भारतात अनेक भाषांना मान्यता असतानाही ‘एक देश एक भाषा’ असे उद्गार गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काढले. त्यांचा प्रतिवाद पक्षातील कुणी केला नाही. भाषावार प्रांतरचनेच्या या देशात भाषांचे अभिमान मोठे आहेत. प्रत्येक भाषेशी तेथील लोकांची संस्कृती व जीवनप्रणाली जुळली आहे.‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश असेल, तरच राष्ट्र निर्माण होते,’ असे उद्गार इटलीचा स्वातंत्र्य नेता जोसेफ मॅझिनी याने इटलीच्या एकीकरणाच्या काळात काढले होते. जगातील एकही राष्ट्र आज त्याच्या या वर्तनात बसणारे नाही. अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक वंश व बेटात विभागलेले भूप्रदेश यांची संख्या आज जगात मोठी आहे. देशांना आहेत तशा सीमा धर्मांना नाहीत, भाषांना नाहीत आणि वंशांनाही नाहीत. तशी भाषा नंतरच्या काळात एकट्या हिटलरने केली. ‘निळ्या डोळ्यांचे व गौर वर्णाचे आर्यच तेवढे जर्मनीचे नागरिक आहेत व त्या राष्ट्रात राहण्याचा अधिकारही त्यांनाच आहे,’ असे तो म्हणाला. वांशिक व आर्थिक शुद्धिकरणाच्या नावाने सुरू झालेल्या माणसांच्या कत्तली विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत जगात सुरू होत्या. नंतरच्या काळातही त्या काही भागात सुरू राहिल्या. जर्मनीतील ज्यूंचा संहार, आता सुरू असलेली रोहिग्यांची कत्तल, श्रीलंकेतील तामिळांचा संहार किंवा भारतात होणाऱ्या अल्पसंख्य विरोधी दंगली यांचे स्वरूप असे आहे. महाराष्ट्रात मराठीखेरीज इतरांना राहू दिले जाणार नाही, ही भाषा येथेही बोलली गेली. तरीही जगातील बहुतेक देशांनी लोकशाही व सर्वधर्मसमभाव यांचा स्वीकार आता केल्याने, पूर्वीची नृशंस मनुष्यहानी थांबली नसली, तरी कमी झाली आहे. भारतातील १३० कोटी जनतेत २० कोटींहून अधिक मुस्लिम, दोन कोटी ख्रिश्चन, दोन कोटी शीख व अन्य धर्माच्या इतर लोकांसोबत ८० टक्क्यांएवढे हिंदू आहेत. येथे किमान १४ भाषांना घटनेची मान्यता आहे. वंशाची गणना नाही आणि अंदमान-निकोबारसारखे देशाचे भूप्रदेश समुद्रातही वसले आहेत. सर्व धर्म, वंश, वर्ण, भाषा व प्रदेशांना सामावून घेणे हा सध्याचा देशधर्म आहे. न्या. रंजन गोगोई म्हणाले, तसे ‘देश म्हणजे सर्वसमावेशकता आणि राज्य म्हणजे न्याय’ असा देश एकत्र राखताना नेतृत्वाची दृष्टीही सर्वसमावेशक व व्यापक असावी लागते.
सर्व धर्म, वंश, वर्ण, भाषा व प्रदेशांना सामावून घेणे हाच देशधर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 05:07 IST