पाकिस्ताननं नुकत्याच आपल्या ४३०० भिकाऱ्यांना एका झटक्यात ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकलं आहे. म्हणजेच या भिकाऱ्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्यांना विमानप्रवासाला बंदी घातली आहे.. आजच्या घडीला पाकिस्तानातली ही अत्यंत आणि सर्वांत महत्त्वाची बातमी! - तुम्ही म्हणाल, ही बातमी ऐकून, हसावं की रडावं हेच आम्हाला कळत नाही. मुळात भिकारी कशाला विमान प्रवास करतील आणि त्यांना कोण, कशाला विमान प्रवासाला बंदी करील? ज्यांची विमानप्रवासाची ऐपतच नाही, त्यांना विमानप्रवासाला बंदी घालून असा काय तीर पाकिस्ताननं मारला आणि ही बातमी प्रसारीत करून माध्यमांनी तरी अशी कोणती बातमी ‘ब्रेक’ केली? भिकाऱ्यांना विमानप्रवासाला बंदी केली काय आणि न केली काय, त्यानं असा काय फरक पडणार आहे?
- पण नाही, ही बातमी खरंच अत्यंत महत्त्वाची आहे आणि या बातमीला जागतिक ‘मूल्य’ही आहे! जगातले अनेक देश, विशेषत: सौदी अरेबिया आणि इतर अरब देश पाकिस्तानकडून या कृतीची कधीचीच अपेक्षा करीत होते. पण नेहमीप्रमाणे पाकिस्तान त्यासाठी बधत नव्हतं. शेवटी या देशांनी पाकिस्तानचे कान इतक्या जोरात पिरगाळले की पाकिस्तानला त्यांचं म्हणणं, त्यांची मागणी मान्य करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.. पण हे देश पाकिस्तानी भिकाऱ्यांना विमान प्रवासाला बंदी घालण्याची मागणी तरी का करीत होते?
त्याचं अतिशय महत्त्वाचं कारण असं की, अनेक पाकिस्तानी नागरिकांनी सौदी अरेबिया, अरब देश आणि जगातल्या बहुतांश देशांत आता एक नवाच धंदा सुरू केला आहे. या धंद्याचा सगळ्याच देशांना त्रास होतो आहे. पाकिस्तानी नागरिकांचा हा धंदा असा आहे तरी काय? - तर हे पाकिस्तानी नागरिक सौदी अरेबिया आणि इतर देशांत जाऊन तिथे चक्क ‘भीक मागण्याचा धंदा’ करतात! त्यामुळेच जगातले अनेक देश वैतागले आहेत. अर्थातच सौदी अरेबियात जाऊन भीक मागणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची, त्यातही बायकांची संख्या खूप मोठी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खरं तर हे पाकिस्तानी नागरिक मुळात ‘भिकारी’ नाहीत, पण सौदीत व इतर देशांत भीक मागण्यासाठीच ते जातात. भुके मरण्यापेक्षा ते सोपं आहे!पाकिस्तानात या नागरिकांचे ‘खाने के लाले’ पडले आहेत. आपल्याच देशात भीक मागितली तर त्यांना मिळणार काय? भीक द्यायला तर कोणाकडे काही पाहिजे ना? त्यामुळे हे पाकिस्तानी नागरिक रीतसर व्हिसा वगैरे काढतात, विमानाचं तिकीट अधिकृतपणे, पैसे देऊन खरेदी करतात, त्यामुळे हे भिकारी आहेत, हे लगेच कळत नाही, पण दुसऱ्या देशांत पाऊल ठेवलं रे ठेवलं की लगेच हातात कटोरा घेऊन ते भीक मागायला सुरुवात करतात!
आजवर अनेक देशांनी पाकिस्तानला इशारा दिला होता, तुमचे भिकारी आमच्याकडे पाठवणं थांबवा, नाही तर याचे परिणाम वाईट होतील.. पण नेहमीप्रमाणे जितके दिवस धकेल तितके दिवस चालू द्या, म्हणून पाकिस्ताननंही जगाच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं.. शेवटी या देशांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला, तुमचे भिकारी आमच्याकडे पाठवणं तुम्ही बंद केलं नाही, तर तुमच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल!.. एकाच वेळी अनेक देशांच्या धमकीनंतर आणि नाक दाबल्यानंतर पाकिस्तानला आपल्या भिकाऱ्यांवर विमानप्रवासाची बंदी घालावीच लागली! सौदीच्या हज मंत्रालयानं तर पाकिस्तानच्या धार्मिक मंत्रालयाला अगदी धारेवर धरलं होतं आणि त्यांची इज्जत चव्हाट्यावर आणली होती.
खूप पूर्वीपासूनच सौदीला पाकिस्तानच्या भिकाऱ्यांचा सर्वाधिक त्रास होतो आहे. आर्थिक तंगी आणि महागाईच्या कारणानं अनेक पाकिस्तानी नागरिक हज आणि उमरा यात्रेच्या बहाण्यानं साैदीत पोहोचतात आणि लगेच आपला कटोरा तिथे पसरतात. याचमुळे मक्का, मदिना आणि जेद्दासारख्या पवित्र धार्मिक स्थळी पाकिस्तानी भिकाऱ्यांची गर्दी जागोजाग दिसते. खरं तर सौदीत भीक मागणं हा कायद्यानं अपराध आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा ५० हजार रियालपर्यांत दंड होऊ शकतो. गेल्या वर्षी मक्केमध्ये ज्या भिकाऱ्यांना अटक करण्यात आली त्यातील ९० टक्के भिकारी पाकिस्तानी होते. भीक मागण्याबरोबरच पाकीटमारीचा ‘उपधंदा’ही ते करायचे, करतात! याआधीही या भिकाऱ्यांना विमानबंदी केली होती.
भिकारी पाकिस्तानचे, त्रास सौदीला!
पाकिस्तानी भिकाऱ्यांना कंटाळलेल्या सौदीनं शेवटचा उपाय म्हणून पाकिस्तानचा हज कोटा कमी किंवा बंद करण्याचा विचार चालवला होता. त्यामुळे पाकिस्तानी जनतेचा असंतोष उफाळून आला असता. त्यामुळेच पाकिस्तानला ही कृती करावी लागली. पण आजही हजारो भिकारी संधीच्या शोधात आहेत. सौदीचे बहुतांश तुरुंग पाकिस्तानी भिकाऱ्यांनी भरलेले आहेत. या भिकाऱ्यांचं काय करायचं हा सौदीपुढेही महत्त्वाचा प्रश्न आहे.