शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात!

By विजय दर्डा | Updated: March 3, 2025 07:27 IST

देशातील बहुतेक मोठ्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर नाही. त्या कारणांचा शोध शीर्षस्थ नेतृत्व कधी घेते काय? थरूर यांनी वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले?

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

युवकांच्या हृदयावर राज्य करणारे ६८ वर्षीय शशी थरूर सध्या काँग्रेस विरुद्ध बंड करण्याच्या पवित्र्यात आहेत काय? - मला तसे मुळीच वाटत नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना अत्यंत जवळून ओळखतो. थोडे बेदरकार आहेत.  बोलताना अजिबात कचरत नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्वच इतके प्रभावशाली आहे की प्रत्येकच राजकीय पक्षाला ते आपल्याबरोबर असावेसे वाटेलच. तरीही ते काँग्रेसमध्ये आहेत, याचे कारण काँग्रेसच्या मूलभूत धोरणांविषयी असलेली त्यांची समज! आणि ‘खरे बोलणे’ हे बंड कसे? 

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शशी थरूर उभे राहिले तेव्हा त्यांचा उद्देश तरुणांना आकर्षित करून पक्षात एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचा होता. थरूर अध्यक्ष झाले असते तर काँग्रेसची परिस्थिती निश्चितच वेगळी असती असे पुष्कळ लोकांना आजही वाटते. थरूर यांचे व्यक्तित्व बहुआयामी.  गर्दीतही ते उठून दिसतात. तरीही ‘पक्ष आपला सदुपयोग करत नाही’ आणि ‘अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आपल्याला अडगळीत टाकण्यात आले’  असे त्यांना वाटत असेल तर काँग्रेससाठी ही काही बरी गोष्ट नव्हे. काँग्रेस पक्षात शशी थरूर यांच्या क्षमतेचा कोणताही नेता सध्या नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. देशाची नस ते ओळखतातच, शिवाय जगात काय चालले आहे हेही त्यांना ठाऊक असते. 

इतके विद्वान असूनही आपल्या बुद्धिमत्तेचे दडपण कोणावर येऊ देत नाहीत हे थरूर यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा व्यवहार अत्यंत सहज आणि सरळ असतो. शशी थरूर यांना राजकारणात आणावे असे पहिल्यांदा डॉ. मनमोहन सिंग यांना वाटले. २००९ पासून तिरुवनंतपुरममधून काँग्रेसच्या तिकिटावर थरूर सलग निवडून येत आहेत. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र राज्यमंत्री आणि मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. खरेतर त्यांना कॅबिनेट दर्जा मिळायला हवा होता; परंतु त्यांनी कधीही तशी मागणी केली नाही. उलट डॉ. सिंग यांना काँग्रेसमधील एक गट सतत त्रास देत आहे याची सल थरूर यांच्या मनात होती. लांगूलचालनात बुडालेल्या त्या गटाला शशी थरूर सहन झाले नाहीत. गुलाम नबी आझाद यांच्या ‘केजी २३’मध्येही थरूर सक्रिय सहभागी होते. त्यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते.

साधारणतः दोन आठवड्यांपूर्वी थरूर राहुल गांधी यांना भेटले. ‘संसदेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा चालू असताना मला बोलण्याची संधी दिली जात नाही. वारंवार दुर्लक्ष केले जाते’ ही सल त्यांनी राहुल गांधींसमोर मांडली. राहुल यांनी त्यावर काय उत्तर दिले हे समजले नाही; परंतु शशी थरूर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला कोणताही पक्ष दुर्लक्षित कसा करू शकतो हेच एक कोडे आहे. त्यांच्यासारखा वक्ता पक्षाची कामगिरी उंचावू शकतो. २०१४  ते २०१९ पर्यंत मल्लिकार्जुन खरगे यांना आणि त्यानंतर २०१९  पासून २०२४ पर्यंत अधीररंजन चौधरी यांना संसदीय पक्षाचे नेतृत्वपद दिले गेले. शशी थरूर यांच्यासारखा प्रभावी प्रहार करणारा नेता पक्षाकडे असतानाही हे घडले. गेल्यावर्षी काँग्रेस पक्षात  अनेक बदल झाले. अलीकडेच दोन महासचिवांची नियुक्ती झाली आणि अनेक राज्यांचे प्रभारी बदलले. परंतु, थरूर यांच्यासाठी एकही जागा पक्षाला सापडली नाही आणि पक्षाने ती निर्माणही केली नाही. उलट ज्या ‘ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस’ची संपूर्ण उभारणी शशी थरूर यांनी केली होती, तिच्या प्रमुखपदावरूनही त्यांना हटवले गेले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या यशस्वीतेबद्दल त्यांची तारीफ करताना त्यांनी लिहिले, ‘पंतप्रधान मोदी यांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीतून काही सकारात्मक हाती लागले आहे. एक भारतीय म्हणून मी त्यांची प्रशंसा करतो. या बाबतीत मी संपूर्णपणे राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून बोलतो आहे.’ अलीकडेच एका लेखात केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारचीही थरूर यांनी प्रशंसा केली. त्यामुळे काँग्रेस पक्षात अनेकांचा तिळपापड झाला. त्यावर थरूर यांनी म्हटले की, ‘मी काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे, परंतु पक्षाला माझी गरज नसेल तर माझ्याकडेही पर्याय उपलब्ध आहेत.’  

थरूर इतक्या बेधडक गोष्टी करत असतील तर त्याचे कारण ते आपल्या जागेवर ठामपणे उभे आहेत हे होय. मोदींची लाट असतानाही ते तिरुवनंतपुरममधून निवडून येतात याचा अर्थ मतदारांवर त्यांची पूर्णपणे पकड आहे असाच होतो. पुढच्या वर्षी आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केरळ विधानसभेची निवडणूक लढवावी असे त्यांना वाटते. परंतु, काँग्रेस पक्षाला त्याची फिकीर कुठे आहे? 

काँग्रेस एकेकाळी देशाची धडकन होता. हा पक्ष तामिळनाडूत ५८ वर्षे, पश्चिम बंगालमध्ये ४८, केरळमध्ये ४१, उत्तर प्रदेशमध्ये ३६, बिहारमध्ये ३५, गुजरातमध्ये ३० आणि ओडिशात २५  वर्षांपासून सत्तेवर नाही. दिल्लीमध्ये पक्षाचा धुव्वा उडाला आहे. पंजाबमध्येही सत्ता दूर आहे. महाराष्ट्रात चिंध्या झाल्या. काँग्रेसला झाले आहे तरी काय?- हा प्रश्न कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मनात आहे. परंतु, पक्षाचे शीर्षस्थ नेते याचा विचार कधी करतात काय? 

तूर्तास शशी थरूर यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे. त्या पोस्टचा भावार्थ असा : जेथे लोकांना अज्ञानातही सुख मिळते, तेथे हुशारी दाखवणे हा मूर्खपणा होय!

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसVijay Dardaविजय दर्डाPoliticsराजकारण