला पाहिजे. घुमानच्या संमेलनात आरंभापासून अखेरपर्यंत राजकारणाची साहित्याकारणावरची जी कुरघोडी दिसली ती या मर्यादेचे उल्लंघन करणारी होती. याचा दोष राजकारण्यांचा नाही. अशी कुरघोडी ओढवून घेणाऱ्या महामंडळाच्या व आयोजकांच्या लाचारवृत्तीचा तो परिणाम आहे. सत्तेची मदत सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रांना लागते. त्या मदतीवाचून आम्ही आमचे उपक्रम करू असे म्हणणारी माणसे एक-दोन उपक्रमातच थकली. मात्र ज्यांनी ती घेऊन आपले उपक्रम जारी ठेवले ती माणसेही पुढल्या काळात सत्तेला शरण गेली. सत्तेतली माणसे आपल्या हस्तकांकरवीच त्यांना हवे तसे नाचवू व वाकवू लागली. घुमान हे या प्रकारातले सर्वात मोठे उदाहरण ठरावे. संमेलनाला गेलेले साहित्यप्रेमी त्याचमुळे राजकारण्यांचे मार्गदर्शन घेऊन परतले. शरणागतीलाही मर्यादा असतात, जिला त्या नसतात तिला गुलामगिरी म्हणतात.
घुमानचे राजकीय संमेलन
By admin | Updated: April 7, 2015 00:50 IST