सत्तेची ओढ भल्याभल्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग अशी माणसे दयनीय होतात किंवा हास्यास्पद तरी. ‘मला मुख्यमंत्री बनवा, मी सारा महाराष्ट्र सरळ करीन’ अशी काहीशी तंबीवजा भाषा प्रथम मनसेच्या राज ठाकरे यांनी वापरली. त्यांच्या पक्षाचा जीवच मुळात एवढासा. आपल्या व्यक्तिगत करिष्म्याच्या आणि भाषणबाजीच्या जोरावर आपण महाराष्ट्र जिंकू अशी स्वप्ने त्यांनी पाहिली. प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाला २८८ पैकी १ जागा मिळाली आणि त्यांचा आवाज त्यांच्या गर्जनांसह गप्प झाला. ‘मी मुख्यमंत्री व्हावे अशी माझ्या सैनिकांचीच इच्छा आहे’ अशी भाषा शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनीही वापरली. कधी ते ती बोलायचे तर कधी त्यांच्या पक्षातली बडी माणसे वा त्यांचे मुखपत्र त्यांच्या राज्याभिषेकाच्या तयारीत गुंतलेले दिसायचे. त्या महत्त्वाकांक्षेपायी सेनेच्या पुढाऱ्यांनी भाजपाशी असलेली आपली २५ वर्षांची मैत्री तोडली आणि ऐनवेळी आपले उमेदवार राज्यभर उभे केले. आपल्या ताकदीचा पुरेसा अंदाज नसल्याने व भाजपाच्या वाढलेल्या सामर्थ्याची जाणीव न ठेवल्याने त्यांच्या पक्षाचेही हसे झाले. तो सत्तेपासून बराच दूर राहून ६३ जागांवर थांबला. एकेकाळी त्याच्यासोबत येऊ इच्छित असलेले पक्ष तसे आले असते तरी त्या जागा फार वाढल्या नसत्या हे नंतरच्या आकडेवारीने उघड केले. काँग्रेस पक्षात पृथ्वीराज चव्हाण असेच तयार होते. ‘मीच नेतृत्व करणार’ असे त्यांनीही सांगून टाकले होते. त्यासाठी कऱ्हाड मतदारसंघात सात वेळा निवडून आलेल्या आपल्याच पक्षातील विलासकाका उंडाळकरांना त्यांनी बाजूला सारले. त्यांचा राज्यात प्रभाव दिसला नाही, पक्षावर पकड आढळली नाही आणि ज्या माणिकराव ठाकरेंवर त्यांची भिस्त होती ते स्वत:च्या मुलाचे डिपॉझिट वाचवू शकले नाही. प्रत्यक्षात पूर्वीहून आपल्या जागा निम्म्यावर आणून त्यांनी काँग्रेसला ४२ जागांवर थांबविले. राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांच्या अंगात वारेच शिरले होते. अजित पवारांचे जिभेवर नियंत्रण नाही आणि त्यांच्या पक्षातील इतरांनीही आपापल्या जिभा सैल सोडल्याचे आर.आर. पाटलांवरून दिसले. शरद पवारांचा प्रभाव ओसरला होता आणि त्या पक्षात एकोपाही कुठे दिसत नव्हता. मात्र मुख्यमंत्रिपद हे आपले लक्ष्य असल्याचे विस्मरण त्याला कधी झाले नाही. भाजपाला या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळतील हे आरंभापासून साऱ्यांना दिसत होते. त्यातले महत्त्वाकांक्षी पुढारी निवडणुकीच्या निकालापर्यंत आपला संयम राखू शकले. तो निकाल आला आणि त्यांच्याही आकांक्षांना पंख फुटले. नितीन गडकरी यांची त्यातली झेप सर्वात मोठी व धक्कादायक होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते व सध्या केंद्रात ते मंत्रीही आहेत. ‘आता राज्यात येणे नाही’ हे त्यांनी अनेकवार सांगून टाकले होते. मात्र त्यांचे तसे म्हणणे अनेकांना संशयास्पद वाटावे इतक्या वेळा ते त्यांनी उच्चारले होते. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीची वेळ आली तेव्हा त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना समोर करून बंडाचा झेंडा उभारला आणि ४२ आमदार आपल्या पाठीशी असल्याचे केंद्राला म्हणजे मोदींना दाखवून दिले. या आमदारांनी त्यांच्या वाड्यावर त्यांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी आणखी ४४ जण त्यात सहभागी असल्याची बातमी विनोद तावडे या आणखी एका महत्त्वाकांक्षी नेत्याच्या नावानिशी प्रकाशित झाली. राजीव प्रताप रुडी या पक्षाच्या प्रभारी नेत्यानेच ‘गडकरी तयार नसल्याने’ ही माणसे त्यांना तयार करायला त्यांच्या वाड्यावर आली होती असे सांगितले. त्यामुळे मोदींनी रुडींना तडकाफडकी महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून दूर केले. मोदींच्या मनातला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आहे. ‘त्याला मी राजकारणात आणले’ असे आढ्यताखोर विधान गडकरींनी नंतर केले. या साऱ्या धावपळीत संघ कुठे होता? गडकरींना त्याचा व केंद्राचा कल अखेरपर्यंत कसा कळला नाही, हे प्रश्न आता अनुत्तरित राहणार आहेत. एक गोष्ट मात्र खरी, जर संघ पूर्वीसारखाच ‘गडकरीवादी’ राहिला असता तर फडणवीसवादी पक्ष (मोदी) व गडकरीवादी संघ असे दोन तट त्या परिवारात उभे राहिले असते. पण गडकऱ्यांनी आता त्यांचे निशाण खाली उतरविलेले व फडणवीसांच्या नावाला नाईलाजाने का होईना मान्यता दिल्याचे दिसते. मात्र झाल्या प्रकारात गडकरींनीही स्वत:ला भरपूर हास्यास्पद बनविले व आपल्या अनुयायांना अकारणच फडणवीसविरोधी बनवून टाकले. एवढ्या मोठ्या नेत्यांची ही दैना असेल तर मग आठवले-मेटे आणि इतरांचा विचार आपण कशासाठी करायचा? तशीही त्यांची नावे इतिहासाजमा झाल्यासारखीच आहेत. त्यांच्यासोबत लोक नाहीत, संघटना नाहीत आणि त्यांना फारसे भवितव्यही नाही.