- डॉ. अमोल अन्नदातेनायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातिवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का, यावर अजून चौकशी सुरू आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या, तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे, तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.जर पायलच्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल, तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे, पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही, अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे ठाकणार नाहीत, याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना, गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्यावरून उभी फूट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रासारख्या थेट जगण्या- मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकारे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्कासाठी लढा यातून कधी नव्हे, ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते.आरक्षण हवे नको, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत, आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी, यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवीसारख्या तरुण डॉक्टरचा जीव जातो, तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मापलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये, तसेच कुठलाही बदल आणताना तो अचानक आणला, तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडाही शासनाने घ्यायला हवा.या पलीकडे जाऊन या घटनेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कंगोरेही तपासून, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:54 IST