काही दिवसांपूर्वी पंजाब केसरी वृत्तपत्र समूहाचे सर्वेसर्वा विजयकुमार चोप्रा पुण्यात एका कार्यक्र मासाठी आले होते. तेव्हा म्हणाले की, जैन धर्माचे आचार्य शिवमुनी पंजाबच्याच फरीदकोटचे आहेत. ते पंजाबी तर आहेतच. मात्र, केवळ जैन धर्मीयच नाहीत, तर जगभरच्या शांतता, अहिंसा या तत्त्वांवर विश्वास असणाऱ्या सर्व धर्मियांमध्ये त्यांचा मोठा सन्मान आहे. त्यांना भेटले पाहिजे. फाळणीची सर्वात जास्त झळ पंजाब आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना बसली. मात्र, कोठेही गेलो, तेथे धर्म वेगळा जरी असला, तरी भाषा एकत्र आणण्याचे माध्यम आहे, याची जाणीव झाली. आम्ही पंजाबी असलेल्या आचार्य सम्राट शिवमुनी यांची पुण्यात चातुर्मासस्थळी प्रत्यक्ष भेट घेतली.
विजयकुमार चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंसाचार आणि दहशतवाद जितक्या जवळून अनुभवला आणि त्याची किंमत मोजली, तेवढी या देशात खूप कमी कुटुंबांनी मोजली असेल. वडील लाला जगतनारायण, भाऊ रमेशचंद्र यांच्यासह या समूहाचे साठपेक्षा अधिक लोक दहशतवाद्यांकडून मारले गेले. ज्यांनी रक्ताचे पाट वाहताना पाहिले, बॉम्बस्फोटापासून गोळीबाराच्या आवाजात आणि बातम्यांमध्ये ज्यांचा दिनक्रम आजही सुरू होतो, ज्यांनी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना हिंसाचाराचे बळी ठरताना पाहिले, त्यांच्या मनात हे युद्ध आणि संघर्ष पाकिस्तानला धडा शिकवेपर्यंत नेहमी चालला पाहिजे, अशी भावना असेल, असे मला वाटायचे आणि अशी भावना असणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. मात्र, एकीकडे दहशतवादाविरोधात भूमिका घेताना शहीद रमेशचंद्र यांनी स्थापन केलेल्या शहीद परिवार फंडद्वारा विजयकुमार चोप्रा यांनी हजारो परिवारांचे, विधवांचे आणि अनाथांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केले.
विजयकुमार चोप्रा आणि आचार्य शिवमुनी यांची बराच वेळ चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा हे आचार्य शिवमुनी यांचे आशीर्वाद घ्यायला आले होते. त्याचा धागा पकडून विजयजी म्हणाले की, त्यांना आणि पंतप्रधानांना आता फक्त तुमच्यासारखे संतच काही सांगू शकतील. द्वेष आणि शत्रुत्व कायमस्वरूपी असू नये. सध्या एकूणच जगामध्ये महत्त्वाचे देश दहशतवादाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, ती घेतलीच पाहिजे. मात्र, हळूहळू ती भूमिका दहशतवादाच्या विरोधात न राहता, विविध धर्म आणि जातींच्या विरोधात होऊ लागली आहे, हे मात्र काळजी वाटावी असेच आहे. ३४0 वे कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती किंवा या प्रश्नावरून पाकिस्तानात निर्माण झालेली परिस्थिती, एनआरसीच्या मुद्द्यावरून आसामात निर्माण झालेली परिस्थिती आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न अशा विषयांकडे पाहताना एक वेगळीच अस्वस्थता देशात आहे. नक्की आपण कोणत्यादिशेने चाललो आहोत? याच्यातून आपण जगातल्या शस्त्रांत्रांच्या व्यापाऱ्यांच्या हातात तर जाणार नाही ना?
विजयकुमार चोप्रा यांची जैन धर्माचे श्वेतांबर स्थानकवासी आचार्य शिवमुनी यांच्याशी झालेली चर्चा आणि बैठक म्हणजे केवळ विश्वशांतीचा इव्हेंट नव्हता. आज भारतात जागतिक शांततेसाठी दरमहा दोनशेहून अधिक इव्हेंट होतात, पण अशा इव्हेंटमधून शांतता निर्माण होत नसते. आता शांततेच्या विचारांची पुन्हा एक वैश्विक चळवळ होणे आवश्यक आहे आणि ती क्षमता जैन धर्मीयांमध्ये निश्चित आहे. म्हणूनच जागतिक शांततेसाठी जैन धर्मीयांनी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन घेतलेला पुढाकार हा बुद्ध आणि महावीरांच्या देशाने जगाला पुन्हा एकदा दिलेली देणगीच ठरणार आहे. ही देणगी दुर्बलतेचे नाही, तर सामर्थ्याचे प्रतीक असेल.
- संजय नहारसंस्थापक अध्यक्ष, सरहद