पाकिस्ताननं आपला रडीचा डाव कधीच सोडला नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट काढत राहायचं आणि आपलं रडगाणं गात राहायचं हा पाकिस्तानचा नेहमीचा फंडा आहे. विशेषत: भारताच्या बाबतीत तर पाकिस्ताननं आपल्या खोड्या कधीच सोडल्या नाहीत. भारतानं पाकिस्तानला आजवर प्रत्येक बाबतीत मात दिली आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात याचा मोठा राग आहे. त्यामुळे भारताची नस कुठे दाबता येईल, भारतीयांना कुठे, कसा त्रास देता येईल याचा कायमच ते शोध घेत असतात. आता त्यांनी काय करावं? इतक्या क्षुद्र गोष्टी ते करीत असतात, की त्यानं हसावं की रडावं हेच कळत नाही. मुळात त्यामुळे जगात आपलीच नाचक्की होते हेदेखील त्यांना कळत नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानाचं जगात नाक ठेचलं गेलं. त्याचा ‘बदला’ आता ते कसा घेताहेत?- तर पाकिस्तानातील भारतीय मुत्सद्यांच्या घरातील गॅसचा पुरवठा त्यांनी थांबवला. भारतीय मुत्सद्यांना गॅस सिलिंडर न देण्याचे आदेश त्यांनी स्थानिक विक्रेत्यांना दिले आहेत. एवढंच नाही, त्यांच्याकडची मिनरल वॉटर आणि वर्तमानपत्रांची सेवाही त्यांनी बंद केली. पाकिस्तान सरकारच्या या कृतीची खुद्द पाकिस्तानी जनतेनंच खिल्ली उडवली आहे. भारताला जर नमवायचंच असेल तर भारतापेक्षा जास्त प्रगती करा, भारताला युद्धात पराभूत करा, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.पाकिस्ताननं इस्लामाबादमधील भारतीय मुत्सद्यांच्या घरांतील गॅस पुरवठा बंद करण्याचे आदेश स्थानिक गॅस सिलिंडर विक्रेत्यांना दिले आहेत. इस्लामाबादमध्ये मिनरल वॉटर आणि वर्तमानपत्रांचा पुरवठाही थांबवण्यात आला. भारतानं नुकत्याच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने ही कारवाई ‘सूड’ म्हणून केल्याचं सांगितलं जात आहे.
अहवालानुसार, हा निर्णय पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या योजनेचा एक भाग आहे. या अंतर्गत पाकिस्तान सूड घेण्याच्या लहानसहान कारवाया करत आहे. खरं तर याला ‘सूड’ तरी कसं म्हणावं? देशाच्या पातळीवर एखादी कृती करत असताना, सर्वसामान्य माणसांना किंवा काही मोजक्या लोाकंना लक्ष्य करुन त्यांना त्रास देण्यात काय हशील आहे? पण हे कळलं तर तो पाकिस्तान कुठला! या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून नाइलाजानं भारतानंही दिल्लीत कार्यरत पाकिस्तानी मुत्सद्यांना वर्तमानपत्र पोहोचवणं थांबवलं.
अशा खुसपटी काढण्याचा पाकिस्तानचा हा पहिलाच प्रयत्न नाही. पाकिस्ताननं यापूर्वीही अनेकदा असे रडीचे डाव खेळले आहेत. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतरही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय मुत्सद्यांना अशाच प्रकारे त्रास दिला होता. त्या काळात, भारताच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रासदायक वागणुकीला सामोरे जावे लागले होते. या घटनांमध्ये सातत्यानं पाठलाग करणं, सुरक्षा रक्षकांकडून मुद्दाम प्रश्नांची सरबत्ती करणं आणि खोटे फोन कॉल करणं यासारख्या गोष्टींचा समावेश होता. असा रडीचा डाव खेळू नका आणि आमच्या अधिकाऱ्यांना, नागरिकांना त्रास देऊ नका, असं सांगत भारतीय उच्चायुक्तानं हे प्रकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोरही मांडलं होतं. वास्तविक कोणत्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्रास न देणं हे अंतरराष्ट्रीय संकेत आहेत, पण पाकिस्तानला त्याचीही चाड नाही.