शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

साहित्यातील क्रांतिपर्वाचा प्रणेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:41 IST

स्वातंत्र्योत्तर काळात दलित-पददलित समाजातून उच्च शिक्षण घेणारी जी मुुलं होती त्यांना तत्कालीन मराठी साहित्यात व्यक्ती म्हणून ना त्यांचं प्रतिबिंब दिसलं

स्वातंत्र्योत्तर काळात दलित-पददलित समाजातून उच्च शिक्षण घेणारी जी मुुलं होती त्यांना तत्कालीन मराठी साहित्यात व्यक्ती म्हणून ना त्यांचं प्रतिबिंब दिसलं ना त्यांच्या समूहाचं. ही मराठी वाङ्मयातील एक प्रकारची उणीवच होती. सर्वहारा, कष्टकरी, श्रमजीवी, उपेक्षित आणि जात भावनेने पीडित असा जो समूह होता त्या समूहातील उच्च शिक्षितांना तत्कालीन मराठी साहित्य त्यांच्या जगण्याचं आणि यातनांचं कोणतंच चिन्ह अनुभवायला येत नव्हतं. ही ठसठस व्यक्त करण्याचं माध्यमही त्यांच्याजवळ नव्हतं, हे लक्षात घेऊन औरंगाबादच्या नागसेन परिसरात तत्कालीन शिक्षकांचा जो वर्ग होता तो या उच्च शिक्षित विद्यार्थी लेखकांना आपल्या जगण्याचं आक्रंदन मांडण्याचा उपदेश करीत होता. गुरुवर्य डॉ. गंगाधर पानतावणे त्यापैकी एक.पानतावणे सरांनी सृजन आविष्काराला वाट मोकळी करून देण्यासाठी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाला जन्म दिला. ‘अस्मितादर्श’मधून जे वाङ्मय प्रकाशित होऊ लागलं त्याला त्यांनी दलित साहित्य अशी संज्ञा दिली. तत्कालीन मराठी वाङ्मयविश्वात दलित साहित्य या संज्ञेविषयी नापसंती व्यक्त केली गेली; मात्र डॉ. गंगाधर पानतावणे यांनी ही संज्ञा आग्रहपूर्वक मांडली आणि ही संज्ञा जातवाचक नाही, तर ती जाणीवमंडीत आहे, हे ठासून सांगितलं. वाङ्मयातील दलित्व हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाशी अनुबंधित करून त्यांनी या संज्ञेचा व्यास विस्तारित केला. ज्यांचा लोकशाही जीवनप्रणाली, लोकशाही जीवनमूल्ये, शोषण विरोध, समताधिष्ठितता आणि जातीविहीन समाजरचना यावर अढळ विश्वास आहे अशी जी प्रवृत्ती असेल ती दलित जाणीव, असे डॉ.पानतावणे यांनी संबोधून जाणिवेचा विस्तार केला. ही घटना अभूतपूर्व स्वरूपाची होती. तत्कालीन वाङ्मयविश्वात डॉ. पानतावणे यांच्या भूमिकेला क्रांतिकारक भूमिका असं मानलं गेलं. समाजनिष्ठ साहित्य त्यामुळंच महत्त्वाचं ठरू शकलं. दलित साहित्याचा अतिशय जोरकस असा पहिला आविष्कार मराठी भाषेतून अभिव्यक्त झाला. या अभिव्यक्तीचे पडसाद नंतरच्या काळात गुजराती, कानडी, बंगाली, हिंदी, तामिळी आदी भाषांवरही पडत गेले; पण दलित चेतनेचं वाङ्मय पहिल्यांदा मराठी भाषेत आविष्कृत झालं. दलित साहित्याचा प्रपात हा कवितेच्या रूपानं पहिल्यांदा व्यक्त झाला.डॉ. पानतावणे सरांनी या साहित्य प्रवृत्तीला आपल्या चिंतनानं स्वतंत्र असं तत्त्वज्ञान प्रदान केलं. विद्रोह, विज्ञान आणि विश्वात्मकता ही या साहित्याची त्रिसूत्री मांडून त्यांनी या साहित्य प्रवाहाची तात्त्विक मांडणी केली. त्यामुळे स्वाभाविकपणे या साहित्याच्या आस्वाद आणि मूल्यमापनाचे काही निकष निश्चित करता येऊ शकले.डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आंबेडकरी तत्त्वज्ञान आपला श्वास आणि ध्यास म्हणून स्वीकारलेला होता. ते आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी तडजोडच करीत नसत. मग ते वाङ्मय कथात्मअसो, काव्यात्म, नाट्यात्म असो या सबंध सृजनात आंबेडकरी जाणिवेचा परिपोष असला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असे. म्हणून ‘अस्मितादर्श’मध्ये मुखवट्याचे साहित्य नको आंबेडकरी जाणिवेचे साहित्य हवे, अशी नोंद ते आवर्जून करीत असत.‘अस्मितादर्शचं’ काम करीत असताना किंवा संपादन पाहताना ते अशा साहित्याला प्राधान्य देत जे साहित्य आंबेडकरी जाणिवेशी घट्ट चिकटलेलं असेल. दरम्यानच्या काळात जवळपास तेरा वर्षे माझ्यावर त्यांनी ‘अस्मितादर्शच्या संपादनाची जबाबदारी सोपवली होती. त्या काळात अमूक एखाद्या लेखकाचं साहित्य छापावं अशी सूचना त्यांनी कधीच केली नाही. जेव्हा केव्हा त्यांच्याकडे एखाद्या लेखकाची आमचं साहित्य छापून आलं नाही अशी तक्रार होई तेव्हा पानतावणे सर त्या लेखकाला म्हणत ‘अस्मितादर्शच्या’ जाणिवेचं ते लेखन नसेल म्हणून ते कदाचित छापलं गेलं नसावं; पण सरांनी माझ्या निर्णयाच्या बाबतीत कधीही नाराजी अथवा नापसंती दाखवली नव्हती. त्यांना याची खात्री असावी की, आपण जी भूमिका अंगीकारली आहे त्या भूमिकेची पुरेपूर जाण मला असावी.डॉ. गंगाधर पानतावणे सरांनी जवळपास पाच पिढ्यांचं सांस्कृतिक भरणपोषण केलं. हे करताना लेखकाच्या अनुभव विश्वाची मूस ढिली होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. दलित साहित्याच्या एकूण परिक्रमेत पानतावणे सरांचं चिंतन आणि योगदान निश्चितच वाङ्मयक्रांतीचच होतं, यात कुठलाही संदेह नाही.- डॉ. ऋषिकेश कांबळे

टॅग्स :Dr.Gangadhar Pantawaneडॉ. गंगधर पानतावणे