शेतीतील काही गोष्टी शरद पवार यांनी बोट धरून मला शिकवल्या’, अशी कबुली पंतप्रधान मोदी यांनी रविवारी पुण्यात जाहीरपणे दिली. त्याचबरोबर राजकारणाच्या धकाधकीतही शेती व शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार हे कायम पुढाकार घेत असतात, अशी ग्वाहीही मोदी यांनी देऊन टाकली आहे. किंबहुना नीतिमूल्यांची जपणूक करीत राजकारणात भाग घेणारा पवार यांच्यासारखा नेता देशात क्वचितच आढळेल, असे मोदी यांनी काढलेले प्रशंसोद्गार ऐकून महाराष्ट्रातील जनतेचे कान तृप्त झाले असतील. आता ‘महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत राहिल्या आहेत’, असा प्रश्न कोणी विचारल्यास, तो दुधात मिठाचा खडा टाकण्याचा विघ्नसंतोषी प्रकारच मानला जायला हवा. प्रसंग जरी साखरविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचा होता, तरी मोदी यांच्या भाषणात साखरपेरणी होती, ती पवार यांच्या कौतुकाची. त्यामुळे हा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवाचा सोहळा होता काय, असा प्रश्न पडणे, हेही विघ्नसंतोषीपणाचेच लक्षण मानले जायला हवे. देशात क्वचितच असेल, इतके उत्तुंग नेतृत्व महाराष्ट्रात मोदी यांच्या दृष्टीस पडले. पण राज्यातील जनता इतकी करंटी की, पंतप्रधानांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यावर काळ्या पैशाची चर्चा सुरू झाली, तेव्हा नाव घेतले जात राहिले, ते पवार यांचेच. पण ‘एनसीपी ही नॅचरल करप्ट पार्टी’, असे मोदी २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारात बारामतीत येऊन म्हणाले नव्हे काय? ‘काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामती मुक्त करा’, असे आवाहन मोदी यांनी मतदारांना केले होतेच ना?’ निश्चितच केले होते की! पण म्हणून काय झाले? तो ‘चुनावी जुमला’ होता एवढे महाराष्ट्रातील जनतेला कळत नाही म्हणजे काय? पण पवार यांना ते पक्के ठाऊक होते. म्हणूनच दोन वर्षांपूर्वी राज्यातील निवडणुकीचे निकाल लागत असताना भाजपाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा इरादा पवार यांनी जाहीर केला होता. ज्यांना बोेट धरून शिकवले, त्यांना अडचणीच्या वेळी हात द्यायला नको काय? पवार यांनी असे का व कसे केले, हा प्रश्न नुसता फिजूलच नाही, तर तसा तो पडणे, हेही पूर्वग्रहाचेच लक्षण आहे. पवार यांनी पाठिंबा दिला, तो राज्याच्या हितासाठी. महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य राहावे, राज्याच्या विकासात अडथळे येऊ नयेत म्हणूनच. तसेही राज्याचा विकास साधायचा असेल तर केन्द्रात कोणाचेही सरकार असो, त्याच्याशी मिळतेजुळते घेण्यातच राज्याचे हित असते, हे तत्त्वचिंतनदेखील पवारांचेच ना? शेवटी महाभारतातील अर्जुनाच्या त्या गोष्टीप्रमाणे राज्यातील जनतेच्या हिताकडेच फक्त पवार यांचे लक्ष असते. शिवाय पवारच कायम म्हणत आले आहेतच ना की, ‘विकासाच्या कामात राजकारण नको’ म्हणून? त्यामुळेच पवारांच्या विकास दृष्टीचे कर्तृत्व दर्शवणाऱ्या बारामतीसारखी १०० शहरे देशात असण्याची गरज आहे’, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गेल्या वर्षी सांगून टाकले नव्हते काय? पण लवासा या गिरिस्थानावरून सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक भाजपा नेत्यांनी ओरडा केला होता, त्याचे काय? अजितदादांसह राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांना आता कसे तुरूंगात पाठवतो, ते बघतच राहा, असे भाजपाचे राज्यातील नेते निवडणूक प्रचाराच्या काळातच नव्हे, तर अजूनही म्हणत आहेतच ना? हे प्रश्नही निरर्थक आहेत. पुण्यात रविवारी पवार यांच्यावर मोदी स्तुतिसुमने उधळत होते, तेव्हा मुख्यमंत्री कसे कान देऊन ऐकत होते, ते पवारांचे मोठेपण न ओळखणाऱ्या महाराष्ट्रातील करंट्या जनतेच्या दृष्टीस कसे पडणार? भाषण करायची वेळ आली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी साखर परिषदेत स्तुती केली, ती मोदी यांंची आणि जीवनातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित करणारे मोदी यांचे नेतृत्व भारताला मिळाल्याने आता काळ्या पैशाविरूद्धची मोहीम यशस्वी होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नेमक्या याच शब्दांत पवार यांनी मोदी यांच्या कर्तृत्वाची ओळख या समारंभातील उपस्थितांना करून दिली होती. मुख्यमंत्र्यांनी पवार यांची स्तुती केली नाही, हे खरेच. पण मोदी यांनीच पवार यांना सर्वश्रेष्ठ ठरवल्यावर आणि पवार यांनी मोदी यांची स्तुती करण्यासाठी जे शब्द वापरले, त्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्र्यांनी केल्यावर, हा एक प्रकारे फडणवीस यांनी केलेला महाराष्ट्राच्या या जाणत्या राजाचा गौरवच नाही काय? असते काही लोकांना आडवळणाने बोलायची सवय, त्यात काय एवढे? पण ज्यांच्या नजरेतच कुसळ आहे, त्यांना सगळेच विपरीत दिसते, त्याला कोण काय करील? मोदी यांच्या नेतृत्वाची देशाला गरज आहे, हे पवार यांना पटलेले आहे आणि पवार यांच्यासारखा नेता देशात क्वचितच आढळेल, याची जाणीव मोदी यांनाही झालेली आहे. दोघांनाही देशाचा विकास करायचा आहे. मग दोघांचे राजकीय मार्ग वेगवगळे कसे काय? पवारांचे धरलेले बोट मोदी यांनी सोडले की, पवार यांनीच हात काढून घेतला, असे प्रश्न विचारणे, हाही विकासाच्या मुद्याचे राजकारण करण्याचाच भाग आहे. खरे तर देशाला स्वातंत्र्यानतर प्रथमच लाभलेल्या समर्पित नेतृत्वाचे बोट आता महाराष्ट्राचा हा जाणता राजा धरणार काय, याच प्रश्नाची चर्चा व्हायला हवी आहे. त्यातच देशहित आहे. उगाच प्रश्न विचारत राहणे, यात देशभक्ती निश्चितच नाही. कदाचित तो देशद्रोहही ठरू शकतो, याचे भान बाळगलेलेच बरे नव्हे काय?
आता पुन्हा बोट धरण्याची वेळ !
By admin | Updated: November 15, 2016 01:41 IST