शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

हे विघ्नहर्त्या, कोकणची बिकट वाट तूच थोडी सुसह्य कर बाबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 07:52 IST

गौरी-गणपतीसाठी घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, हेच खरे !

दरवर्षीच गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत नानाविध विघ्ने येऊन त्यांची वाट बिकट का होते? गणेशोत्सवाच्या सहा महिने अगोदरच एस. टी. बस व रेल्वेगाड्यांचे आरक्षण संपूनही जादा एस. टी. व रेल्वे गाड्या का सोडल्या जात नाहीत? याचाच गैरफायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूटमार करत आहेत. एस. टी.च्या तिकिटापेक्षा पाच ते सातपट भाडे आकारणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर आर.टी.ओ. पोलीस वा तत्सम यंत्रणांकडून कडक कारवाई का होत नाही? त्यांचे या खासगी वाहतूकदारांना अभय का आहे? आणि ही लूटमार काही यंदाचीच नाही. गेली अनेक वर्षे ती बिनबोभाट सुरू आहे. 

उदरनिर्वाहासाठी म्हणून मुंबई आणि घाटमाथ्यावर स्थिरावलेली कोकणातील कुटुंबे गणपतीच्या स्वागतासाठी आपापल्या गावी जायला निघतात. गणपती हा कोकणातला मोठा सण ! अगदी दिवाळीपेक्षाही मोठा ! या काळात घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, तिथे गणपतीची आरास करून त्याच्याबरोबरच तुमचीही वाट पाहणारे कुटुंब हवे, प्रसादाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन भेटीगाठी घेता येतील, असे जीवाभावाचे गणगोत हवे! - ज्याच्याजवळ हे नाही, त्याला एवढे हाल सोसून हे कोकणातले चाकरमानी दर गणपतीला घरी जायला का निघतात, हे समजणे केवळ मुश्कील आहे !

गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करणार हे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आश्वासन मुंबई - गोवा महामार्गावरील धुळीसोबत हवेतच विरले आहे ! पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, माणगाव या भागांतील मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे’ जैसे थे’ च आहेत ! (खात्री नसेल तर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी एकदा आपल्या ताफ्यासह/काफिल्यासह या मार्गावर अवश्य प्रवास करावा!) रस्त्यांवरील खड्डे, एकच मार्गिका व महामार्गाची दुरवस्था यामुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पाच ते दहा तासांच्या प्रवासाला दहा ते वीस तास लागत आहेत. मोठ्या हौसेने गौरी-गणपतीसाठी निघालेल्या कोकणवासीयांचे या महामार्गावरील हाल कुत्रेही खात नाही !

बरे कोकण रेल्वेने जावे तर आरक्षण संपले आहे. कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई, ठाणे, दिवा व पनवेल या रेल्वेस्थानकांतील गर्दी पाहून ‘कोकण रेल्वे’ने कोकणवासीयांना काय दिले? असाच प्रश्न पडतो ! नाव नुसते ‘कोकण रेल्वे’ ! पण या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या दक्षिण व उत्तर भारताकडे जाणाऱ्या ! सरकार कोणतेही असो-राज्य सरकार वा केंद्र सरकार किंवा कोणत्याही पक्षाचे असो ! ते फक्त कोकणवासीयांना विकासाचे गाजर दाखविते. पण प्रत्यक्षात कोकणवासीयांच्या पदरी पडते ती घोर निराशाच व अपेक्षाभंग ! निवडणूक प्रचारांत, कोकण महोत्सवात कोकणच्या निसर्गसौंदर्याचे, कोकणच्या संस्कृतीचे, कोकणी माणसाच्या स्वभावाचे गोडवे गायले जातात. पण या सर्व भूलथापाच आहेत हे आता सिद्ध झाले आहे. 

कोकणात जाणारी वाट बिकट होत असताना, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात नानाविध विघ्ने येत असताना त्याची सोडवणूक करण्यासाठी स्वतःला कोकणचे कैवारी व कोकणचे भाग्यविधाते म्हणवून घेणारे सर्वच पक्षांचे राजकीय पुढारी पुढे का येत नाहीत? की ते कोकणी माणसाच्या सहनशीलता आणि संयम संपण्याची वाट पाहत आहेत?  हे विघ्नहर्त्या गणेशा, कोकणचा शाश्वत विकास करण्याची सुबुद्धी निदान कोकणातील पुढाऱ्यांना तरी मिळू दे !

- टिळक उमाजी खाडे, नागोठणे, जि. रायगड

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव