शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:03 IST

दहशतवाद्यांचे ‘ना-पाक’ इरादे उधळून लावायचे तर तत्काळ बदला घेण्याचा दबाव आपण सरकारवर आणता कामा नये. ही वेळ ‘एकतेचा संकल्प’ घट्ट करण्याची आहे.

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या निष्पाप नागरिकांच्या निर्घृण हत्येची छायाचित्रे पाहून कुणाचेही हृदय विदीर्ण झाल्यावाचून राहणार नाही.  न्यायाची चाड असलेल्या प्रत्येकाचेच रक्त सळसळू लागेल. एका डोळ्यातून अश्रू ओघळतील, तर दुसरा आग ओकू लागेल. तातडीने बदला घेण्याचा आणि धडा शिकवण्याचा आग्रह धरला जाईल. दहशतवादी  हे पुरते जाणून आहेत. टीव्ही आणि समाजमाध्यमांच्या या युगात आपल्या कृत्याची प्रतिक्रिया काय व्हावी,  याचीही  योजना दहशतवादी  स्वतःच बनवतात आणि  भावनेच्या भरात त्यांना हवे तेच नेमके आपण  करू लागतो. दहशतवादाच्या विरोधात आपण किती क्षुब्ध झालो, यात नव्हे; तर अतिरेक्यांचा खरा हेतू नीट समजावून घेऊन तो हाणून पाडणे यातच खरे यश असते. 

ही वेळ शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे, आपापले राजकीय हिशेब चुकते करण्याची नाही. विरोधकाच्या भूमिकेत असताना भाजपने खुलेआम अशाच खेळी खेळल्या होत्या यात शंकाच नाही; पण तेव्हा ती विरोधकांची चूक असेल तर आजच्या विरोधकांनी तशीच कृती करणेही चुकीचेच. जबाबदारी निश्चित करायची वेळ नक्कीच येईल; पण  ती वेळ ही नव्हे. ही वेळ राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचा राजीनामा मागण्याचीही नाही. दहशतवाद्यांचे इरादे हाणून पाडायचे असतील तर पक्ष-विपक्ष किंवा विचारसरणींमधील भिंती ओलांडून  सर्व भारतीयांनी एकजुटीने उभे राहण्याची खरी गरज आहे. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे निवेदन आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना  फोन करून दिलेले पूर्ण समर्थन ही योग्य दिशेने उचललेली योग्य पावले होत. 

भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढून त्याने स्फोटक स्वरूप धारण करावे, जनक्षोभाच्या दबावापोटी प्रतिकारवाई करणे भारत सरकारला  भाग पडावे, असा दहशतवाद्यांचा दुसरा हेतू असणार. भारत-पाक सीमेवर तणाव वाढला की पाकिस्तानी राजकारणात सैन्याचे वजन वाढेल. दहशतवाद्यांचे टोळीप्रमुख  अधिक बलवान बनतील; हीच दहशतवाद्यांची रणनीती आहे. ती  निष्फळ  करायची   तर ‘तत्काळ बदला घेण्याचा दबाव’ आपण सरकारवर  आणता कामा नये. पहलगाम हत्याकांडाची जबाबदारी  पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांनी स्वीकारली आहे. एरवीही या घटनेचे पाकिस्तानशी असलेले धागेदोरे उघडच होते. त्यामुळे भारत सरकारला प्रत्युत्तर तर द्यावेच लागणार; परंतु जनमताच्या रेट्याखाली घाईघाईने केलेल्या कारवाईमुळे टीव्हीवर मथळे झळकतील, मतेही मिळू शकतील. तथापि, दहशतवादाला आळा मुळीच बसणार नाही.  २००८ मधील मुंबईवरील हल्ल्यानंतर भारत सरकारने दिखाऊ बदला न घेता शांतपणे, पाकिस्तान ‘दहशतवादसमर्थक राष्ट्र’ असल्याचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध करत,  त्याला एकाकी पाडण्यात यश मिळवले. आपली सेना, सुरक्षा यंत्रणा आणि राजनैतिक मुत्सद्दी यांच्यावर तत्काळ कृतीचा दबाव आणण्याऐवजी आपण सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे, हाच धडा यातून मिळतो. 

काश्मीर आणि उर्वरित भारत यामधील दरी अधिकच रुंद व्हावी, या  हल्ल्यामागील तिसरा कुटिल हेतू असणार. पाकिस्तानी सेनेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या  दहशतवाद्यांच्या अमानुष क्रौर्याचे खापर आपण आपल्याच काश्मिरी जनतेवर फोडू लागलो तर त्यांचा हा हेतू पूर्णतः सफल होईल.  हा काश्मिरी लोकांच्या उपजीविकेवरील हल्ला आहे. काश्मीरमध्ये भरभरून पर्यटक येऊ लागले होते. त्यांची संख्या कमी करण्यासाठीच हा हल्ला होता. आता काश्मिरातील हा सर्वांत मोठा व्यवसाय निदान या हंगामापुरता तरी ठप्प होईल. हजारो कुटुंबांची रोजीरोटी या हल्ल्याने हिरावून घेतली आहे. या हल्ल्यात काश्मिरी लोकही  बळी पडले आहेत. सय्यद हुसेन शाह याने आतंकवाद्यांचा प्रतिकार करत हौतात्म्य पत्करले आहे. काश्मीरमधील सर्व राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी या हत्याकांडाची निर्भत्सना केली आहे. एखादी दहशतवादी घटना घडल्यानंतर प्रथमच अवघे काश्मीर बंद झाले आहे. मशिदी-मशिदींमधून या हल्ल्याविरोधात  पुकारा करण्यात आला आहे. आपण थोडी समजूतदार शहाणीव दाखवली तर हा कठीण प्रसंग म्हणजे काश्मीर आणि उर्वरित भारत यांना निकट आणून दहशतखोरांना सणसणीत प्रत्युत्तर देण्याची एक सुवर्णसंधीच ठरू शकेल. 

भारतात हिंदू-मुसलमान दंगली घडवून आणणे हे या दहशतवाद्यांचे मुख्य षड्‌यंत्र आहे. त्यामुळेच त्यांनी धार्मिक ओळखीनुसार हत्या केल्या. हिंदूंना वेचून-वेचून मारले. त्यांची योजना स्पष्ट होती. बरेच भारतीय आपल्या या कृत्याची हुबेहूब नक्कल करतील, धर्माच्या नावे  हल्ला करू लागतील अशी त्यांना खात्री होती. आपल्या देशाला हिंदू-मुसलमान संघर्षाच्या आगीत  होरपळून टाकण्याचे हे कारस्थान आहे. या कारस्थानाला बळी पडणे आपण नाकारले पाहिजे. या परिस्थितीत जो कुणी दहशतवाद्यांचा बदला घेण्याच्या नावे भारतीय मुसलमानांच्याविरुद्ध विखारी वक्तव्य करेल, नाव आणि कपडे यावरून माणसाची ओळख पटवू पाहिल तो दहशतवाद्यांच्या या कटाचाच एक भाग बनेल. 

पहलगाममधील हे हत्याकांड म्हणजे भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचे एक षड्‌यंत्र आहे. याक्षणी  हिंदू-मुसलमान एकतेचा संकल्प करणे आणि कुठेही जातीय वणवा पेटू न देणे हेच पहलगामच्या दहशतवादी हैवानांना चोख प्रत्युत्तर ठरेल.     yyopinion@gmail.com

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान