महाकवी दु:खाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:13 AM2018-05-11T00:13:13+5:302018-05-11T00:13:13+5:30
मराठी काव्यपरंपरेच्या क्षितिजाला आपल्या कवितेने गवसणी घालत गूढ शब्दांआडून डोकावत ‘प्राचीन नदीपरि खोल असलेला दु:खाचा महाकवी’ अशी ओळख असलेल्या ग्रेस यांच्या १० मे रोजी झालेल्या जयंतीनिमित्त-
- विजय बाविस्कर
‘मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल...’
मराठी प्रांतात आपली वेगळी शैली निर्माण करणारे ज्येष्ठ कवी माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ ग्रेस स्वत:चे वर्णन आपल्या या काव्यपंक्तीतून करायचे. वृत्त, मात्रा, लयता अशा साचेबद्ध चौकटींना छेदत जाणिवांची मांडणी करून त्याचा अर्थ शोधण्याचे आव्हान देणारे त्यांचे काव्य प्रथम वाचनात अवघड वाटणारे; परंतु अर्थबोध झाल्यानंतर मात्र मनाचा ठाव घेणारे बनत असे. जनप्रवाहापासून कायम दूर राहिलेले असे कवी हे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते.
मराठी काव्यपरंपरेच्या क्षितिजाला त्यांनी आपल्या कवितेने देखणा मोरपंखी वर्ख दिला. प्रत्येक नव्या पिढीतील काव्यपे्रमींना त्यांच्या कविता अंतर्मुख करतात. मराठी कवितेची भाषाच नाही तर कविता आणि कविताप्रेमी यांच्यातील संवादाची धाटणीही या शब्दप्रभूने बदलली. ग्रेस यांची कविता मैफिलीची कविता नव्हती. व्यासपीठावर तिचे स्थान नव्हते. टाळ्यांच्या कडकडाटात, रसिकांच्या वाहवामध्ये ती आसुसलेली नव्हती. निवांतपणी प्रत्येकाने स्वत:च वाचावी आणि शब्दांच्या नितळ प्रवाहात न्हाऊन जावे, अशी त्यांची कविता म्हणजे वेदनेचा हळवा सूर आहे.
ग्रेस यांच्या कविता काव्यप्रेमींपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचविल्या त्या पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी. ग्रेस आणि मंगेशकर यांचे नाते काही अनोखेच होते. ‘ग्रेस यांच्या कविता एक प्रकारचे आत्मचिंतन असल्याने मला भावतात’, असे हृदयनाथ म्हणत. मनाला स्पर्शून जाणारे शब्द मोजक्या प्रतिभावंतांच्या लेखणीतून जन्माला येतात. कवी ग्रेस यात अग्रणी होते. त्यांच्या काव्याला असलेले वेगवेगळे पदर वाचणाºया प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ दर्शविणारे असतात. त्यांच्या कवितेचे हेच तर वैशिष्ट्य आहे.
‘संध्याकाळच्या कविता’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध झाला. त्यानंतर कविता आणि ललित लेखांच्या माध्यमातून त्यांनी आशयगर्भ रचना आणि शब्दांमध्ये प्रतिमांचा वापर अत्यंत सृजनशीलतेने केला. त्यामुळे ग्रेस यांचा शब्दसंचार लोकप्रियतेची दाद मिळवून गेला. नंतरच्या ‘राजपुत्र आणि डार्लिंग’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’, ‘सांजभयाच्या साजणी’ या काव्यसंग्रहांना रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘कावळे उडाले स्वामी’, ‘ओल्या वेळूची बासरी’ या ललित लेखसंग्रहातून त्यांची असामान्य प्रतिभा समोर आली. गेयता, छंद, वृत्त यावर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. ग्रेस हे कलंदर व्यक्तिमत्त्व होते. काहिशा गूढ आणि आत्ममग्न वृत्तीमुळे रसिकांच्या मनात ग्रेस यांच्याविषयी कायमच कुतूहलाची भावना होती. ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या कवितेची व्यवस्था मी केव्हाच करून ठेवली आहे’ असे मनोगत व्यक्त करताना-
‘घरभर सरणाचे पात्र सांडूनि जाई
फिरुनी फिरुनी माझा वंश निर्वंश होई...
या शब्दांमधून त्यांच्या अंतर्मनातील वेदना समोर आली. त्यांनी चौकटी, रूढी यांची पर्वा केली नाही. मानवी अस्तित्व, वेदना, दिवस आणि रात्रीच्या सीमारेषेवरील सायंकाळ हे ग्रेस यांच्या कवितेच्या चिंतनाचे विषय होते. नादाने अनुभूती पोहोचविणारे ते कवी होते. आपल्या अनन्वय शक्तीने स्वत:ची कविता चिरकाल करणारे महाकवी असलेले कवी ग्रेस म्हणूनच मराठीतील आत्मनिष्ठ सौंदर्यपीठाचे शिल्पकार मानले जातात. त्यांच्या शब्दांनी रसिक मनाला केलेला स्पर्श काळाला पुसता येणार नाही.